सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इफ्फको नॅनो डीएपी (द्रवरूप) चा केला शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, इफ्फको नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्पादने,देशाच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवतील, ही उत्पादने शेतकऱ्यांना समृद्ध आणि देशाला खतांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवतील

Posted On: 26 APR 2023 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत इफ्फको नॅनो डीएपी (द्रवरूप) चा शुभारंभ करण्यात आला . या कार्यक्रमाला, सहकार विभागाचे सचिव, ज्ञानेश कुमार आणि इफ्फकोचे अध्यक्ष दिलीप संघानी उपस्थित होते.

इफ्फको नॅनो डीएपी (द्रवरूप) ही उत्पादने, भारताला खत क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने महत्वाची आहेत, असे अमित शाह यावेळी म्हणाले. इफ्फकोचा हा प्रयत्न सर्वच राष्ट्रीय सहकारी संस्थांना संशोधन आणि नव्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, इफ्फको नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्पादने,देशाच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवतील, ही उत्पादने शेतकऱ्यांना समृद्ध आणि देशाला खतांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

द्रवरूप डीएपीच्या वापरामुळे, त्याची पिकांवर फवारणी केल्यामुळे, पिकांचे उत्पादन आणि दर्जा दोन्ही वाढेल, तसेच जमिनीचेही संवर्धन होईल, असे ते म्हणाले. यामुळे जमिनीची सुपीकता कायम राहील तसेच रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे कोट्यवधी भारतीयांच्या आरोग्याला असलेला धोकाही कमी होईल, असे शाह म्हणाले.

शेतकऱ्यांनी दाणेदार युरिया आणि डीएपीऐवजी अधिक प्रभावीअसलेल्या  द्रवरूप नॅनो युरिया आणि डीएपीचा वापर करण्याचे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले. दाणेदार युरियाच्या वापरामुळे जमिनीचे तसेच पीक आणि लोकांच्या आरोग्याचे नुकसान होते, असे त्यांनी सांगितले. कोणताही नवीन बदल स्वीकारण्याची भारतातील शेतकऱ्यांची तयारी असते, असे सांगत,  500 मिलीच्या एका बाटलीचा पिकावर होणारा परिणाम 45 किलोग्रॅम ग्रॅन्युलर युरियाच्या पिशवीइतका असतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

हे खत द्रवरूप स्वरूपात असल्याने, जमिनीवर रासायनांचा कमी परिणाम होईल. जमिनीत मोठ्या प्रमाणात गांडुळे असल्यास, तेच खतनिर्मितीचे काम करतात. आता द्रवरूप डीएपी आणि द्रवरूप युरियाच्या वापरामुळे, शेतकरी शेतात गांडुळाचे प्रमाण वाढवू शकतील. आणि आपले उत्पादन तसेच उत्पन्न कमी न होऊ देता नैसर्गिक शेतीकडे वळू शकतील. यामुळे, जमिनीचे संवर्धनही होईल. भारतासारख्या देशात आजही 60 टक्के लोकसंख्या शेती आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांशी निगडित आहे, तिथे हे क्रांतिकारक पाऊल आगामी काळात कृषी क्षेत्राला खूप पुढे नेईल आणि भारताला धान्य आणि खते उत्पादनात स्वयंपूर्ण बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात आज, 384 लाख मेट्रिक टन खतांचे उत्पादन होते, त्यापैकी, सहकारी संस्था, 132 लाख मेट्रिक टन खतांचे उत्पादन करतात. या 132 लाख मेट्रिक टन उत्पादनापैकी, इफ्फकोने 90 लाख मेट्रिक टन खतांची निर्मिती केली आहे. इफ्फको, क्रिभको यांसारख्या सहकारी संस्थाचे देशाला खते, दुग्ध उत्पादन आणि विपणन क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात मोठे योगदान आहे, असे शाह म्हणाले.

सहकाराचा मूळ मंत्र म्हणजे, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याऐवजी ‘अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन करवून घेणे’ म्हणजेच उत्पादनातून मिळणाऱ्या नफ्यात अनेकांचा वाटा असायला हवा. एकेकाळी असा समज होता की हा मूळ मंत्र 70 -80 च्या दशकानंतर यशस्वी होऊ शकत नाही, परंतु इफ्फको, कृभको यांसारख्या अनेक सहकारी संस्थांनी हाच  मंत्र पाळला आणि सहकार्य, संशोधन, क्षमता आणि क्षमता या प्रत्येक क्षेत्रात आपल्या व्यावसायिकतेने जोपासला.  सहकाराच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या व्यावसायिकतेतून तसेच संशोधन, क्षमता आणि क्षमतेचा परिचय देऊन त्यांनी सहकाराची भावना जिवंत ठेवली आणि ती तळागाळापर्यंत नेली. यशस्वी सहकाराचे सर्वात मोठे उदाहरण आणि यशोगाथा हेच आहे की आज इफकोने जर एक रुपया कमावला तर त्यातून प्राप्तिकर वजा जाऊन 80 पैसे थेट शेतकर्‍यांच्या हाती जातात, असेही शाह म्हणाले.

इफकोच्या प्रयत्नातून द्रवरूप नॅनो डीएपी आणि द्रवरूप नॅनो युरिया आणल्यानंतर आज जगातील पहिली नॅनो डीएपी (लिक्विड) बाजारात आली आहे, असे केंद्रीय गृह व सहकार मंत्री म्हणाले.  इफ्फकोने सुमारे 20 वर्षांचे पेटंट नोंदणीकृत केले आहे, ज्यामुळे या संस्थेला  20 वर्षांसाठी जगात कुठेही द्रवरूप यूरिया आणि द्रवरूप डीएपीच्या विक्रीवर 20% रॉयल्टी मिळेल, असे सांगत हे एक क्रांतिकारक पाऊल असल्याचे अमित शाह म्हणाले. ‘प्रयोगशाळा ते शेतजमीन’ असा दृष्टिकोन ठेवत, इफ्फको ने वैज्ञानिक संशोधन शेतजमिनीपर्यंत पोहोचवण्याचे असामान्य काम केले आहे, असे गौरवोद्गार शाह यांनी काढले.

 

* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920064) Visitor Counter : 133


Read this release in: English , Urdu , Hindi