सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
एनएसएसओ'ने एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या सहकार्याने 17 वा 'सांख्यिकी दिन' केला साजरा
सांख्यिकी दिन, 2023 ची संकल्पना 'शाश्वत विकास उद्दिष्टांवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय निर्देशांक आराखड्यासह राज्य निर्देशांक आराखड्याचे संरेखन' अशी आहे
Posted On:
29 JUN 2023 8:15PM by PIB Mumbai
मुंबई, 29 जून 2023
अर्थशास्त्र, नियोजन आणि सांख्यिकी क्षेत्रात (दिवंगत) प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकार 2007 पासून दरवर्षी त्यांची जयंती 29 जून रोजी "सांख्यिकी दिन" म्हणून साजरी करते. देशाच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये आकडेवारीची भूमिका आणि महत्त्व याविषयी, विशेषतः तरुण पिढीमध्ये जनजागृती करणे हा सांख्यिकी दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या वर्षी, सांख्यिकी दिन, 2023 साठी निवडलेली संकल्पना 'शाश्वत विकास उद्दिष्टांवर देखरेखीसाठी राष्ट्रीय निर्देशांक आराखड्यासह राज्य निर्देशांक आराखड्याचे संरेखन' अशी आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या फिल्ड ऑपरेशन विभाग , मुंबई ने आज मुंबईतील विद्याविहार येथील एस.के.सोमय्या महाविद्यालयात एस.के.सोमय्या महाविद्यालय, मुंबई च्या सहकार्याने सांख्यिकी दिन, 2023 यशस्वीरित्या साजरा केला.

सांख्यिकी दिनाच्या सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि भारतीय सांख्यिकीचे जनक दिवंगत प्रशांत चंद्र महालनोबिस यांना पुष्पांजली अर्पण करून झाली. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. आर.बी. बर्मन 'प्रमुख पाहुणे' म्हणून उपस्थित होते. भारताच्या वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी आणि एम.एल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर डोके हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या फिल्ड ऑपरेशन विभागाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय यांनी त्यांच्या बीजभाषणात "शाश्वत विकास उद्दिष्टांवर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रीय निर्देशांक आराखड्यासह राज्य निर्देशांक आराखड्याचे संरेखन' या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार आणि मते मांडली .
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. आर बी बर्मन यांनी आर्थिक विकासाच्या व्यापक मुद्द्यांवर तसेच विकास आणि समानता यावर भर दिला.
वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी धोरण आखणी आणि जबाबदार उत्पादनाद्वारे उद्योगाची शाश्वतता प्राप्त करण्याचा प्रयत्न म्हणून सर्व स्तरांवर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये मदत म्हणून सांख्यिकीय डेटाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली.
विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले एम.एल. डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर डोके यांनी सांख्यिकी आणि भारतीय सांख्यिकी प्रणालीच्या भूमिकेबाबत आपले विचार व्यक्त केले ज्यामुळे विविध शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्याचा मार्ग सुकर होईल. कार्यक्रमात सुमारे 120 हून अधिक जण सहभागी झाले होते ज्यात विभाग प्रमुख , शिक्षक आणि मुंबईतील विविध महाविद्यालयातील सांख्यिकीचे विद्यार्थी यांचा समावेश होता . एनएसएसओ आणि डीईएस चे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

या वर्षीच्या सांख्यिकी दिनाच्या संकल्पनेसंदर्भात, नमूद करण्यात येत आहे कि संयुक्त राष्ट्र आमसभेने आपल्या 70 व्या अधिवेशनात 17 शाश्वत विकास उद्दिष्टे आणि पुढील 15 वर्षांसाठी संबंधित 169 उद्दिष्टांचा विचार केला आणि त्यांना मान्यता दिली. 17 शाश्वत विकास उद्दिष्टे 1 जानेवारी 2016 मध्ये लागू झाली.सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टांवरील देखरेख सुलभ करण्यासाठी, जीआयएफच्या समन्वयाने शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी राष्ट्रीय निर्देशांक आराखडा (एनआयएफ ) विकसित केला आहे. मंत्रालये/विभाग, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, संयुक्त राष्ट्र संस्था , संशोधन संस्था आणि इतर हितधारकांशी सल्लामसलत करून एनआयएफ विकसित करण्यात आला. नवीन राष्ट्रीय निर्देशांक आराखड्याच्या आधारे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय टाईम सिरीज डेटासह वार्षिक प्रगती अहवाल जारी करते, ज्याची राष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी मदत होते.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936301)
Visitor Counter : 216