रेल्वे मंत्रालय
आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील रेल्वे डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासंदर्भात उच्च-स्तरीय परिषद
Posted On:
07 APR 2023 10:41PM by PIB Mumbai
भारतात नवी दिल्ली येथे 5 आणि 6 एप्रिल 2023 रोजी आशिया आणि पॅसिफिक प्रदेशातील रेल्वे डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासंदर्भात उच्च-स्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे आयोजन रेल्वे मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग, आशिया आणि पॅसिफिक प्रदेश विभाग (ESCAP) यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
या परिषदेत आर्मेनिया, अझरबैजान, बांगलादेश, कंबोडिया, जॉर्जिया, भारत, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान (ऑनलाइन), लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, नेपाळ, रशियन फेडरेशन, श्रीलंका, ताजिकिस्तान, थायलंड, उझबेकिस्तान (ऑनलाइन) आणि व्हिएतनाम यासह 18 देशांच्या परिवहन/ रेल्वे मंत्रालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
एशियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट, बर्मिंगहॅम सेंटर फॉर रेल्वे रिसर्च अँड एज्युकेशन, ऑर्गनायझेशन फॉर कोऑपरेशन बिटवीन रेल्वे, इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वे आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर इंटरनॅशनल कॅरेज बाय रेल या संस्थांचे प्रतिनिधीही या परिषदेत सहभागी झाले होते.
परिषदेला संबोधित करताना, भारतीय रेल्वेचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी प्रासंगिक विषयावर परिषद आयोजित केल्याबद्दल ईएससीएपी चे कौतुक केले. भारतीय रेल्वे, रेल्वे वाहतुकीच्या प्रत्येक पैलूमध्ये डिजिटलायझेशन वाढवत असून या क्षेत्रातील आपले अनुभव आणि तज्ञांचे कौशल्य ट्रान्स-एशियन रेल्वे नेटवर्कच्या सदस्यांसह आणि विशेषत: ज्या देशांनी त्यांचा रेल्वे डिजिटलायझेशन प्रवास सुरू केला आहे त्यांच्याबरोबर सामायिक करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रान्स-एशियन रेल्वे नेटवर्क देशांतर्गत आणि आंतर-प्रादेशिक व्यापार आणि वाहतुकीस समर्थन देण्यासाठी प्रादेशिक रेल्वे नेटवर्क विकसित करण्यासाठी एक समन्वित योजना प्रदान करते. 128,000 किलोमीटर लांबीचे रेल्वे नेटवर्क 28 देशांमधून जाते. 2009 मध्ये अंमलात आलेल्या ट्रान्स-एशियन रेल्वे नेटवर्कवरील आंतर-सरकारी कराराद्वारे या रेल्वे नेटवर्कची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील UN ESCAP कार्यालयाच्या प्रमुख मिकिको तनाका यांनी देखील सहभागींना संबोधित केले. रेल्वेच्या परिचालन कार्यक्षमतेत आणखी वाढ करण्यासाठी डिजिटलायझेशनचा लाभ घेण्याच्या तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने रेल्वेद्वारे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक वाढवण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
या परिषदेत आशिया आणि पॅसिफिकमध्ये रेल्वे डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी तसेच रेल्वे वाहतुकीची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी अधिक मालवाहतूक आणि प्रवाशांना रेल्वे वाहतुकीकडे आकर्षित करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली. थायलंडमधील UN ESCAP मुख्य कार्यालयाच्या परिवहन विभागाचे अधिकारी संदीप राज जैन यांनी सादर केलेल्या आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात रेल्वे डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी प्रादेशिक धोरणावर सहभागी देशांनी चर्चा केली.
प्रस्तावित रणनीतीचा उद्देश रेल्वे डिजिटलायझेशनवरील सध्याच्या उपक्रमांना सुसंगतता आणि गती प्रदान करणे ; रेल्वे डिजिटलायझेशनच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी परिसंस्थेला प्रोत्साहन देणे; रेल्वे मालमत्तेची परिचालन कार्यक्षमता, क्षमता, विश्वसनीयता, सुरक्षितता वाढवणे; व्यवसाय करण्याच्या सुलभतेसह ग्राहकांचा अनुभव वाढवणे; रेल्वे डिजिटल करण्यासाठी भागीदारीद्वारे समन्वय निर्माण करणे; आणि रेल्वे डिजिटलायझेशनवर उच्चस्तरीय राजकीय समर्थन सुनिश्चित करणे हे आहेत. या पुढे जाऊन, रेल्वे डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी प्रादेशिक सहकार्य अधिक सखोल करण्यासाठी आठ प्राधान्य क्षेत्रे आणि पाच क्रॉस कटिंग समस्या ओळखणे हा देखील या रणनीतीचा उद्देश आहे.
रेल्वे सायबर सुरक्षा बळकट करणे, माहितीचे आदान-प्रदान, क्षमता वाढवणे आणि अनुभवातून शिकण्यासाठी रेल्वे सायबर सुरक्षेचा प्रादेशिक आराखडा विकसित करणे यांचेही ही रणनीती समर्थन करते. खाजगी गुंतवणूक आणि रेल्वे डिजिटल ऍप्लिकेशन्समधील तज्ञांना आकर्षित करणार्या कायदेशीर आणि नियामक आराखड्यासाठी देशांना प्रोत्साहित करून खाजगी क्षेत्राशी संलग्नता वाढवणे, हा देखील या रणनीतीचा उद्देश आहे.
ट्रान्स-एशियन रेल्वे नेटवर्कच्या सदस्यांद्वारे रेल्वे डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी प्रादेशिक धोरण स्वीकारण्याच्या शिफारशीसह दोन दिवसीय परिषद संपन्न झाली.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1914734)
Visitor Counter : 180