पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
चित्ता प्रकल्प
Posted On:
08 MAY 2023 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2023
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) सूचनेनुसार, वन्यप्राण्यांशी संबंधित तज्ज्ञांच्या एका पथकाने, 30 एप्रिल, 2023 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली आणि तिथल्या चित्ता प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्रकल्पाशी संबंधीत सर्व पैलूंची तपासणी करून, यासंदर्भातला सर्वंकष अहवालही या पथकाने दाखल केला आहे. या पथकात दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय विज्ञान विद्याशाखेचे शिक्षक आणि पशुवैद्यकीय वन्यजीव तज्ज्ञ एड्रियन टॉर्डिफ, दक्षिण आफ्रिकेच्या द मेटापोप्युलेशन इनिशिएटिव्हअंतर्गतच्या चित्ता मेटापॉप्युलेशन प्रोजेक्टचे (चित्त्यांच्या संख्येतील चढउतारांसंबंधी प्रकल्प) व्यवस्थापक व्हिन्सेंट व्हॅन डॅन मर्व, देहरादूनमधील भारतीय वन्यजीव संस्थेमधील प्रमुख शास्त्रज्ञ कमर कुरेशी आणि नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे वन महानिरीक्षक अमित मलिक यांचा समावेश होता. चित्त्यांचे भारतातील अस्तित्व नष्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा स्थापित करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत, सप्टेंबर 2022 आणि फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या वीस चित्त्यांचे कुनो राष्ट्रीय उद्यानात केलेले स्थलांतर यशस्वी झाले असल्याचे निरीक्षण या पथकाने नोंदवले आहे. चित्त्यांच्या संवर्धन उपक्रमातील जागतिक प्रयत्नांमध्ये आपले योगदान म्हणून, चित्त्यांसाठी कायदेशीररित्या संरक्षित क्षेत्रात 100,000 चौरस किलोमीटरपर्यंतचे अधिवासाचे क्षेत्र, आणि यासोबतच आणि 600,000 चौरस किलोमीटर इतके अतिरिक्त अधिवासयोग्य क्षेत्र या प्रकल्पाअंतर्गत उपलब्ध करून दिले गेले आहे. मांसाहारी प्राण्यांच्या श्रेणीत येणारे चित्ते पर्यावरणीय साखळीतला समतोल राखण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे भारतात त्यांचे पुनरुज्जीवन करण्यामुळे इथल्या पर्यावरणीय परिसंस्थेच्या स्थितीत अधिक चांगली सुधारणा घडून येईल अशी अपेक्षा आहे. चित्ता हा अत्यंत आकर्षक वन्यप्राणी असून, त्यांच्या अस्तित्वामुळे नैसर्गिक पातळीवर पर्यावरणीय संरक्षणाची प्रक्रिया अधिक बळकट होऊ शकते, आणि याआधी दुर्लक्षीत असलेल्या क्षेत्रांमधील पर्यावरणीय पर्यटनात वृद्धी होऊ शकते. यामुळे संवर्धनाच्यादृष्टीने भारताने आखलेल्या उद्दीष्टांच्या पुर्ततेलाही मोठी मदत मिळू शकते.
या पथकाने ठराविक अंतरावरूनच बहुतांश चित्त्यांचे निरीक्षण आणि पाहणी केली, आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठीची सध्याची कार्यपद्धती आणि नियमनांचे मूल्यमापन केले. या सर्व चित्त्यांची शारीरिक स्थिती उत्तम असून, ते नियमितपणे ठराविक कालावधीने शिकार करत असून, आपल्या नैसर्गिक वृत्तीनेच वावर करत असल्याचे निरीक्षणही या पथकाने नोंदवले आहे.
S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922564)
Visitor Counter : 241