वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
परकीय व्यापार महासंचालनालयाने भारतातून नागरी वापरासाठी ड्रोन/मानवरहित एरियल व्हेइकल्सच्या (युएव्ही) निर्यातीसाठीचे धोरण केले उदार आणि सुलभ
ड्रोन/यूएव्हीसह उच्च-तंत्रज्ञानाच्या वस्तूंची निर्यात सुलभ करण्यावर परकीय व्यापार धोरण 2023 मध्ये भर देण्यात आल्याच्या अनुषंगाने हा निर्णय
Posted On:
23 JUN 2023 7:53PM by PIB Mumbai
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील परकीय व्यापार महासंचालनालयाने भारतातून नागरी वापरासाठी ड्रोन/यूएव्हीच्या निर्यातीचे धोरण अधिक सोपे आणि उदार केले आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण 2023 मध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या वस्तूंची निर्यात सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे, त्या अनुषंगाने आणि अण्वस्त्र प्रसारविरोधात भारताची आंतरराष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यात नागरी वापरासाठी भारतात उत्पादित ड्रोन/मानवरहित एरियल व्हेइकल्सच्या निर्यातीला प्रोत्साहन समाविष्ट आहे.
आयात आणि निर्यात वस्तूंच्या ITCHS वर्गीकरणासाठी अनुसूची 2 च्या परिशिष्ट 3 अंतर्गत SCOMET (स्पेशल केमिकल्स ऑर्गेनिझम्स मटेरियल इक्विपमेंट्स अँड टेक्नॉलॉजी) सूचीच्या श्रेणी 5B अंतर्गत सर्व प्रकारचे ड्रोन/युएव्ही निर्यातीवर यापूर्वी नियंत्रण/प्रतिबंध होता. ही यादी त्यांच्या संभाव्य दुहेरी-वापराच्या स्वरूपामुळे म्हणजे त्यांचा नागरी आणि लष्करी हेतूंसाठी वापर केला जातो, अशा विशिष्ट नियमांच्या अधीन असलेल्या वस्तूंच्या श्रेणीशी संबंधित आहे, अशा वस्तूंच्या निर्यातीसाठी SCOMET परवाना आवश्यक होता आणि उद्योगासमोर मर्यादित क्षमतेसह नागरी वापरासाठी असलेले ड्रोन निर्यात करण्याचे आव्हान होते.
धोरणावर सार्वजनिक/उद्योग क्षेत्राच्या सूचना मागवण्यासह सर्व भागधारकांशी झालेल्या व्यापक सल्लामसलतींच्या आधारे, नागरी वापरासाठी असलेल्या ड्रोन/यूएव्हीच्या SCOMET धोरणात डीजीएफटी अधिसूचना क्र. 14 दिनांक 23.06.2023 द्वारे ड्रोन/यूएव्हीच्या निर्यातीसाठी धोरण सुलभ आणि उदार करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
या धोरणातील बदलामुळे GAED अधिकृत परवानगी असलेल्या ड्रोन उत्पादक/निर्यातदारांना 3 वर्षांच्या वैधतेच्या कालावधीत, पोस्ट रिपोर्टिंग आणि इतर दस्तावेजांच्या आवश्यकतांच्या अधीन राहून नागरी हेतूसाठी असलेल्या प्रत्येक समान निर्यात शिपमेंटसाठी SCOMET परवान्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. यामुळे उद्योगांना प्रत्येक वेळी कोणत्याही प्रकारचे नागरी ड्रोन/यूएव्ही निर्यात करण्यासाठी SCOMET परवान्यासाठी अर्ज करण्याचे अनुपालन कमी होणार आहे.
यामुळे ड्रोन/यूएव्ही उत्पादक/उद्योगांना ड्रोनची निर्यात सुलभतेने करण्यास मदत होईल, व्यवसाय करणे सुलभ होईल आणि भारतातून निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. या धोरणातील बदल, भारताला ड्रोन/यूएव्हीचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून विकसित होण्यास चालना देईल आणि या क्षेत्रातील स्टार्ट-अप/नवीन ड्रोन उत्पादकांना जागतिक बाजारपेठेकडे वळण्यासाठी प्रोत्साहनही देईल.
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934904)
Visitor Counter : 133