विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताला गेल्या 9 वर्षांत परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार करणारा देश म्हणून जागतिक स्तरावर ओळख लाभली आहे- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी वैद्यकीय संघटना सरकारचे सहकार्य घेऊ शकतात: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
13 MAY 2023 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2023
गेल्या 9 वर्षांत परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार करणारा देश म्हणून भारताला जागतिक स्तरावर पसंती लाभली आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून लागू केलेल्या अनेक पथदर्शी आरोग्य सेवा सुधारणा आणि सक्षम तरतुदींमुळे हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमधील एम्स कल्याणी इथे आयोजित नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन (NMO) या राष्ट्रीय वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या 42 व्या वार्षिक परिषदेत, ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना, स्वतः प्रसिद्ध मधुमेह तज्ञ आणि प्राध्यापक असलेले डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, कोणत्याही प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी पूर्वी भारत ओळखला जात नव्हता मात्र आज जगातील महत्त्वाचे प्रमुख लसीकरण केंद्र म्हणून भारताचे नाव झाले आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी, वैद्यकीय संघटनांनी सरकारी संस्थांचे सहकार्य घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि अगदी युरोपीय देशांसह इतर अनेक देशांतील रुग्ण भारतातील सरकारी रुग्णालयांसह प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत आहेत, हे आज अगदी ठळकपणे दिसून येत आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. जगात इतरत्र उपलब्ध असलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा भारतात फक्त उपलब्धच आहेत असे नाही, तर त्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत आणि जागतिक दर्जाचे उपचार मिळाल्यामुळे हे सर्वजण समाधानाने परतले आहेत, असेही ते म्हणाले.
भारतात होत असलेल्या वैद्यकीय संक्रमणाचे साक्षीदार ठरलेल्या वैद्यकीय पिढीतील आपण एक आहोत, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला तो काळ, वैद्यकीय उपचारांमध्ये प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) समावेश नसलेला अथवा वापर होत नसल्याचा काळ होता आणि त्यांच्या आधीची पिढी याच काळात वाढली होती, याची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. प्रतिजैविकांचे उपचारांत आगमन झाल्यानंतर, संसर्गजन्य रोगांवर कमी-अधिक प्रमाणात मात करता येऊ लागली. त्यानंतर मग मधुमेह, हृदयविकार, कोलेस्टेरॉल अशा आधुनिक जीवनशैलीमुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी ठळकपणे आढळून येऊ लागल्या, सोबतच सर्वसाधारण भारतीयांचे सरासरी आयुर्मानही वाढू लागले. मात्र आयुर्मान वाढल्यामुळे वाढलेल्या वृद्धापकाळातील आजारांचाही अंतर्भाव, भारताला भेडसावणाऱ्या आजारांच्या मोठ्या यादीत झाला, असे ते म्हणाले.
‘आपले आरोग्य, आपला निसर्ग, आपली संस्कृती’ या आजच्या परिषदेच्या संकल्पनेबाबत बोलताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, ही संकल्पना 21 व्या शतकातील भारताच्या गरजांशी खूपच सुसंगत आहे. पर्यावरणासाठी ‘लाइफ’ हा मंत्र, पंतप्रधानांनी आपल्याला दिला आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षात या उद्दिष्टाचा पाठपुरावा करत, सरकारने आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
* * *
R.Aghor/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1923923)
Visitor Counter : 164