आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
ऑपरेशन कावेरी - आतापर्यंत आलेल्या 1,191 प्रवाशांपैकी पीतज्वराचे लसीकरण न केलेल्या 117 प्रवाशांची विलगीकरणात नि:शुल्क व्यवस्था
लक्षणे नसलेल्या प्रवाशांना सात दिवसांनंतर सोडले जाईल
प्रविष्टि तिथि:
29 APR 2023 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2023
‘ऑपरेशन कावेरी’ या महत्त्वपूर्ण मोहिमेअंतर्गत परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय संयुक्तपणे काम करत आहे. भारत सरकारने सुमारे 3,000 भारतीय वंशाच्या प्रवाशांना सुदानमधून सुरक्षित बाहेर काढले आहे. तिथून येणा-या प्रवाशांसाठी युद्धपातळीवर संक्रमण शिबिरांमध्ये विलगीकरण व्यवस्थेसह आवश्यक त्या सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. आतापर्यंत आगमन झालेल्या एकूण 1,191 प्रवाशांपैकी 117 प्रवासी सध्या विलगीकरणात आहेत, कारण त्यांचे 'यलो फिव्हर म्हणजेच पीतज्वर प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. या सर्व प्रवाशांना आजाराची लक्षणे न आढळल्यास सात दिवसांनंतर सोडण्यात येईल.
विमानतळ आरोग्य अधिकारी (APHO) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या आणि सामंजस्य करार (MOU) केलेल्या रुग्णालयांमध्ये तसेच दिल्लीतील केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये तयार केलेल्या विलगीकरण केंद्रांमध्ये, या प्रवाशांची मोफत जेवणाची आणि मोफत राहण्याची सोय केली गेली आहे.
विलगीकरण केलेल्यांची संख्या सातत्याने बदलते आहे, कारण ती प्रवाशांच्या पासपोर्ट क्रमांकाच्या पडताळणी स्थितीवर अवलंबून आहे.
'ऑपरेशन कावेरी' हे सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेले बचाव अभियान आहे. सुदानमध्ये निर्माण झालेल्या संकटग्रस्त परिस्थितीतून, भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी 24 एप्रिल 2023 रोजी याची सुरुवात करण्यात आली. भारतीयांच्या संकटातून सुटकेची प्रक्रिया नीट पार पाडली जावी यासाठी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारतीय हवाई दल आणि भारतीय दूतावास यांचे एक पथक नियुक्त केले गेले आहे. या प्रक्रीयेदरम्यान, भारतीयांना सुदानच्या विविध भागातून राजधानी खार्तूम इथे आणलं जात असून तिथून त्यांना भारतात परत पाठवले जात आहे.
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920804)
आगंतुक पटल : 242