आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
मुंबईतल्या लोकसंख्याशास्त्रसंबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या (आयआयपीएस) 64 व्या दीक्षांत समारंभात 199 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
‘लोकसंख्यासंबंधी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणाऱ्या आणि सर्वेक्षणांच्या माध्यमातून उच्च-गुणवत्तापूर्ण माहिती तयार करणाऱ्या आयआयपीएस’चे, आयसीएमआरच्या महासंचालकांनी केले कौतुक
Posted On:
06 MAY 2023 4:40PM by PIB Mumbai
मुंबई, 6 मे 2023
मुंबईतील लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्था (आयआयपीएस), या मानद विद्यापीठाचा 64 वा दीक्षांत समारंभ आज (6 मे, 2023) पार पडला. यावर्षी एकूण 199 विद्यार्थ्यांना पदवी /पदविका प्रदान करण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट संशोधन आणि शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले आणि त्यांना सुवर्ण तसेच रौप्य पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल, या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. बहल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पदवी, पदविका आणि पदके मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सतत शिकत राहावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्राचे ऋण फेडण्यासाठी योगदान देण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला. लोकसंख्या संबंधी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणाऱ्या तसेच राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण आणि भारतातील वृद्धत्वासंबंधी सखोल अभ्यास विषयांवर सर्वेक्षणांच्या माध्यमातून उच्च-गुणवत्तापूर्ण माहिती तयार करणाऱ्या लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या योगदानाचे, डॉ. बहल यांनी कौतुक केले. कोविड-19 च्या व्यवस्थापनासारख्या आव्हानांना तोंड देताना भारताने साधलेल्या विकासाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आणि देशाने प्रतिस्थापन प्रजनन क्षमतेची निम्न पातळी गाठल्याबद्दल कौतुक केले. विद्यार्थी आणि संशोधकांनी राष्ट्र उभारणीसाठी काम करावे, असे आवाहन डॉ. बहल यांनी केले.
भारत सरकारच्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदू भूषण हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी लोकसंख्येच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भूमिकेचे कौतुक केले तसेच पदवी/ पदविका प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. देशाच्या विकासासाठी लोकसंख्याशास्त्रज्ञ/ लोकसंख्या संशोधकांनी सात प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे डॉ. भूषण यांनी सांगितले. ती क्षेत्रे म्हणजे : (i) कौशल्य विकासाद्वारे लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ प्राप्त करणे, (ii) वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या लोकसंख्येला आधार देणे (iii) स्थलांतर आणि शहरीकरणाकडे लक्ष केंद्रित करणे (iv) हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाणे (v) लैंगिक समानता सुनिश्चित करणे (vi) उच्च दर्जाची संबंधित आणि संदर्भित माहिती तयार करणे, आणि (vii) तांत्रिक प्रगतीच्या सीमांची ओळख. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व्हावे आणि शिकण्याची जिज्ञासा कधीही सोडू नये असा सल्ला डॉ. भूषण यांनी दिला.
लोकसंख्याशास्त्र संबंधी आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक प्राध्यापक के एस जेम्स यांनी, 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी संस्थेचे उपक्रम आणि कामगिरीचा आढावा घेणारा संचालक अहवाल सादर केला. या संस्थेतर्फे पुढील चार नियमित शैक्षणिक अभ्यासक्रम राबविले जातात – जैवसंख्याशास्त्र आणि लोकसंख्याशास्त्र या विषयात पीएचडी,एमपीएस आणि एमएससी तसेच लोकसंख्या अभ्यास या विषयात एम ए / एमएससी, दूरस्थ शिक्षणाद्वारे दोन पदव्युत्तर कार्यक्रम तसेच राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबईचे दोन पदविका अभ्यासक्रम.
M.Pange/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922295)
Visitor Counter : 268