आयुष मंत्रालय

मध्यप्रदेशातील जबलपूर येथे होणाऱ्या सामूहिक योग प्रात्यक्षिक शिबिरात उपराष्ट्रपती जगदीप धनखर होणार सहभागी

Posted On: 17 JUN 2023 7:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आयुष तसेच बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी घोषणा केली की, 21 जून 2023 रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जागतिक महोत्सवाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली, अमेरिकेत न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस (IDY) साजरा करण्यात येईल. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या (IDY2023) निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय उत्सवाचे नेतृत्व भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर करतील. विशेष म्हणजे नऊ वर्षांपूर्वी 2014मध्ये याच ठिकाणी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा व्हावा, यासाठी पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्रांना आग्रह केला होता आणि त्याचे महत्त्व पटवून दिले होते.

आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाचा प्रारंभ करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना सोनोवाल म्हणाले की, जसजसे आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जवळ येत आहोत, तसतसे आपण योग उत्सव साजरे करत आहोत, जी भारताच्या मानवतेला मिळालेल्या समृद्ध वारशाची सर्वात मोठी देणगी आहे, मोठ्या उत्साहाने आणखी एका नव्या वर्षात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमधील, संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयातून योग दिनाच्या सोहळ्याचे नेतृत्व करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नानंतर संयुक्त राष्ट्र संघाने (UN)  21 जून या दिवशी योग दिन साजरा करण्यास मान्यता दिल्याच्या घटनेला नऊ वर्षे झाली आहेत. सकारात्मक मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी या अद्भुत उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांनी जगातील सदस्य देशांना योगाचे महत्त्वही पटवून दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (IDY) या जागतिक उत्सवात सहभागी होऊन यावर्षीचा योग दिवस साजरा करून ते यावर्षीच्या योग दिनाच्या, 'वसुधैव कुटुंबकम' संकल्पनेला एक प्रकारे दृढ करत आहेत.

आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल पुढे म्हणाले की, यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2023 ची संकल्पना "योगा फॉर वसुधैव कुटुंबकम्" ही आमच्या 'एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य' या आकांक्षेचे यथायोग्य दर्शन घडवते. वसुधैव कुटुंबकम हा विचार भारतीय वारशासाठी अनादी काळापासून दिशादर्शक प्रकाश आहे आणि त्याभोवती भारतीयांची नैतिकता आणि सामाजिक-सांस्कृतिक जडणघडण विणली गेली आहे. मला प्रामाणिकपणे आशा आहे की, योगाच्या अभ्यासाद्वारे जागतिक समुदाय सध्याच्या आरोग्याच्या विविध समस्यांवर उपाय शोधण्यास सक्षम होईल.

21 जून या दिवशी, भारताचे उपराष्ट्रपती, जगदीप धनखर मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय जलशक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल, केंद्रीय महिला व बाल विकास तसेच आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई, केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते, मध्यप्रदेश सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सामान्य प्रशासन मंत्री इंदरसिंग परमार, मध्यप्रदेश सरकार मधील आयुष आणि जलसंपदा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)राम किशोर (नॅनो) कावरे, जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांच्या उपस्थितीत सामूहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.

या वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. ओशन रिंग ऑफ योगासारख्या कार्यक्रमाचा त्यात समावेश आहे, ज्यामध्ये भारतीय नौदलाची जहाजे जगभरातील 9 बंदरांमध्ये तैनात करण्यात येतील आणि सामायिक योग अभ्यास सादरीकरणात सहभागी होतील. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय देखील ज्या देशांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, त्या देशांमध्ये सामायिक योग अभ्यास सादरीकरण आयोजित करणार आहे. योगा फ्रॉम आर्क्टिक टू अंटार्क्टिकाहा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असून यामध्ये परराष्ट्र मंत्रालय आयुष मंत्रालयाच्या समन्वयाने संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांव्यतिरिक्त प्राईम मेरिडियन रेषेच्या आत आणि  लगतच्या भागांमध्ये असलेल्या देशांमध्ये योग अभ्यास आयोजित करणार आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशातही भूविज्ञान मंत्रालयाच्या समन्वयाने आर्क्टिकमधील हिमाद्रीया भारतीय संशोधन तळावर आणि अंटार्क्टिकामधील भारतीया भारतीय संशोधन तळावर योग सादरीकरण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  

योग भारतमाला हा कार्यक्रम देखील आयोजित होणार असून त्यामध्ये भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूसेना आयटीबीपी, बीएसएफ, बीआरओ यांच्यासोबत एकत्रित पद्धतीने योग सादरीकरणाची एक साखळी तयार करतील. योग सागरमाला या कार्यक्रमात भारताच्या किनारपट्टीवर योग सादरीकरण होईल. आयएनएस विक्रांतच्या फ्लाईट डेक वर योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. यावर्षी राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय योग दिनी ग्रामीण स्तरावर योग दिवस साजरा करणाऱ्या हर आंगन योगया कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सरपंचांना त्यांच्या जवळच्या अंगणवाड्यांमध्ये, आरोग्य आणि निरामयता केंद्रांमध्ये आणि शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यासाठी पत्र लिहिले आहे.   

याशिवाय दोन लाख सामायिक सेवा केंद्रे, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत आयुष आरोग्य व निरामयता केंद्रे, आयुष ग्राम आणि अमृत सरोवरांच्या परिसरात देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद(ICCR) आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने आयुष मंत्रालयाने माय जीओव्ही डॉट इनया प्लॅटफॉर्मवर योगा माय प्राईडया छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले आहे.

आयुष मंत्रालयाने कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्याच्या, ताजेतवाने करण्याच्या आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने वाय ब्रेकया संकल्पनेचा शुभारंभ केला होता. या वर्षी वाय ब्रेक@वर्कस्पेस- योगा इन चेयरही संकल्पना सुरू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत खुर्चीत बसल्याजागी योग करता येईल. भारत सरकारची सर्व मंत्रालये/विभाग यांना सर्व कर्मचाऱ्यांना खुर्चीमध्येच योगसाधना करण्याची सूचना देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. 

***

S.Pophale/S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933227) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Assamese , Telugu