नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय सागरी दिन 2023 चा हीरक महोत्सव मुंबईमध्ये संपन्न


भारत आणि नेदरलँड यांच्यात नुकताच झालेला सामंजस्य करार सागरी सहकार्य वाढवण्यासाठी आणि आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ब्लू प्रिंट म्हणून काम करेल असा नेदरलँड चे पायाभूत सुविधा आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बर्स यांचा विश्वास

सागरी क्षेत्रातील हरित विकास आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी दिला भर

Posted On: 05 APR 2023 9:25PM by PIB Mumbai

मुंबई, 5 एप्रिल 2023

 

राष्ट्रीय सागरी दिनाच्या हीरक महोत्सवाचा भव्य समारोप समारंभ आज मुंबईमधील लोकल  क्रूझ टर्मिनस इथे संपन्न झाला. ‘नौवहन क्षेत्रातील अमृत काळ’, ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.  1919 मध्ये या दिवशी भारताच्या मालकीच्या "एस एस लॉयल्टी" या पहिल्या जहाजाने केलेल्या मुंबई ते लंडन या पहिल्या प्रवासाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. मुंबईत आज झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात सागरी क्षेत्रातील भारतातील आणि परदेशातील नामवंत व्यक्ती आणि नाविक आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

नेदरलँड चे पायाभूत सुविधा आणि जल व्यवस्थापन मंत्री मार्क हर्बर्स या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. 

राष्ट्रीय सागरी दिवस 2023 या हीरक महोत्सवी कार्यक्रमाची संकल्पना, नौवहन क्षेत्रातील अमृत काळ ही आहे, हे जाणून आपल्याला आनंद झाला, असे केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या लेखी संदेशात म्हटले आहे. ही संकल्पना एखादा नवीन उपक्रम सुरु करण्याच्या सर्वात शुभ कालावधीचा संदर्भ देत असून, नौवहन क्षेत्रासाठी ते समर्पक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्र्यांनी सागरी क्षेत्रातील सर्व भागधारकांचे यावेळी अभिनंदन केले.

अमृत काळामध्ये युवा, विकास आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करत नागरिकांसाठी संधी, आणि मजबूत आणि स्थिर आर्थिक परिसंस्था निर्माण करणे, हा सरकारचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हींसाठी ऊर्जा-कार्यक्षम आणि किफायतशीर वाहतुकीचा मार्ग म्हणून किनारपट्टी भागातील नौवहनाला प्रोत्साहन देण्याची तीव्र गरज असून, व्यवहार्यता निधी सह सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून ते करायला हवे, असे त्यांनी सांगितले.   

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपल्याला नौवहन क्षेत्राला वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्राचे रूप द्यायचे आहे जेणेकरून भारत हा सागरी पायाभूत सुविधांमध्ये जागतिक पातळीवरील आघाडीचा देश होईल आणि सागरी अर्थव्यवस्थेत आघाडीवर राहील. “नौवहन क्षेत्राला आता अधिक आधुनिक व्हावे लागेल; पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणात सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीचा स्वीकार करावा लागेल. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचणे आणि हरित विकासाला प्राधान्य देणे या गोष्टी आपल्या प्राधान्याक्रमांमध्ये आल्या पाहिजेत. ही मेरीटाईम व्हिजन इंडिया 2030 मध्ये निश्चित केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करण्याची वेळ आहे. एक जबाबदार सागरी राष्ट्र म्हणून आपण हरित नौवहनाला अधिक चालना देण्याचे देखील उद्दिष्ट ठेवले पाहिजे. प्रदूषणाची तीव्रता कमी करणे आणि नौवहन क्षेत्रात नवीकरणीय उर्जा आणि हरित हायड्रोजनच्या वापराची सुरुवात करणे या मुद्द्यांकडे आता सर्वात जास्त लक्ष पुरवले पाहिजे,” असे ते म्हणाले.

नेदरलँड्सच्या पायाभूत सुविधा आणि जल व्यवस्थापन मंत्र्यांनी सागरी कर्मचाऱ्यांना आणि भारतीय सागरी समुदायाचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की भारत देश देखील नेदरलँड्स प्रमाणेच सागरी क्षेत्राच्या बाबतीत महत्त्वाचा देश आहे. “ आजघडीला, जागतिक व्यापाराचे 90% मार्ग सागरी मार्ग आहेत. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या सर्व गरजेच्या वस्तूंपैकी सुमारे 90% वस्तू बहुतेकदा जगातील महासागरांमधून मोठा प्रवास करून आलेल्या असतात. आपले रोजचे अस्तित्वच समुद्रांतून होणाऱ्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. जगाच्या नौवहन मार्गांमध्ये मध्यवर्ती स्थान असलेल्या आणि सुमारे 7500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला भारत हा सागरी क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा देश आहे. आपल्या रक्तातच सागराचे प्रेम असणे ही गोष्ट भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामायिक बाब आहे.”

 नेदरलँड्सच्या मंत्र्यांनी या प्रसंगी बोलताना भारत आणि नेदरलँड्स या दोन देशांदरम्यान प्राचीन काळापासून असलेल्या सागरी संबंधांची आठवण काढली. ते म्हणाले की भारतासारख्या मित्रांसोबत सागरी क्षेत्रातील विविध कौशल्ये सामायिक करण्यात त्यांच्या देशाला आनंद आहे.

“बोटींच्या वापरावर अधिक भर देऊन निर्माण झालेले आपले सागरी संबंध 400 वर्षांहून अधिक जुने आहेत. मलबार आणि कोरोमांडल किनाऱ्यांवर डच लोकांनी केलेला पहिला व्यापार उदीम ही आपल्या सशक्त सागरी नात्याची सुरुवात होती. आणि 75 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या राजनैतिक संबंधांमुळे हे नाते अधिकाधिक मजबूत झाले आहे. नेदरलँड्स जगाच्या दिशेने उघडलेले युरोपचे प्रवेशद्वार आहे आणि हे दोन्ही दिशांचे प्रवेशद्वार आहे. गेल्या शतकांमध्ये आम्ही नौवहन, जहाजबांधणी, बंदरांच्या पायाभूत सुविधा आणि मालवाहतूक यांच्या बाबतीत तज्ञतेची मोठी संपत्ती उभारली आहे आणि आमच्या चांगल्या मित्रांसोबत ती सामायिक करण्यात आम्हाला आनंदच होईल.”

यावेळी बोलताना  डच मंत्री म्हणाले की, ''भारत सरकारने आपल्या सागरी क्षेत्रासाठी महत्त्वाकांक्षी दृष्टीकोन ठेवला आहे, भारत सरकारने आर्थिक विकासासाठी सागरी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करत, देशाचे  सागरी भारत दृष्टीकोन  2030 निश्चित केला  आहे. केवळ क्षमता आणि आर्थिक वृद्धीच नव्हे तर शाश्वततेच्या दृष्टीने बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग क्षेत्रामध्ये आगामी  दशकात वेगवान विकासाचा यात दृष्टीकोन आहे,  भारताचे सागरी क्षेत्र हे राष्ट्रीय विकासाला आणि आर्थिक वृद्धीला  चालना देणारे इंजिन आहे.. भारताचे हे  प्रयत्न  हा दृष्टिकोन महत्त्वाकांक्षी असल्याचे दर्शवतात. हरित आणि शाश्वत बंदर विकास, जहाज बांधणी, पुरेशी लॉजिस्टिक सुविधा , दुरुस्ती आणि पुनर्वापर, तटीय  नौवहन , देशांतर्गत जलमार्ग, डिजिटलीकरण  आणि सागरी व्यापार यावर भर दिला जात आहे.”

नेदरलँड्सच्या मंत्र्यांनी यावेळी भारत आणि नेदरलँड्स दरम्यान नुकत्याच झालेल्या सामंजस्य कराराबद्दल आणि हा करार  उभय देशांमधील सागरी सहकार्य   वाढवण्यास कशाप्रकारे मदत करेल याबद्दल सांगितले. नेदरलँड्सचे मंत्री म्हणाले की,  “गेल्या काही दिवसांमध्ये, भारत आणि नेदरलँड्स या दोन देशांनी  शाश्वत जलवाहतूक सुधारण्यासाठी, शून्य कार्बन उत्सर्जन नौवहन , देशांतर्गत जलमार्ग तंत्रज्ञानासह विविध आघाड्यांवरील  सहकार्यावर चर्चा केली.भारतीय आणि डच कंपन्यांमध्ये सहभागी  होण्यासाठी आणि सामायिक शाश्वत सागरी भविष्यात दिशा दाखवण्यासाठी आपण मदत करण्यासह उत्साहाने  प्रेरित होऊ शकता. आपण एका नव्या पहाटेच्या उंबरठ्यावर आहोत.आजच्या दिवशी भारताचा भागीदार म्हणून नेदरलँड्सला अभिमान वाटतो आहे , आपण शाश्वत सागरी भविष्याची मांडणी करूया. नुकताच भारताचे केंद्रीय नौवहन  मंत्री आणि मी सागरी क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार केला. हा करार  या क्षेत्रातील आमचे विद्यमान बळकट  संबंध अधिक दृढ करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाची ब्लू प्रिंट म्हणजेच विस्तृत रूपरेषेच्या स्वरूपात  काम करेल. आपण  एकत्र काम करून,  आज आपल्यासमोर असलेल्या  ,हवामानातील बदलामुळे निर्माण होणारी  तीव्र हवामान स्थिती ,  दाट लोकवस्तीच्या शहरी भागात स्मार्ट वाहतूक उपायांची गरज आणि आपली ऊर्जा व्यवस्था अधिक शाश्वत  बनवण्याचा प्रयत्न यांसारख्या अनेक आव्हानांवर मात करू शकतो ''

नौवहन महासंचालक राजीव जलोटा यांनी सर्व भागधारकांना भूतकाळातील नौवहन  आणि सागरी व्यापारातील  भारताच्या वैभवाची आणि वर्चस्वाची आठवण करून दिली. “सागरी व्यापाराचे दस्तावेजरूपी  पुरावे सिंधू संस्कृतीत आणि  गुजरात मधील लोथल येथे गोदीच्या उत्खननात सापडले जे ईसवी सन पूर्व 2500 जुने आहेत. सागरी विमा आणि व्यापारी नौसैनिकांशी  संबंधित प्रशासकीय व्यवस्था या संकल्पना चाणक्याच्या अर्थशास्त्रात आढळतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत  सागरी वर्चस्वाचे महत्त्व मान्य करण्यात आले आणि ते अधिक बळकट करण्यात आले ."

अमृत काळ हा देशाच्या विकासातला  अग्रगण्य काळ बनवण्याचे सरकारचे स्वप्न असल्याचे महासंचालकांनी नमूद केले. नौवहनाशी संबंधित सर्व घटकांना एकाच ठिकाणी जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून नौवहन उद्योगाने पुढील पिढीसाठी सज्ज होण्याची हीच वेळ आहे यावर त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमादरम्यान, गुणवंत व्यक्तींना पुढील सागर सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

क्रमांक

एनएमडीसी पुरस्कार

विजेत्याचे नाव

1

सागर सन्मान वरुण पुरस्कार

कॅप्टन थनुवेलिल कोशी जोसेफ

2

उत्कृष्टतेसाठी सागर सन्मान पुरस्कार

इंद्रनाथ बोस

3

शौर्यासाठीचा सागर सन्मान पुरस्कार

कॅप्टन अनिल चौधरी

याशिवाय, 14 सागरी संघटनांना विविध क्षेत्रातल्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.

   

या कार्यक्रमाला बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष निमंत्रित आणि नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा आणि जलव्यवस्थापन मंत्री आणि  प्रतिनिधी, रॉयल डॅनिश दूतावासाचे प्रतिनिधी, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचारी, नौवहन , भारतीय नौवहन महामंडळ (SCI), भारतीय महसूल सेवा ( IRS) ,  बंदरांचे संचालक आणि केंद्र तसेच राज्य सरकारांचे इतर सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.  शिपिंग कंपन्या, सागरी प्रशिक्षण संस्था, आरपीएसएल ,  देशातील   आणि परदेशातील सागरी क्षेत्रातील मल्टिमोडल वाहतूक चालक संघटनांचे  प्रतिनिधी आणि सागर सन्मान पुरस्कार विजेते आणि त्यांचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नौवहन उपमहासंचालक  आणि एनएमसीडीसी (केंद्रीय ) समितीचे सदस्य सचिव डॉ. राऊत पांडुरंग  यांनी आभार मानले.

  

  

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/Rajshree/Sanjana/Sonal C/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1914085) Visitor Counter : 262


Read this release in: English , Urdu