नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

हरित हायड्रोजनवरील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा (आयसीजीएच) नवी दिल्लीमध्ये प्रारंभ


आयसीजीएच 2023 स्वच्छ आणि हरित पृथ्वीचा आपला दृष्टीकोन प्रत्यक्षात आणणाऱ्या भागीदारीची जोपासना करणारा मंच उपलब्ध करून देत आहे- पंतप्रधान

हरित हायड्रोजन परिसंस्थेसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सरकार उद्योगांसोबत भागीदारी करेल- केंद्रीय ऊर्जा आणि नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्री

Posted On: 05 JUL 2023 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

ऊर्जा संक्रमणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून,सरकारने हरित  हायड्रोजन परिसंस्थेची स्थापना करण्याच्या दृष्टीने  आणि हरित  हायड्रोजनच्या माध्यमातून कार्बनउत्सर्जन कमी करण्यासंदर्भातले जागतिक लक्ष्य साध्य करण्यासाठी एका सुनियोजित दृष्टीकोनाची जोपासना करण्यासंदर्भात  विचार करण्यासाठी भारत आणि जगभरातील हितधारकांना एकत्र आणले आहे. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात भारत सरकारकडून 5 ते 7 जुलै 2023 दरम्यान आयोजित केलेल्या हरित  हायड्रोजन वरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आज केंद्रीय ऊर्जा आणि नूतन आणि अक्षय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हरित  हायड्रोजनच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये अगदी अलीकडे झालेली प्रगती आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यावर चर्चा करण्यासाठी जागतिक वैज्ञानिकधोरण, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील नेत्यांना या परिषदेने एकत्र आणले आहे.

हरित  हायड्रोजनचे उदयाला येणारे परिदृश्य आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आधारित उपाय यांची चाचपणी करण्याची संधी या परिषदेच्या निमित्ताने या क्षेत्रातील हितधारकांना मिळणार आहे, जेणेकरून  या क्षेत्रातील परिसंस्थेची शाश्वतता बळकट होईल.

या परिषदेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पाहता येईल.

आपल्याला हरित हायड्रोजन परिसंस्थेची स्थापना कशा प्रकारे करता येईल आणि हरित  हायड्रोजनच्या माध्यमातून कार्बनमुक्तीचे जागतिक लक्ष्य साध्य करण्यासाठी एका सुनियोजित दृष्टीकोनाची जोपासना करण्याच्या दृष्टीने शोध घेणे हे या परिषदेचे मूलभूत उद्दिष्ट आहे. हायड्रोजनचे उत्पादन, वितरण आणि त्याचे आनुषंगिक वापर यावर त्या विषयाशी संबंधित संशोधनविषयक संवादांव्यतिरिक्त या परिषदेत या क्षेत्रातील ग्रीन फायनान्सिंग, मनुष्यबळ कौशल्यवृद्धी आणि स्टार्टअप पुढाकार यावर देखील चर्चा होणार आहेत. या क्षेत्रातील सर्वोत्तम जागतिक पद्धतींच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि अध्ययन यांना या परिषदेमुळे चालना मिळणार आहे.

या परिषदेच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी, https://icgh.in येथे क्लिक करा. या ठिकाणी या परिषदेचे संक्षिप्त सादरीकरण पाहता येईल. परिषदेचे माहितीपत्रक येथे उपलब्ध आहे आणि परिषदेचे फ्लायर येथे आहे.

विविध क्षेत्रांमध्ये हरित  हायड्रोजनचा विकास आणि वापरसंशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय हरित  हायड्रोजन मिशन एक आराखडा उपलब्ध करून देत आहेः पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींसाठी एक संदेश जारी केला ज्याचे वाचन या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात करण्यात आले. या संदेशात पंतप्रधान म्हणाले, हरित  हायड्रोजन परिसंस्था स्थापन करण्यासाठी आणि नव्या पैलूंचे अध्ययन करण्यासाठी जागतिक वैज्ञानिक तज्ञ, औद्योगिक समुदाय यांच्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांना ही परिषद एक संधी उपलब्ध करून देत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या समस्यांना तोंड देणाऱ्या उपायांमध्ये शाश्वत ऊर्जेचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कार्बनमुक्तीसोबतच शाश्वत वृद्धीसाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्यामध्ये हरित  हायड्रोजन महत्त्वाची भूमिका बजावेल असे त्यांनी नमूद केले. निर्धारित लक्ष्य साध्य करण्याच्या 2030 या वर्षाच्या 9 वर्षे आधीच आपल्या ऊर्जाविषयक गरजेच्या 40 टक्के ऊर्जानिर्मिती बिगर जीवाश्म इंधनांपासून करून हे लक्ष्य साध्य करणारी भारत ही एकमेव  प्रमुख अर्थव्यवस्था आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. बायोइंधन, इथेनॉल, बायोगॅस, सौर आणि हरित हायड्रोजन यांसारख्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी आम्ही काम केले आहे. भारताने हरित  हायड्रोजन तंत्रज्ञानाला पुढे नेण्यात उल्लेखनीय टप्पे सर केले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये हरित  हायड्रोजनचा विकास आणि वापर, संशोधनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय हरित  हायड्रोजन मिशन एक आराखडा उपलब्ध  करून देत आहे. हरित आणि स्वच्छ पृथ्वीचा आपला दृष्टीकोन  प्रत्यक्षात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि आयसीजीएच 2023 अशा प्रकारच्या भागीदारींची जोपासना करणारा मंच उपलब्ध करून देत आहे. या विचारमंथनातून परस्परांसोबतचा संपर्क आणि संकल्पनांची देवाणघेवाण वाढेल. मानवतेच्या व्यापक फायद्यासाठी समृद्ध होणारी हरित  हायड्रोजन परिसंस्था निर्माण करण्याला पाठबळ देण्यात ही  परिषद यशस्वी ठरावी असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ऊर्जा संक्रमणामध्ये जागतिक आघाडीचे नेतृत्व करू शकेलअसे  काही कार्यक्रम भारताकडे आहेत : ऊर्जा आणि नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्री

केंद्रीय ऊर्जा आणि नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यावेळी म्हणाले की, आता आपल्याला अक्षय ऊर्जेकडे संक्रमण करण्याची आवश्यकता आहे, यावर संपूर्ण विश्‍वाचे एकमत झाले आहे. जगातील सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी भारत हा एक  देश आहे, आमचे दरडोई कार्बन उत्सर्जन जागतिक सरासरीच्या जवळपास एक तृतीयांश आहे."

हरित हायड्रोजनचा स्वीकार करण्यात  अग्रगण्य  म्हणून भारत उदयास येत आहे"

ऊर्जा आणि नूतन आणि अक्षय ऊर्जा मंत्री म्हणाले की, हरित हायड्रोजनचा स्वीकार करण्यात  अग्रगण्य  म्हणून भारत उदयास येत आहे. ते म्हणाले की, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत, 3.5 दशलक्ष टन हरित  हायड्रोजन उत्पादन क्षमता स्थापित करण्यासाठी प्रकल्पांची निर्मिती आधीच सुरू केली आहे."

"तुम्ही वीज आणि उर्जा विषयक  व्यवसाय करीत असाल तर, तुमच्यासाठी भारत  हे स्थान योग्य ठरणार आहे"

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्‍ये  गुंतवणुकीसाठी भारत हे जगातील सर्वात आकर्षक ठिकाण  म्हणून ओळखले जातेयासंदर्भात  उद्योगविषयक  अहवालामध्‍ये आलेल्या माहितीची नोंद  करून मंत्री म्हणाले की, यामुळे महत्वाचे निधी  भारतात गुंतवले जात आहेत.

या आणि आमच्याबरोबर भागीदार व्हा"

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्र्यांनी उद्योगांना  सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सरकार इंधन सेल्स , हायड्रोजन साठवणूक  आणि हरित  हायड्रोजन परिसंस्थेसाठी आवश्यक असलेल्या इतर तंत्रज्ञानासंबंधित  उद्योगाशी भागीदारी करेल.

N.Chitale/S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 (Release ID: 1937629) Visitor Counter : 214


Read this release in: English , Urdu , Hindi