सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ‘खादी योग मॅट’ उत्पादनाचा शुभारंभ
Posted On:
21 JUN 2023 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 21 जून 2023
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष, मनोज कुमार, यांनी खादीप्रेमींना बहुप्रतिक्षित 'खादी योग मॅट' म्हणजे खादीची सतरंजी भेट दिली. या खादी मॅटचा शुभारंभ करतांना, त्यांनी सांगितलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत दररोज नवीन आदर्श निर्माण होत आहेत. 'खादी योग मॅट' हा देखील त्याच मोहिमेचा एक भाग आहे. ही खादी सतरंजी पूर्णपणे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक आहे. त्यावर सर्व प्रकारची योगासने करता येतील अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 1.34 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल पार केल्याबद्दल, यावेळी मनोज कुमार यांनी केव्हीआयसीचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या लाखो खादी कारागिरांचे अभिनंदन केले.
'खादी योग मॅट' उद्घाटनापूर्वी मनोज कुमार यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत योगाभ्यास आणि प्राणायाम केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने योगगुरू म्हणून भारत जगाला योगशास्त्राचे धडे देत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ऐतिहासिक कामगिरीची त्यांनी माहिती दिली. PMEGP ने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी मोहिमेशी देशातील तरुणांना जोडण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही योजना 'नोकरी शोधण्याऐवजी रोजगार देणारे तरुण निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण करणारी योजना आहे,असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | S.Bedekar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1934224)
Visitor Counter : 133