वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
फ्रान्स आणि भारत खऱ्या अर्थाने मित्र, भागीदार असून या दोन्ही गतिमान लोकशाही अर्थव्यवस्था जागतिक कल्याणासाठी कार्यरत : पीयूष गोयल
पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांनी भारत- फ्रान्समधील संबंध एका नव्या उंचीवर पोहोचवले: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
11 APR 2023 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
भारत आणि फ्रान्स खऱ्या अर्थाने मित्र, भागीदार असून या दोन्ही गतिमान अर्थव्यवस्था जागतिक कल्याणासाठी कार्यरत आहेत, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. पॅरिस इथे भारत-फ्रान्स उद्योग शिखर परिषदेत ते आज बोलत होते.
भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशातील राजनैतिक संबंधाना 25 वर्षे पूर्ण होत असून, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्राँ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संबंध अधिक दृढ केले आहेत, असे गोयल म्हणाले. दोन्ही नेत्यांनी, परस्पर व्यापार, तंत्रज्ञान, पर्यटन आणि गुंतवणूक यातील देवघेव अधिक व्यापक करत, हे संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहेत. या दोन्ही देशातील नेत्यांमधली मैत्री आणि लोकांचे परस्पर संबंध, जागतिक कल्याणासाठीच्या कार्याला नवी ऊर्जा देणारे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
भारत आणि फ्रान्स दोन्ही देशांना, स्थिर जागतिक अर्थव्यवस्थेची काळजी आहे, आणि त्यासाठी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर परस्पर सहमती आणि सहकार्य आवश्यक असल्याचा दोघांनाही विश्वास वाटतो.
दोन्ही देशातील उद्योजक आणि फ्रान्समधील भारतीय समुदायाने,व्यापार आणि आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून हे मैत्री आणि विश्वासाचे बंध अधिक दृढ केले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
भारतातील उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अग्रणी उद्योजक या शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भारतातील उद्योजक, इथे, आज अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती आणि वृद्धी याविषयीचे अनुभव सांगतील. आज भारताची अर्थव्यवस्था अतिशय वेगाने पुढे जात असून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही क्षेत्रात विस्तारते आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पुढच्या 25 वर्षांतील भारताच्या विकासाच्या क्षमतेला आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत काळ किंवा सुवर्ण काळ असे नाव दिले आहे. आज देशात, जागतिक अर्थव्यवस्थेने कधीही बघितल्या नसतील अशा अपार संधी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी, भारताच्या लोकसांख्यिक लाभांशाचे आणि भारताकडे असलेल्या महत्वपूर्ण व्यवस्थापकीय तसेच तंत्रज्ञान कौशल्याचे आणि प्रचंड गुणवत्तेचे उदाहरण दिले.
विकासाचा हा प्रवास पुढे कित्येक पटीने विस्तारण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीचा वेग आणखी वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संवाद प्रक्रिया सुरूच राहील, असेही गोयल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शब्द उद्धृत करत, ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही, भारताच्या विकास यात्रेत सहभागी होता, तेव्हा भारत तुम्हाला वृद्धीची हमी देतो.”
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1915753)
Visitor Counter : 134