विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात पहिल्यांदाच प्रतिबंधात्मक आरोग्य हा विषय प्रकाशात आणला आहे- डॉ. जितेंद्र सिंह


युवा वर्गाची ऊर्जा आणि क्षमता यांना अमृत काळासाठी योग्य दिशा दिली पाहिजे- डॉ. जितेंद्र सिंह

भारतीय समस्यांसाठी भारतीय संशोधन, भारतीय आकडेवारी आणि भारतीय उपाय ही काळाची गरज - डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 08 APR 2023 2:14PM by PIB Mumbai

 

देशात 70 वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या प्रतिबंधात्मक आरोग्य या विषयाला पहिल्यांदाच प्रकाशात आणल्याबद्दल, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केवळ दोन वर्षांच्या काळात भारताने दोन डीएनए लसी आणि नाकावाटे घेण्याची एक लस तयार केली. अमृत काळाचे शिल्पकार म्हणून युवा वर्गाची भूमिका आणि जबाबदारी यांचे महत्त्व त्यांनी विशद केलेराष्ट्रउभारणीसाठी युवा वर्गाची ऊर्जा आणि क्षमता यांना योग्य दिशा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते आज जीएमसी जम्मूमध्ये थायरोकॉन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

थायरोकॉन मधील नवीन बदल थायरॉईडची समस्या असलेल्या रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये होणाऱ्या प्रगतीमध्ये प्रतिबिंबित होतील. भारतातील इतर भागांप्रमाणेच जम्मू आणि काश्मीरमध्ये थायरॉईडची समस्या ही सर्वसामान्य आरोग्य समस्या आहे, असे ते म्हणाले. एका वैद्यकीय विज्ञान आणि उपचारविषयक संशोधन पत्रिकेत 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये थायरॉईडचे प्रमाण सुमारे 12.3% आहे आणि त्यात हायपोथायरॉईडिझम या नेहमी आढळणारा प्रकार आहे, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी दोन मुद्दे उपस्थित केले. त्यापैकी पहिला मुद्दा आहे निदानाच्या वाढत्या क्षमतेमुळे बाजूला पडलेले वैद्यकीय औषधी शिक्षण. आता वैद्यकीय तपशीलाचे निष्कर्ष चाचणीचा अहवाल (रिपोर्ट) मिळाल्यानंतर काढले जातात. दुसरा मुद्दा आहे भारतीय संशोधन, भारतीय आकडेवारी आणि भारतीय समस्यांसाठी भारतीय तोडगे. पाश्चिमात्य देशातही भारतीय डेटा वापरला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतीय वैद्यकीय आरोग्य समस्यांवर देशी उपचार विकसित करण्यासाठी वैविध्यपूर्ण भारतीय डेटाचा वापर करणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

वैद्यकीय समुदायामध्ये एकात्मिकरणाच्या महत्त्वावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. भारतामध्ये संसाधनांची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही आणि नवा भारत म्हणजे आरोग्य निगा क्षेत्रासाठी विविध संधी उपलब्ध करून देणारे युग आहे, असे त्यांनी सांगितले इथे हा उल्लेख करणे गरजेचे आहे की डॉ. जितेंद्र सिंह यांच्या प्रयत्नांमुळे आयआयआयएम जम्मू जीएमसी जम्मूसोबत अफू आधारित वेदनाशामक औषधे आणि एमडीआर-टीबी यावरील विशेषत्वाने होणारे संशोधन हाती घेतले आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1914859) Visitor Counter : 156