ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने मुंबईत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रसिद्ध , प्रभावशाली व्यक्ती आणि व्हर्चुअल इन्फ्लूएंझरसाठी अलीकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत प्रभावशाली व्यक्ती , विषय सामग्री लेखक आणि संस्थांसोबत गोलमेज चर्चा आयोजित केली
ग्राहक व्यवहार विभाग सचिव रोहित कुमार सिंग यांनी प्रभावशाली विपणन कंपन्यांसाठी स्वयं-नियामक संस्था स्थापन करण्याची आणि उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने सर्जनशील किंवा प्रभावशाली ओळख कार्यक्रम विकसित करण्याची सूचना केली
पारदर्शकता, सचोटी आणि व्यावसायिकतेच्या गरजेवर भर देऊन ग्राहकांच्या मतांना आकार देण्यामध्ये प्रभावशाली व्यक्तींच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची विभागाने घेतली दखल
मार्गदर्शक तत्वांसाठी "जाहिरात," "प्रायोजित," "सहकार्य ," किंवा "सशुल्क जाहिरात" सारख्या संज्ञांसह, जाहिरातींसाठी सुस्पष्ट, प्रमुख आणि अचूक प्रकटीकरण आवश्यक
मार्गदर्शक तत्वांमध्ये पारंपारिक माध्यमांच्या पलीकडे विस्तारलेल्या, ग्राहकांची दिशाभूल करणार्या जाहिरातींबरोबरच वेगाने वाढणाऱ्या डिजिटल जगाच्या समस्यांवर उपाययोजना
प्रभावशाली आणि प्रसिद्ध व्यक्तींनी केवळ त्यांनी वैयक्तिकरित्या वापरलेली किंवा अनुभवलेली उत्पादने किंवा सेवांचेच समर्थन करणे आवश्यक
प्रभावशाली व्यक्ती आणि ब्रँड यांच्यात आदर्श मसुदा करार विकसित होणे आवश्यक
प्रभावशाली आणि सर्जनशील व्यक्तींचे सक्षमीकरण ग्राहक व्यवहार विभागाच्या केंद्रस्थानी
जबाबदार आणि शाश्वत उद्योगाला चालना देण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती , विषय सामग्री लेखक आणि संस्था यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करण्याचे ग्राहक व्यवहार विभागाचे उद्दिष्ट
प्रभावशाली व्यक्ती , विषय सामग्री लेखक यांना काय करावे आणि काय करू नये याबद्दल जागरूक करण्यासाठी शैक्षणिक संसाधने विकसित करण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती , प्रभावशाली विपणन कंपन्या आणि उद्योग क्षेत्राबरोबर सहकार्य करण्याची विभागाची योजना
सामग्री लेखक, प्रभावशाली व्यक्ती, संस्था आणि उद्योग क्षेत्राने या संवादाचे केले स्वागत , देशाच्या जीडीपीमध्ये प्रभावशाली विपणनाचे लक्षणीय योगदान केले मान्य
या गोलमेज चर्चेने पारदर्शक आणि जबाबदार प्रभावशाली विपणन उद्योगाला चालना देण्यासाठी, ग्राहक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि सामग्री निर्माते आणि प्रभावशाली व्यक्तीना त्यांच्या प्रयत्नांमध्ये सक्षम बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अधोरेखित केले
Posted On:
19 APR 2023 8:48PM by PIB Mumbai
मुंबई, 19 एप्रिल 2023
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि आभासी प्रभावशाली व्यक्तींसाठी अलीकडेच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर प्रभावशाली व्यक्ती , सामग्री निर्माते आणि त्यांच्या संस्थांबरोबर गोलमेज चर्चा आयोजित केली. उत्पादने किंवा सेवांची जाहिरात करताना व्यक्ती त्यांच्या प्रेक्षकांची दिशाभूल करणार नाहीत तसेच ग्राहक संरक्षण कायदा आणि संबंधित नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करणे हे "एन्डोर्समेंट्स नो-हाऊ " शीर्षक असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे . 19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता मुंबई येथे ही गोलमेज चर्चा सुरू झाली.

गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी ग्राहक व्यवहार विभगाचे सचिव रोहित कुमार सिंग होते. त्यांनी प्रभावशाली व्यक्ती आणि सामग्री निर्मात्यांसाठी नियमांचे ज्ञान आवश्यक असल्याच्या महत्त्वावर भर दिला. सर्जनशीलता आणि उद्योगाला खीळ घालण्याचा सरकारचा हेतू नसून सर्जनशीलता आणि व्यवसायाला बाधा न पोहचवता ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याचा सरकारचा हेतू असल्याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. सिंह यांनी प्रभावशाली विपणन कंपन्यांसाठी स्वयं-नियामक संस्था तयार करण्याची आणि उद्योगाच्या सहकार्याने सर्जनशील किंवा प्रभावशाली ओळख कार्यक्रम विकसित करण्याची सूचना केली.
प्रभावशाली व्यक्ती आणि सामग्री लेखकांना मार्गदर्शक तत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यात मदत करण्यासाठी, मार्गदर्शक तत्त्वे आणि एफएक्यू सारख्या संसाधनांचा विकास आणि प्रसार करण्यासाठी उद्योग क्षेत्र आणि प्रभावशाली विपणन कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यावर सिंह यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की ग्राहकांची मते आणि खरेदी संबंधी निर्णयांना आकार देण्यात प्रभावशाली व्यक्ती आणि सामग्री लेखक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जसजसे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे, तसतसे प्रभावशाली विपणनामध्ये उच्च पातळीची पारदर्शकता, सचोटी आणि व्यावसायिकता राखण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.
एंडोर्समेंट नो-हाऊ या नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर ग्राहक व्यवहार विभागाचे सहसचिव अनुपम मिश्रा यांनी तपशीलवार सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की विभाग प्रभावशाली व्यक्ती , सामग्री निर्माते आणि त्यांच्या संस्थांना मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यांच्या अंमलबजावणीबद्दल अभिप्राय देण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित करत आहे.
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कपूर यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मना जाहिराती आणि प्रभावशाली व्यक्तींच्या संरचनेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. प्रभावशाली व्यक्ती आणि ब्रँड यांच्यात आदर्श मसुदा करार विकसित होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
सामग्री निर्माते, प्रभावशाली व्यक्ती आणि संस्था तसेच उद्योग क्षेत्राने या संवादाचे स्वागत केले, देशाच्या जीडीपी मध्ये प्रभावशाली विपणनाचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. .हे नियम उद्योगाला अधिक मजबूत आणि सक्षम करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रभावशाली व्यक्ती तसेच सामग्री निर्मात्यांसाठी शिक्षणाचे महत्त्व तसेच जाहिरातींमध्ये प्रभावशाली विपणनाच्या भूमिका महत्वाची असल्याबाबत उद्योगाने सहमती दर्शविली.
मार्गदर्शक तत्वांसाठी "जाहिरात," "प्रायोजित," "सहकार्य ," किंवा "सशुल्क जाहिरात" सारख्या संज्ञांसह, जाहिरातींसाठी सुस्पष्ट, प्रमुख आणि अचूक प्रकटीकरण आवश्यक आहे. प्रभावशाली आणि प्रसिद्ध व्यक्तींनी केवळ त्यांनी वैयक्तिकरित्या वापरलेली किंवा अनुभवलेली उत्पादने किंवा सेवांची जाहिरात करावी.

या गोलमेज चर्चेने पारदर्शक आणि जबाबदार प्रभावशाली विपणन उद्योगाला चालना देण्यासाठी, ग्राहक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आणि सामग्री निर्माते आणि प्रभावशाली व्यक्तीना त्यांच्या प्रयत्नांमध्ये सक्षम बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अधोरेखित केले.
आगामी काळात , अशी आणखी गोलमेज चर्चा आयोजित करण्याची ग्राहक व्यवहार विभागाची योजना आहे. अशा कार्यक्रमांमुळे प्रभावशाली व्यक्ती , सामग्री निर्माते आणि त्यांच्या संस्थांना प्रश्न विचारण्याची, स्पष्टीकरण मागण्याची आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याची संधी मिळेल.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
(Release ID: 1918086)
Visitor Counter : 209