नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममधील जोगीघोपा येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बहुमार्गीय लॉजिस्टिक पार्कच्या उभारणी कार्याचा आढावा घेतला
Posted On:
04 MAY 2023 7:36PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज आसाममधील जोगीघोपा येथे सुरु असलेल्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बहुमार्गीय लॉजिस्टिक पार्कच्या (एमएमएलपी) उभारणी कार्याचा आढावा घेण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली. या पार्कमधील जेट्टीच्या निर्मितीचे काम या वर्षात पूर्ण होईल असे ते म्हणाले. या पार्ककडे जाणारे रस्ते तसेच रेल्वेमार्ग यांचे बांधकाम देखील या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्यामुळे, तेथे सध्या सुरू असलेल्या कामाच्या गतीबद्दल देखील केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “ईशान्य भारताचा वेगवान विकास व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला नवचैतन्य देण्यासाठी अनेक क्रांतिकारक पावले उचलली आहेत. वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेने संपूर्ण ईशान्य प्रदेशातील वाहतुकीच्या जाळ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची क्षमता प्रदान केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या बहुमार्गीय पार्कमधील बांधकाम वेगाने सुरु असल्यामुळे, भूतान आणि बांगलादेश सारख्या शेजारी देशांसह या ईशान्य प्रदेशातील प्रचंड क्षमता खुली होईल असा अंदाज आहे.”
हे पार्क केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित करण्यात येत आहे. एनएचआयडीसीएल तर्फे आसाममधील जोगीघोपा येथे अशा पद्धतीच्या या सर्वात पहिल्या एमएमएलपीची निर्मिती करण्यात येत आहे. हे पार्क रस्ते, रेल्वे, हवाईमार्ग तसेच जलमार्ग अशा प्रवासाच्या विविध प्रकारांनी जोडले जाणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या लगतच्या 317 एकर जमिनीवर हे पार्क विकसित करण्यात येत आहे.
या एमएमएलपीमध्ये गोदाम , रेल्वेचे सायडिंग, शीतसाठवणगृह, कस्टम क्लियरंस हाऊस, यार्ड सुविधा, यांत्रिक कार्यशाळा, पेट्रोलपंप, ट्रक थांबा, प्रशासकीय इमारत, तात्पुरत्या निवासाची सोय, खानपान सेवा देणारी केंद्रे, जलशुद्धीकरण संयंत्र,इत्यादी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1922080)
Visitor Counter : 142