माहिती आणि प्रसारण मंत्रालय
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाचे भारतातील राजभवनांमध्ये होणार थेट प्रक्षेपण
मुंबईत राजभवनात होणाऱ्या 100 व्या भागाच्या प्रक्षेपण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि ‘मन की बात’मध्ये उल्लेख झालेल्या व्यक्ती उपस्थित राहणार
मुंबईत राजभवनात पद्म पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग समुदाय आणि चित्रपट उद्योगातील नामवंत उपस्थित राहणार
केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पीयूष गोयल मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणांहून पाहणार ‘मन की बात’ चे थेट प्रक्षेपण
‘मन की बात’ च्या 100 व्या भागाचा सोहळा साजरा करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आणि देशभरातील विशेष महत्त्वाच्या 12 स्मारकस्थळांवर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडून मोठ्या पडद्यांवर केले जाणार प्रक्षेपण
Posted On:
29 APR 2023 6:32PM by PIB Mumbai
मुंबई, 29 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमाचे 30 एप्रिल 2023 रोजी 100 भाग पूर्ण होणार आहेत. 100व्या भागाचा हा ऐतिहासिक टप्पा साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होणार आहे आणि भारतातील सर्व राजभवनांमध्ये या भव्य कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
मुंबईतल्या राजभवनात देखील या कार्यक्रमाचे आयोजन होणार असून महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या यापूर्वीच्या भागांमध्ये ज्यांचा उल्लेख केला होता ते महाराष्ट्रातील नागरिक या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असतील. विविध क्षेत्रांमधील आणि वयोगटातील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. वयाच्या 12व्या वर्षी माऊंट अकोन्कागुआ सर करणाऱ्या काम्या कार्तिकेयनपासून, स्वच्छता मोहिमेसाठी आपल्या 16 हजार रुपयांच्या मासिक निवृत्तीवेतनापैकी पाच हजार रुपयांचे योगदान देण्याचा संकल्प करणारे निवृत्तीवेतनधारक चंद्रकांत कुलकर्णी यामध्ये आहेत. या विशेष निमंत्रितांची कामगिरी पालघर, चंद्रपूर आणि नाशिक या जिल्ह्यातील आदिवासींच्या कामगिरीपासून ते दूर अंतरावर अमेरिकेत असलेल्या हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन यांच्या कामगिरीप्रमाणे जगभरात पसरली आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील आणि समाजाच्या विविध स्तरातील व्यक्ती ‘मन की बात’ मध्ये उत्साहाने सहभागी झाल्या आहेत. यांच्यापैकी 47 जणांना महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत राजभवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा बहुमान मिळणार आहे. महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते आणि प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांसोबत व्यावसायिक आणि चित्रपट उद्योगातील नामवंत देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या निमित्त सीबीसीच्या पुणे इथल्या प्रादेशिक कार्यालयाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आणि ‘मन की बात’ या विषयावर राज भवनाच्या प्रांगणात छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.
‘मन की बात’ च्या शंभराव्या भागानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित राहणार आहेत. अमित शहा हे मुंबईतल्या विलेपार्ले इथल्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या केशवराव घैसास सभागृहात थेट प्रक्षेपण पाहतील तर पीयूष गोयल मुंबईतल्या कांदिवली उपनगरातल्या ठाकूर महाविद्यालयात थेट प्रक्षेपण पाहून कार्यक्रम साजरा करतील.
गेटवे ऑफ इंडिया इथे प्रोजेक्शन मॅपिंग
याशिवाय संस्कृती मंत्रालय 29 एप्रिल 2023 पासून देशातल्या 13 महत्वाच्या ठिकाणी प्रोजेक्शन मॅपिंग द्वारे हा कार्यक्रम साजरा करणार आहे. या 13 ठिकाणांमध्ये भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतल्या स्थळांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातल्या गेटवे ऑफ इंडियाचा या 13 स्थानांमध्ये समावेश आहे. या प्रोजेक्शन मध्ये, पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात उल्लेख केलेल्या विविध संकल्पना आणि विषय यावर आधारित ऐतिहासिक, स्थापत्यविषयक आणि या प्रांताचे वैशिष्ट्य दर्शवण्यात येईल. संध्याकाळी 5 वाजल्यापासून हा कार्यक्रम जनतेसाठी खुला असेल. ‘मन की बात’ च्या संकल्पनेसह या शो मध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ याची प्रचीती देणाऱ्या ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेचा चमत्कार म्हणून मानली जाणारी स्थाने ठळकपणे दाखवली जातील.
मन की बात विषयी माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आपल्या कार्यक्रमात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी श्रोत्यांशी संवाद साधतात. 3 ऑक्टोबर 2014 पासून हा कार्यक्रम सुरु झाला. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व नेटवर्कवर हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. 30 मिनिटांचा हा कार्यक्रम 30 एप्रिल 2023 ला शंभर भाग पूर्ण करत आहे. मन की बातचा कार्यक्रम 22 भारतीय भाषांमध्ये, 29 बोली आणि इंग्लिश शिवाय 11 विदेशी भाषांमध्ये अनुवादित केले जाते. यात, हिंदी, संस्कृत, पंजाबी, तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, गुजराती, मल्याळम, ओडिया, कोकणी, नेपाळी, काश्मिरी, डोग्री, मणिपुरी, मैथिली, बंगाली, आसामी, बोडो, संथाली, उर्दू, सिंधी या भाषांचा समावेश आहे. बोलींमध्ये छत्तीसगडी, गोंडी, हलबी, सर्गुजिया, पहाडी, शीना, गोज्री, बाल्ती, लडाखी, कार्बी, खासी, जैन्तिया, गारो, नगमासे, हमर, पैते, थाडो, काबुई, माओ, तंगखूल, न्यैशी, अदि, मोनपा, अओ, अंगामी, कोकबोरोक, मिझो, लेपचा, सिक्कीमी (भुतिया) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधत लोककेंद्री प्रशासनाला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात प्रेरणादायी कल्पना आणि उपक्रम अधोरेखित करण्याचा पंतप्रधानांचा उद्देश आहे.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Patil/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1920778)
Visitor Counter : 159