राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्बियामध्ये दाखल ; बेलग्रेडमधील भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्रांना केले संबोधित
Posted On:
07 JUN 2023 9:51PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल (7 जून, 2023) सर्बियातील बेलग्रेड येथे पोहोचल्या. सध्या राष्ट्रपती परदेश दौ-यावर असून सुरिनामनंतर आता दौ-याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्या सर्बियाला भेट देत आहेत. भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच सर्बिया दौरा आहे. एका विशेष समारंभात सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुकिक यांनी बेलग्रेडच्या निकोला टेस्ला विमानतळावर राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले . यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी गांधीजेवा मार्गावर असलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याला आदरांजली वाहिली.
यानंतर संध्याकाळी, राष्ट्रपतींनी बेलग्रेडमध्ये सर्बियातील भारताचे राजदूत संजीव कोहली यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भारतीय समुदाय आणि भारताच्या मित्रमंडळींबरोबर संवाद साधला.
याप्रसंगी संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, भारत आणि सर्बिया हे दोन्ही प्राचीन देश आहेत. आधुनिक युगात, सर्बियाशी भारताचे संबंध विशेषत: अलिप्त राष्ट्र चळवळीच्या संदर्भात मजबूत झाले आहेत. भारत आणि सर्बियाने नेहमीच परस्परांच्या मूलभूत हितसंबंधांविषयी सामंजस्याची भूमिका कायम ठेवली आहे. राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, या द्विपक्षीय संबंधांच्या आधारे, या दौऱ्यादरम्यान सर्बियाच्या नेत्यांशी संवाद साधण्यास त्या उत्सुक आहेत .
राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारताच्या शाश्वत विकास सहकार्य कार्यक्रमांमध्ये सर्बिया एक महत्वपूर्ण भागीदार आहे. जागतिक स्तरावर भारत एक जबाबदार विकास भागीदार, प्रथम प्रतिसाद देणारा देश आणि ‘ग्लोबल साऊथ' चा आवाज म्हणून ओळखला जातो. यातील प्रत्येक पैलू अग्रगण्य शक्ती बनण्याचा आमचा प्रयत्न प्रतिबिंबित करतो, असे त्या म्हणाल्या. हवामान कृती असो , दहशतवादा विरोधी लढा असो , कनेक्टिव्हिटी, सागरी सुरक्षा, आर्थिक समावेशन आणि अन्न सुरक्षा असो, या मुद्द्यांवर भारताने बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला.
राष्ट्रपतींनी भारताच्या सर्बियन मित्रांची भारताप्रति श्रद्धा आणि प्रेमाबद्दल प्रशंसा केली . भारत आणि सर्बिया यांच्यातील मैत्री आणि सामंजस्य अधिक दृढ करण्यात त्यांची भूमिका मोलाची असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा.
***
Sushuma K/Suvarna B/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930699)
Visitor Counter : 147