आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दुसऱ्या G20 आरोग्य विषयक कार्य गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली पॅनेल चर्चा
रुग्णांना चांगला गुण देण्यासाठी आणि डिजिटल विभाजन दूर करण्यासाठी, तंत्रज्ञान-सक्षम सातत्यपूर्ण आरोग्य सेवा, आणि आरोग्य सेवेमधील नवोन्मेष, यावर विचारमंथन
Posted On:
19 APR 2023 7:44PM by PIB Mumbai
पणजी, 19 एप्रिल 2023
भारताच्या G20 अध्यक्षते अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोग्य विषयक कार्यगटाच्या बैठकीच्या तिसऱ्या दिवशी, डिजिटल आरोग्य नवोन्मेषावर आधारित लक्षवेधी तांत्रिक सत्र आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लोक-केंद्रित दृष्टीकोन, तंत्रज्ञान-सुलभ सातत्यपूर्ण आरोग्य सेवा, डिजिटल विभाजन यासारख्या इतर समस्यांसह त्यावरील उपाययोजनांवर भर देण्यात आला. ‘वसुधैव कुटुंबकम’, अथवा ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’, या भारताच्या G20 अध्यक्षतेच्या संकल्पनेला अनुसरून, या चर्चेमध्ये गतिमान जागतिक आणि स्थानिक सहकार्यामधून "सर्वांसाठी आरोग्यसेवा" या भारताच्या वचनबद्धतेवर भर देण्यात आला.


यावेळी तीन पॅनल चर्चासत्र आयोजित करण्यात आली. पहिल्या सत्रात "आरोग्य सेवेमधील नवोन्मेष- तंत्रज्ञान हस्तक्षेपांच्या मदतीने आरोग्य सेवेचे वितरण" यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या सत्रात आरोग्य क्षेत्रातील प्रमुख तज्ञांनी संपूर्ण जीवन-चक्रा मध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठीची चौकट निश्चित करण्यावर भर दिला, ज्यामध्ये मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर, डेटा नवोन्मेषाला सहाय्य करू शकेल. प्रादेशिक अंमलबजावणी केंद्र, कृत्रिम सर्वसामान्य बुद्धीमत्ता (एजीआय) आणि एजीआय-सुलभ डिजिटल सार्वजनिक वस्तू यासह सदस्य देशांच्या सरकारांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय संघटना/गट यासारखे उपाय यावेळी सुचवण्यात आले.
तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी G20 सदस्य देश आणि निमंत्रित देशांनी एकत्र येऊन डेटा गोपनीयता कायदे आणि इतर तपस्यांची योजना करणे, त्यांच्या सर्वोत्तम पद्धती आणि आपल्या आरोग्य प्रशासनामध्ये डिजिटल आरोग्य सेवेचा वापर करण्याच्या दिशेने चालू असलेल्या प्रयत्नांचे प्रदर्शन करणे, यासारखे एकत्रित प्रयत्न करायला हवेत, यावर सर्व भागधारकांनी सहमती दर्शवली.
"टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सातत्त्यपूर्ण सेवा- रुग्णांमध्ये उत्तम गुण दिसून येण्यासाठी वास्तविक जगातील डेटा/पुराव्यांच्या संभाव्यतेचा उपयोग" या विषयावरील दुसर्या सत्रात तांत्रिक साधनांचे विविध विचारप्रवर्तक पैलू आणि ते चांगल्या रूग्ण सेवा वितरणात कसे वापरले जाऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात आले. एकमेकांशी सुसंगत प्रणालीची गरज आणि राष्ट्रीय डिजिटल परिवर्तनासाठी सदस्य देशांनी व्यक्ती-केंद्रित डिजिटल उपाययोजना करण्याची गरज, यावर चर्चा झाली. मजबूत राजकीय इच्छाशक्ती आणि गुंतवणुकीला दिशा देण्यासाठी एक समन्वित आणि सर्वसमावेशक चौकट, यासह तंत्रज्ञान नवोन्मेषी, सरकार, बिगर-सरकारी संस्था (स्वयंसेवी संस्था) आणि आरोग्य संस्था यांच्यातील सहकार्य, यासारख्या उपायांवर यावेळी चर्चा झाली. नॉन-कम्युनिकेबल डिसीज (NCDs), अर्थात असंसर्गजन्य आजार आणि ई-संजीवनी दूरसंचार सेवांचा मागोवा घेण्यासाठीचे राष्ट्रीय NCD पोर्टल यासारख्या भारतातील सर्वोत्कृष्ट पद्धती देखील प्रदर्शित करण्यात आल्या.
‘डिजिटल विभाजन दूर करण्यासाठी डिजिटल पब्लिक गुड्स (डीपीजी), अर्थात डिजिटल सार्वजनिक वस्तू’, या विषयावरील तिसऱ्या सत्रात डिजिटल सार्वजनिक वस्तूंचे लोकशाहीकरण करण्याच्या महत्वाच्या पैलूवर भर देण्यात आला. डीपीजीमधील गुंतवणुकीमुळे अनेक फायदे मिळू शकतात, यावर वक्त्यांनी सहमती दर्शवली, आणि डीपीजी व्यतिरिक्त, डिजिटल हस्तक्षेपांद्वारे तज्ञांच्या ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यावर देखील भर देण्यात आला. शासन आणि धोरण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डीपीजीला गती द्यायला मदत करते, तर तंत्रज्ञान स्थानिक आणि प्रादेशिक स्तरावर डीपीजीला गती द्यायला मदत करते, याची नोंद घेण्यात आली. अशा प्रकारे, मजबूत आरोग्य डेटा प्रशासन जागतिक डिजिटल आरोग्य परिसंस्थेच्या विकासातील अडथळे दूर करू शकते. आरोग्य विषयक काळजी ही सार्वत्रिक आहे, आणि स्थानिक गरजांनुसार वापरकर्ता-प्रेरित व्यासपीठ उपलब्ध करण्याला प्राधान्य द्यायला हवे, याची नोंदही घेण्यात आली. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ (GIDH), अर्थात डिजिटल आरोग्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती, जगभरातील संघटनात्मक क्षमता मजबूत करणे, आणि तळागाळामध्ये चांगल्या सेवा जलद पुरवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य केंद्रांसाठी सोपी मानके विकसित करणे, यासारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या सत्रात विचारमंथन झाले.
भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाअंतर्गत, या कल्पनांचे प्रभावीपणे आदान-प्रदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल, सहभागींनी आभार मानले, आणि कार्यक्रमाचा समारोप झाला. मुख्य वक्त्यांमध्ये उद्योग, आंतरराष्ट्रीय संस्था, बिगर-सरकारी संस्था, स्टार्टअप्स, हॉस्पिटल नेटवर्क आणि सदस्य देशांच्या सरकार मधील तज्ञांचा समावेश होता. या सत्रात सदस्य देश आणि निमंत्रित देशांनी आपले अनुभवही सांगितले.
पॅनल चर्चेच्या पार्श्वभूमीवर, सहभागींनी स्थानिक आणि जागतिक स्तरावर तयार केलेल्या विविध डिजिटल तंत्रज्ञान उपायांच्या प्रदर्शनालाही भेट दिली.
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1918041)