संरक्षण मंत्रालय

सिंगापूर येथे प्रथमच आयोजित आसियान भारत सागरी सराव कार्यक्रमात नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांचा सहभाग

Posted On: 02 MAY 2023 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 मे 2023

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार आजपासून 04 मे 2023 पर्यंत सिंगापूरच्या अधिकृत भेटीवर गेले आहेत.

या भेटीदरम्यान, नौदल प्रमुख सिंगापूरच्या चांगी नौदल तळावर आज 2 मे 2023 रोजी आयोजित पहिल्याच आसियान- भारत सागरी सराव (एआयएमई) 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार  आणि सिंगापूर नौदल प्रजासत्ताकाचे नौदलप्रमुख रियर ॲडमिरल सीन वट यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी इतर आसियान देशांतील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. भारतीय नौदल आणि सिंगापूर नौदल प्रजासत्ताक यांच्याकडे संयुक्त स्वरुपात एआयएमईच्या ह्या उद्घाटनपर कार्यक्रमाचे यजमानपद आहे. या सरावात इतर आसियान देशांची जहाजे तसेच नौदल कर्मचारी सहभागी होणार आहेत.

दिनांक 02 ते 04 मे 2023 या काळात चांगी नौदल तळावर बंदराशी संबंधित सराव आयोजित करण्यात आला आहे तर 07 ते 08 मे 2023 या काळात दक्षिण चीन समुदात सागराशी संबंधित सराव आयोजित करण्यात आला आहे.

एआयएमई 2023 या कार्यक्रमामध्ये भारत आणि भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करण्यासोबतच ॲडमिरल आर. हरीकुमार या सिंगापूर भेटीदरम्यान आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षणविषयक प्रदर्शनाच्या (आयएमडीईएक्स-23) उद्घाटन समारंभात देखील सहभागी होतील. तसेच आयएमडीईएक्स-23 च्या सोबतच आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा परिषदेमध्ये (आयएमएससी) आयोजित ‘भविष्यकाळातील सागरी पर्यावरणातील सहकार्य आणि सहयोग’ या विषयावरील गटचर्चेला उपस्थित राहून भाषण करतील.

नौदल प्रमुख सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत आणि संरक्षण दल प्रमुख (CDF), सिंगापूर सशस्त्र दल (SAF), रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही (RSN) चे नौदल प्रमुख, इतर नौदल प्रमुख आणि AIME, IMDEX आणि IMSC मध्ये सहभागी होणाऱ्या देशांतील प्रतिनिधी मंडळांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. नौदल प्रमुख आसियान-भारत सागरी जोडणीच्या संधीविषयी सिंगापूरमधील शैक्षणिक संस्थेशी चर्चा करतील.

आसियान भारत सागरी सराव AIME-23 चा उद्देश सागरी सहकार्याला प्रोत्साहन देणे आणि आसियान आणि भारतीय नौदलांमधील विश्वास, मैत्री आणि आत्मविश्वास वाढवणे हा आहे. सिंगापूर येथील बंदरात 02 ते 04 मे 23 या कालावधीत सहभागी नौदलांमध्ये विविध व्यावसायिक आणि सामाजिक परस्परसंवाद होतील ज्यात क्रॉस डेक भेटी, विषयतज्ज्ञांचे विचारमंथन (SMEE) आणि नियोजन बैठकांचा समावेश आहे. दक्षिण चीन समुद्रात 07 ते 08 मे 23 या कालावधीत नियोजित सागरी टप्पा सहभागी नौदलांना सागरी क्षेत्रामध्ये समन्वय आणि परिचालनाच्या अंमलबजावणीमध्ये घनिष्ठ संबंध विकसित करण्याची संधी प्रदान करेल.

भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विनाशिका, आयएनएस दिल्ली आणि  पी8आय या सागरी गस्ती विमानासह स्वदेशी बनावटीची गायडेड मिसाईल फ्रिगेट युद्धनौका आयएनएस सातपुडा या आसियान भारत सागरी सराव आणि आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शनाच्या उद्घाटनामध्ये सहभागी होतील. सहभागी जहाजे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्याचा एक भाग असून पूर्वेकडील ताफ्याचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर आरएडीएम गुरचरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्य करतात. बहुराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या जहाजांचा वावर म्हणजे भारतीय शिपयार्ड्सची जहाज बांधणी क्षमता प्रदर्शित करण्याची संधी असेल.

भारताचे माननीय पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सिंगापूर येथील शांग्री ला संवादातील त्यांच्या भाषणात आसियान हा भारताच्या इंडो-पॅसिफिक धोरणाचा गाभा असल्याचा उल्लेख केला होता. AIME या विश्वासाला आणि भारताच्या 'क्ट ईस्ट' च्या वचनबद्धतेला 'प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि वाढ' (SAGAR) सुनिश्चित करण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळकट करते. सिंगापूरसोबतची उच्चस्तरीय द्विपक्षीय संरक्षण वचनबद्धता तसेच या प्रदेशाला ‘आसियान केंद्रितता’ म्हणून भारताची मान्यता नौदल प्रमुखांच्या भेटीमुळे आणखी दृढ झाली आहे.

 

 S.Patil/Sanjana/Vasanti/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1921501) Visitor Counter : 100


Read this release in: English , Urdu , Hindi