रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Posted On: 09 MAY 2023 11:56AM by PIB Mumbai

शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. सूर्योदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिफ्टिंग ऑफ साऊंड या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आज मुंबईत कर्णबधीर व्यक्तींना श्रवणयंत्र देण्याचा उपक्रम झाला, त्यावेळी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जन्मतः व्यंग असणाऱ्या किंवा काही आजारपणामुळे किंवा अपघातामुळे दिव्यांग झालेल्या निराधार व्यक्तींना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सहाय्य करण्यासाठी सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख गडकरी यांनी केला. आपल्या महाराष्ट्रभूमीला साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची मोठी देणगी आहे, अनेक संतांनी आपल्या वचनांमधून समाजातल्या वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे. त्याच वचनांनुसार गेली कित्येक वर्ष आपण देखील सामाजिक कार्यात सक्रिय असून नुकतंच आपण ४० हजार दिव्यांग व्यक्तींना   साहित्य वाटप केलं.तसेच  ज्यांना पाय नाहीत त्यांना कृत्रिम पाय देण्याचा उपक्रम राबवत आहोत, असे ते म्हणाले. 

तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण लोकांचं जीवन बदलू शकतो. शोषित आणि पीडित व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावं,  त्यांना एक नवीन जीवन मिळावं यासाठी सातत्याने  कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे गडकरी यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला गायिका अनुराधा पौडवाल आणि संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

***

JaydeviPS/Bhakti/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1922701) Visitor Counter : 210


Read this release in: English