संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राच्या भूमीमध्‍ये शौर्य, पराक्रम आणि आध्यात्मिकता यांचा संगम - लोकसभा सभापती


युवा वर्गामध्‍ये असलेली ऊर्जा आणि त्यांचे परिश्रम यामुळेच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य होईल- लोकसभा सभापती

भारताची संस्कृती आणि मूल्ये मानवतावादी दृष्टीकोन आणि संवेदनशीलतेवर आधारलेली आहेत- लोकसभा सभापती

हवामान बदलाशी संबंधित विषयांचा अभ्यास होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने करण्याची गरज आहे- लोकसभा सभापती

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या 11 व्या दीक्षांत समारंभात लोकसभा सभापतींनी केले मार्गदर्शन

Posted On: 11 MAY 2023 7:45PM by PIB Mumbai

मुंबई/अहमदनगर, 11 मे 2023

महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असलेले लोकसभा सभापती  ओम बिर्ला यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या 11 व्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

महाराष्ट्र ही शौर्य, धैर्य, पराक्रम  आणि आध्यात्मिकतेचा संगम असलेली  भूमी आहे  जगभरात तिच्या सुपुत्रांच्या उल्लेखनीय योगदानामुळे या भूमीला ओळखले जाते असे, ओम बिर्ला यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा  संस्थेचे कौतुक  करताना बिर्ला म्हणाले की सहकारी चळवळीमुळे आणि शेतकरी आणि कामगारांची सेवा करण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली आणि देशाच्या विविध भागांमध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मानवतावादी सेवा करण्याचे उदात्त कार्य केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. शिक्षण पूर्ण करून पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बिर्ला यांनी हे विद्यार्थी एका नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत, असे सांगितले. महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण-प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष समाजासाठी समर्पित करावे, असे आवाहन  बिर्ला यांनी केली.

वैद्यकीय विज्ञानातील नव्या संशोधनाच्या संदर्भात विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 5जी तंत्रज्ञानासंदर्भात समकालीन कालखंडात डॉक्टरांना अत्याधुनिक संशोधनाची सातत्याने माहिती घेत तंत्रज्ञानासंदर्भात जागरुक राहिले पाहिजे. डॉक्टरांसाठी शिकण्याची प्रक्रिया कधीही संपत नसते असा दृष्टीकोन मांडत बिर्ला यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगाने आपले शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यांचा वापर करून मानवतेच्या सेवेसाठी वाहून घेतले पाहिजे.

सध्याच्या परिस्थितीत वैद्यक शास्त्र तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाले असले तरी भारताची अध्यात्मिक संस्कृती आणि मूल्ये ही मानवतावादी दृष्टीकोन आणि संवेदनशीलतेवर आधारलेली आहेत ,हे समजून घेतले पाहिजे, त्यामुळे  डॉक्टरांनी आपले कर्तव्य बजावताना  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे सांगतानाच, प्रत्येक वेळी रुग्णांना सर्वोतपरी  मदत करण्याचा सल्ला  बिर्ला यांनी विद्यार्थ्यांना दिला.

योग, आयुर्वेद आणि इतर भारतीय वैद्यक पद्धतींचा संदर्भ देत, सर्वांगीण उपचारांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला जाऊ शकतो असे मत  बिर्ला यांनी व्यक्त केले.डॉक्टरांना रुग्णांच्या संदर्भातील  प्रत्येक पैलूची  माहिती असली पाहिजे आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत यावर बिर्ला यांनी भर दिला.

आजच्या काळात, हवामान बदल आणि त्याचे परिणाम वैद्यकीय विज्ञान आणि आरोग्य सेवेशी संबंधित आहेत आणि म्हणूनच डॉक्टरांनी केवळ उपचारच न देता बदलत्या हवामानाचा अभ्‍यास करतानाही  हवामान बदलाशी संबंधित समस्यांचा अभ्यास केला पाहिजे.  विशेषत: संभाव्य   आजारांच्या  संबंधात हवामान बदलाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी तरतुदी सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे बिर्ला यांनी सांगितले.

भारत जर निरोगी राहिला तर तो प्रगती आणि समृद्धीकडे वेगाने वाटचाल करेल त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालचे सर्वजण निरोगी राहतील हे सुनिश्चित  करण्यासाठी  सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असा सल्ला बिर्ला यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. तंत्रज्ञान, शेती, शिक्षण, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात भारतात नवनवीन बदल होत आहेत; भारत अनेक क्षेत्रात जगात आघाडीवर आहे.असेही ते म्हणाले. आगामी  काळात भारत प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असेल यादृष्टीने तरुणांचे सामर्थ्य असायला हवे. विकसित भारत घडवण्याची महत्त्वाची जबाबदारी तरुणांवर आहे, त्यांच्या मेहनतीने आणि उर्जेने विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वाला जाईल , असेही बिर्ला यांनी सांगितले.  

 

 

S.Bedekar/Shailesh/Sonal C/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1923478) Visitor Counter : 197


Read this release in: English