रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रावर आधारित आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन


डॉ.मनसुख मांडवीय यांनी या परिषदेत राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे धोरण 2023 केले जारी  तसेच वैद्यकीय साधनां उपकरणांसाठी निर्यात प्रोत्साहन मंडळ आणि सामान्य सुविधा योजनेसाठी वैद्यकीय उपकरणे समूह विकासासाठी मदत योजनेची केली सुरुवात

Posted On: 26 MAY 2023 5:56PM by PIB Mumbai

 

भारतातील औषध निर्माण उद्योग अत्यंत सशक्त, लवचिक आणि प्रतिसादक्षम आहे. याच कारणामुळे आपण महामारीच्या काळात आपल्या देशाच्या गरजा तर पूर्ण केल्याच पण त्याच सोबत आपण त्या काळात जगातील दीडशे देशांना औषधांचा पुरवठा करू शकलो,” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले आहे. औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रावर आधारित आठव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ.मांडवीय यांच्या हस्ते झाले त्या समारंभात ते बोलत होते.केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा देखील यावेळी उपस्थित होते.

भारताला औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्रात दर्जेदार वैद्यकीय उत्पादनांच्या निर्मितीचे केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या सहकार्यासह केंद्रीय औषधनिर्माण विभागाने, नवी दिल्ली येथे ही दोन दिवसीय परिषद  आयोजित केली आहे.

या कार्यक्रमात डॉ.मांडवीय यांनी राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे धोरण 2023 जारी केले तसेच त्यांनी वैद्यकीय उपकरणांसाठी निर्यात प्रोत्साहन मंडळाचे उद्घाटन केले.त्याबरोबरच, केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमात सामान्य सुविधा केंद्रांसाठी वैद्यकीय उपकरणे समूह विकासासाठी मदत’(एएमडी-सीएफ) नामक योजनेची देखील सुरुवात करून दिली.

या क्षेत्रातील अमर्याद क्षमता अधोरेखित करत डॉ.मांडवीय म्हणाले, “जगाचे औषधनिर्मिती केंद्र म्हणून प्रसिद्धी पावलेले भारतातील औषधनिर्मिती क्षेत्र येणाऱ्या वर्षांमध्ये औषधांची देशांतर्गत गरज भागविण्यात योगदान देत राहील तसेच जागतिक पातळीवरील औषधांची मागणी पूर्ण करण्यात देखील यशस्वी होईल.ते पुढे म्हणाले, “जर आपल्याला जगाचे औषधनिर्मिती केंद्र म्हणून नावलौकिक कायम राखायचा असेल तर आपल्या देशात निर्मित औषधी उत्पादनांच्या  दर्जाबाबत हलगर्जीपणा करून चालणार नाही.तसेच आपली उत्पादने किफायतशीर आणि जागतिक बाजारातील स्पर्धेत टिकून राहणारी असली पाहिजेत.”  

उद्योगस्नेही धोरणे आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणारी परिसंस्था यांच्या स्वीकारासह औषधनिर्मिती क्षेत्राला पाठींबा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे यावर भर देत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “सरकार विकासासाठी समग्र दृष्टिकोनाचा स्वीकार करत असून सर्वसमावेशक, दीर्घकालीन धोरणात्मक परिसंस्था उभारणे शक्य करण्यासाठी भागधारकांनी   केलेल्या सखोल सल्लामसलती विचारात घेत आहे.केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय यांनी यावेळी बोलताना संशोधन आणि विकास क्षेत्रातील गुंतवणुक तसेच या क्षेत्रासाठी चैतन्यपूर्ण परिसंस्था उभारण्यास मदत करणाऱ्या अभिनव संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करण्यासह कार्यक्षम उत्पादनक्षमता निर्माण करणे यावर देखील भर दिला.

वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्योगाला पाठबळ पुरविण्यात सरकारच्या भूमिकेवर अधिक भर देत केंद्रीय मंत्री म्हणाले, “औषधे आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रासाठीच्या  उत्पादनाशी निगडीत अनुदान योजनेच्या स्वरूपातील विविध उपक्रमांनी, या क्षेत्रात वृद्धी आणि विकासाला चालना दिली आहे. तसेच या उपक्रमांनी औषध निर्मिती क्षेत्राला जेनेरिक औषधांपासून उच्च मूल्याच्या पेटंट औषधांच्या उत्पादनापर्यंत मूल्य साखळीमध्ये विकसित होण्याची तसेच इतर अनेक बाबींसह पेशी आणि जनुकीय उपचार, अचूकपणे कार्य करणारी औषधे यांच्यासारख्या नव्या तंत्रज्ञानासह कार्य करण्याची क्षमता प्रदान केली आहे.या क्षेत्रात दडलेली क्षमता   पूर्णपणे वापरण्यासाठी  ती  योग्य दिशेने प्रवाहित करणे आणि त्यासाठी पुरेशा प्रमाणात साधनसंपत्तीचा पुरवठा करणे आवश्यक आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

उद्घाटनपर सत्रानंतर, डॉ.मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये या  क्षेत्रातील सध्याच्या समस्या तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर या क्षेत्राच्या वाढीचे मार्ग यासंदर्भात भागधारकांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीय त्यांनी यावेळी उपस्थित भागधारकांशी सखोल चर्चा केली आणि त्यांना, धोरण, आर्थिक, संशोधन आणि नवोन्मेष अशा विविध आघाड्यांवर नव्या संकल्पना शोधण्यासाठी विचारमंथन करण्याची विनंती केली.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927613) Visitor Counter : 115


Read this release in: English , Urdu , Hindi