अर्थ मंत्रालय

तामिळनाडूतील दोन प्रकरणांमध्ये महसूल गुप्तचर संचालनालय आणि भारतीय तटरक्षक दलाने 20.21 कोटी रुपयांचे 32 किलो सोने केले जप्त

Posted On: 01 JUN 2023 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2023

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI), एका संयुक्त कारवाईत, भारतीय तटरक्षक दल (ICG) मंडपम आणि रामनाड सीमाशुल्क, प्रतिबंधक विभागाच्या मदतीने दोन मासेमारी नौका अडवून 32.869 किलो परदेशी स्त्रोत असलेले सोने जप्त केले. या सोन्याची किंमत 20.21 कोटी रुपये असून ते श्रीलंकेतून तस्करी करुन तटवर्ती भागातून भारतात आणले जात होते.

विविध टोळ्यांद्वारे मासेमारी नौकांचा वापर करून श्रीलंकेतून तामिळनाडूतील रामनाड येथील वेधलाई किनारपट्टीद्वारे परदेशी सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चेन्नई विभागाने विशिष्ट विकसित गुप्तचरांकडून मिळवली होती. त्यानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने किनारपट्टीवर व्यापक पाळत ठेवली आणि संशयित मासेमारी नौका शोधून काढली.

समुद्रात पाठलाग केल्यानंतर 30 मे 2023 रोजी सकाळी महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी आणि तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने एक संशयित मासेमारी नौका अडवली. नौका अडवल्यानंतर मासेमारी बोटीतील व्यक्तींनी प्रतिबंधित पार्सल समुद्रात टाकले. 7.13 कोटी रुपये किंमतीचे 11.6 किलो परदेशी सोने असलेले प्रतिबंधित पार्सल तटरक्षक दलाच्या तज्ञ पाणबुड्यांच्या मदतीने समुद्राच्या तळातून परत मिळवण्यात आले आणि सोन्याच्या तस्करीसाठी वापरण्यात आलेली बोट देखील जप्त करण्यात आली.

30 मे 2023 च्या रात्री, दुसरी संशयित मासेमारी बोट शोधून काढण्यात आली. त्यानंतर, महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी भारतीय सीमाशुल्क गस्ती नौकेवरुन संशयित मासेमारी बोटीकडे रवाना झाले. बोटीवरचे लोक किनाऱ्यावर थांबलेल्या दोन व्यक्तींकडे हे पार्सल सुपूर्द करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी दूरून पाहिले. भारतीय सीमाशुल्क गस्ती बोट समुद्राच्या बाजूने आपल्या जवळ येत असल्याचे दिसल्यावर किनाऱ्यावरील या दोन्ही व्यक्तींनी तस्करीचे सोने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या अधिकाऱ्यांनी अंधारातही त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

 

 

या व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या जॅकेटमध्ये आठ पाकिटे आढळून आली. सविस्तर तपासणीनंतर या व्यक्तींकडून 13.08 कोटी रुपये किमतीचे 21.269 किलो परदेशी सोने जप्त करण्यात आले. यासोबतच, सोन्याची तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली बोट आणि एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1929210) Visitor Counter : 102


Read this release in: English , Urdu , Hindi