सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

राष्ट्रीय एमएसएमई परिषदेची पहिली बैठक नवी दिल्ली इथे संपन्न, एमएसएमई कार्यप्रदर्शन कार्यक्रम (रॅम्प) विकास आणि गती, यावर विशेष भर

Posted On: 10 MAY 2023 8:06PM by PIB Mumbai

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने 10 मे 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एमएसएमई परिषदेची पहिली बैठक आयोजित केली होती. राष्ट्रीय एमएसएमई परिषद, ही आंतर-केंद्रीय मंत्रालये/विभागीय समन्वय, केंद्र- राज्य समन्वय आणि रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स (RAMP), अर्थात एमएसएमई कार्यप्रदर्शन कार्यक्रम विकास आणि गती, या कार्यक्रमासह एमएसएमई क्षेत्रात अनिवार्य केलेल्या सुधारणांवर सूचना देण्यासाठी /निरीक्षण करण्यासाठी, एक प्रशासकीय आणि कार्यात्मक संस्था म्हणून स्थापन करण्यात आली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2022 मध्ये सुरू केलेल्या केंद्रीय क्षेत्र योजनेच्या "रेझिंग अँड एक्सेलरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स" अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. RAMP कार्यक्रमाचे उद्दिष्ट, बाजार आणि पतपुरवठ्यात सुधारणा करणे, संस्थांना बळकट करणे, केंद्र आणि राज्यामधील प्रशासन, केंद्र-राज्य संबंध आणि भागीदारी सुधारणे, विलंबित देयके आणि हरित एमएसएमई निर्माण करण्यामधील समस्यांचे निराकरण करणे, हे आहे.

 

केंद्रीय एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सहभागींना संबोधित करताना, त्यांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना एमएसएमई क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले, जेणेकरून त्यांच्या प्रयत्नांमुळे या क्षेत्रामधील उत्पन्न आणि रोजगार वाढेल आणि देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल. 

एमएसएमई राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, हे यावेळी राष्ट्रीय एमएसएमई परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनण्यासाठी एमएसएमईंना पाठिंबा देण्याच्या गरजेचा त्यांनी पुनरुच्चार केला, आणि केंद्र आणि राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये समन्वय विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय एमएसएमई परिषदेची यामध्ये महत्त्वाची भूमिका असेल आणि यामुळे केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नांचे एकत्रीकरण होईल. 

या बैठकीला केंद्रीय मंत्रालये/विभागांचे सचिव आणि 24 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील प्रधान सचिव आणि नोडल अधिकारी उपस्थित होते. एमएसएमई सचिव बीबी स्वेन यांनी परिषदेला संबोधित करताना, राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींना या प्रकल्पात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि एमएसएमई विकासाच्या राष्ट्रीय एमएसएमई उद्दिष्टाचा एक भाग होण्यासाठी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आणि प्रोत्साहन दिले. 

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींनी या प्रकल्पाबद्दल उत्साह दर्शवला आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

***

Jaydevi/R Agashe/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1923302) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi