भूविज्ञान मंत्रालय

भारत लवकरच सर्वात वेगवान महासंगणक घेणार असून येत्या मार्चपासून तो कार्यान्वित होईल, अशी केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती

Posted On: 24 MAY 2023 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मे 2023

 

भारत लवकरच 900 कोटी रुपयांचा सर्वात वेगवान महासंगणक (सुपरकॉम्प्युटर) घेणार आहे आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे  असे केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ) या संशोधन केंद्राला त्यांनी भेट दिली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या केंद्राला दिलेली ही पहिलीच भेट होती. या भेटीदरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या महासंगणकामुळे हवामानाचे अंदाज अधिक परिपूर्णपणे देता यावेत यासाठीची हवामान निरीक्षण यंत्रणा भारत प्राप्त करेल, असे त्यांनी सांगितले.

  

“नवीन संगणक 12 ते 6 किमी पर्यंत अचूक सुधारित अंदाज देऊ शकतो. 6.8 पेटाफ्लॉप्स कामगिरीसह क्रे एक्ससी-40 सुपरकॉम्प्युटर ‘मिहिर’ हा सध्या भारतात असलेला सर्वात वेगवान महासंगणक आहे. त्याच्या तुलनेत  नवीन सुपरकॉम्प्युटरमध्ये 18 पेटाफ्लॉप्सची म्हणजे जवळपास तिप्पट क्षमता असेल,” असे रिजिजू  म्हणाले. "या जागतिक दर्जाच्या केंद्रातील सुविधांचा सर्व क्षेत्रांना, समाजातील सर्व घटकांना फायदा होईल, खरेतर देशातील प्रत्येक व्यक्तीला या संस्थेकडून थेट लाभ मिळणार आहे," असे ते पुढे म्हणाले.

   

हवामानाचा अंदाज देण्याची भारताकडची क्षमता दिवसेंदिवस सुधारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरात लक्षणीय प्रगती केली आहे. आपण शेजारच्या आणि त्यापलीकडे असलेल्या देशांनाही हवामानाचा अंदाज देत आहोत, असे ते म्हणाले.

एनसीएमआरडब्ल्यूएफच्या परिसरात सेंटर ऑफ एक्सिलन्स इन वेदर अण्ड क्लायमेट मॉडेलिंग हे केंद्र बिमस्टेकच्या('बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन'चे दक्षिण आशियातील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका हे पाच तसेच आग्नेय आशियातील म्यानमार आणि थायलंडसह दोन देश असे सात सदस्य देश आहेत) सेंटर ऑन वेदर अँड क्लायमेट (बीसीडब्ल्यूसी)चे यजमान केंद्र आहे.

  

एनसीएमआरडब्ल्यूएफ ही जगातील अशा प्रकारची आघाडीची संस्था आहे. ही संस्था जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, एनसीएमआरडब्ल्यूएफचे प्रमुख डॉ.व्ही.एस. प्रसाद आणि इतर वरिष्ठ शास्त्रज्ञांनी रिजिजू यांना माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927057) Visitor Counter : 230


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu