आयुष मंत्रालय
केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते एकात्मिक आयुष उपचारपद्धी सेवांचे गोव्यात उद्घाटन
एकात्मिक आयुष उपचारपद्धी सेवा पुरवणारे देशातील पहिले केंद्र
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2023 3:25PM by PIB Mumbai
गोवा, 14 जुलै 2023
केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत आज गोव्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धतींचे केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची उपस्थिती होती.

एकाच छताखाली आयुष उपचारपद्धीअंतर्गत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद - खनिज आणि सागरी औषधी संसाधनांसाठी प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था, सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी - क्लिनिकल रिसर्च युनिट (होमिओपॅथी), सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिध्द - सिद्ध क्लिनिकल रिसर्च युनिट, केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद - क्लिनिकल रिसर्च युनिट आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन - युनानी स्पेशॅलिटी या उपचारपद्धी मिळणार आहेत.

देशात अशाप्रकारच्या एकात्मिक सुविधा देणार पहिले केंद्र असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानूसार आयुष मंत्रालय देशाचे नाही तर जगाचे आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहे, असे सोनोवाल म्हणाले. गेल्या नऊ वर्षात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत भारताच्या पारंपरिक उपचारपद्धतींना आज जगमान्यता मिळत आहे. सध्या आयुष बाजारपेठेचा विस्तार चार लाख कोटी एवढा झाला असल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली.

भारताने जगाला सर्वोत्तम उपचारपद्धती दिल्या आहेत. त्यामुळे जगात आयुषची विश्वासर्हता वाढली आहे. गोवा पर्यटन राज्य असल्यामुळे राज्यात एकात्मिक आयुष उपचारपद्धतींना स्थानिकांबरोबरच पर्यटकांनाही याचा लाभ होईल, अशी आशा केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी व्यक्त केली.

आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संस्थांनी आयुष उपचार पद्धतींविषयी जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना आयुष मंत्र्यांनी केली.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी याप्रसंगी बोलताना गोव्यात एकात्मिक आयुष उपचार पद्धती करुन दिल्याबद्दल आयुष मंत्रालयाचे आभार मानले. धारगळ, पेडणे येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि आता एकात्मिक आयुष उपचारपद्धती यांचा गोव्याच्या नागरिकांना नक्कीच लाभ होईल, असे ते म्हणाले.

नव्याने उद्घाटन झालेल्या आयुष आरोग्य सेवा औषधाच्या प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करुन आयुर्वेदाचे सर्वोच्च उद्दिष्ट पूर्ण करतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. गोव्यात उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करणे हे या सुविधेचे उद्दिष्ट आहे. यात बाह्यरुग्ण विभाग (OPD), रुग्णालय आणि पंचकर्म केंद्र अशी व्यवस्था आहे.
SRT/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1939466)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English