दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'संचार से सशक्तिकरण': दूरसंचार विभागाने साजरा केला जागतिक दूरसंचार दिन

Posted On: 17 MAY 2023 7:49PM by PIB Mumbai

मुंबई, 17 मे 2023

जागतिक दूरसंचार दिनानिमित्त (17 मे) आज मुंबईतील कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात  संचार से सशक्तिकरण (दूरसंचाराद्वारे सक्षमीकरण) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लोकांच्या जीवनात दूरसंचार क्षेत्राने दिलेले सकारात्मक योगदान विषद करण्यात आले. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाची धोरणे आणि योजनांनी बजावलेल्या भूमिकेवर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.

दूरसंचार विभागाच्या संचार लेखा  नियंत्रक (महाराष्ट्र आणि गोवा) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.  कर्मचाऱ्यांशी/ विद्यार्थ्यांशी संवाद साधणे हा या उपक्रम आयोजित करण्यामागचा हेतू होता. समुदाय सक्षमीकरणात दूरसंचार क्षेत्राचा सकारात्मक परिणाम, समृद्ध मानवी अनुभव  तसेच शाश्वत विकास आणि वाढीतील या क्षेत्राचे योगदान या विषयांवर चर्चा करून त्याचे महत्त्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमातून करण्यात आला. महिला, आदिवासी आणि ग्रामीण लोकसंख्येच्या सक्षमीकरणामध्ये केंद्र सरकार / दूरसंचार विभागाची धोरणे आणि योजनांनी बजावलेल्या भूमिकेवर कार्यक्रमाचा विशेष भर होता.

दूरसंचार विभागाच्या नियंत्रक संचार लेखा (महाराष्ट्र आणि गोवा) विभा गोविल मिश्रा या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. या कार्यक्रमासाठी ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ब्रज किशोर मिश्रा, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमात 50हून अधिक विद्यार्थी/कर्मचारी सहभागी झाले होते. संपूर्ण समाजाच्या सक्षमीकरणासाठी दूरसंचार क्षेत्राची  भूमिका आणि तरुणांच्या शिक्षणासाठी दूरसंचार तंत्रज्ञानाच्या योग्य वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. समाजाच्या भल्यासाठी दळणवळणाची व्याप्ती कशी वाढवता येईल यावर प्रतिक्रिया देण्यासाठी / त्यांचे विचार सामायिक करण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित केले गेले. दूरसंचार योजना आणि धोरणांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धाही घेण्यात आली.

सहभागी स्पर्धकांना स्मृतीचिन्हांसह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1924968) Visitor Counter : 98


Read this release in: English