कृषी मंत्रालय
आयसीएआर-सीसीएआरआय, गोवा ने साजरा केला 34 वा स्थापना दिवस
आयसीएआर यावर्षी शेतकऱ्यांसाठी आणणार मानकुराद आंबा, कोकम, काजू आणि जायफळची आठ नवीन वाणं
Posted On:
01 APR 2023 9:02PM by PIB Mumbai
पणजी, 1 एप्रिल 2023
गोव्यातील भारतीय कृषी संशोधन परिषद- केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्थेने (आयसीएमआर-सीसीएआरआय) आज 34 वा स्थापना दिवस साजरा केला. डॉ सुरेश कुमार चौधरी, उपमहासंचालक, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, आयसीएआर, नवी दिल्ली; परवीन कुमार, संचालक, आयसीएआर-सीसीएआरआय, नेव्हिल अल्फोन्सो, संचालक, कृषी संचालनालय, गोवा सरकार आणि नाबार्डचे महाव्यवस्थापक मिलिंद भरुड यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
संस्थेचे संचालक परवीन कुमार यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संस्थेच्या आतापर्यंतच्या कामगिरीविषयी माहिती दिली. संस्थेने आतापर्यंत तांदळाच्या प्रत्येकी चार आणि काजूबियाणांच्या चार, वांग्याच्या सहा आणि चवळी अशा एकूण सतरा पिकांची वाणं विकसित केली आहेत असे सांगितले. आयसीएमआर-सीसीएआरआयने कार्दोझ मानकुराद आंब्याची नोंदणी केली आहे. तसेच संस्थेने दोन एकात्मिक पीक पद्धती विकसित केल्या आहेत. तर, पशू विज्ञानामध्ये, संस्थेने अगोंडा डुक्कर आणि लार्ज व्हाइट यॉर्कशायर या डुकराच्या दोन प्रजाती विकसित केल्या आहेत.
संस्थेने ‘कोकम’ साठीचे ‘गोवा कोकम1’ ‘गोवा कोकम2’ आणि ‘गोवा कोकम3’ असे प्रस्ताव सादर केले आहेत. याशिवाय काजूच्या दोन सुधारित जाती, जायफळाच्या दोन जाती आणि ‘मानकुराद’ आंब्याच्या एका जातीचाही प्रस्ताव तयार आहे. त्यामुळे या आठही वाणांना यंदा मंजुरी देऊन नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती संचालकांनी दिली.
संस्थेने 82 किनारी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध एनजीओ, संस्थांसोबत 60 सामंजस्य करार (MoU) आणि मेमोरंड ऑफ ऍग्रीमेंट (MoA) केले आहेत, अशी माहिती परवीन कुमार यांनी दिली.
संस्था शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गोवा सरकारला मदत करण्यास सदैव तत्पर आहे, असे डॉ सुरेश कुमार चौधरी यांनी सांगितले.
कार्यक्रमाला संबोधित करताना राज्य सरकारच्या कृषी संचालनालयाचे संचालक नेव्हिल अल्फोन्सो यांनी सांगितले की, 'खाजन' जमिनीचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आणि अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नरत आहे. सध्या ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ साजरे करत असताना गोव्याला भरडधान्याची समृद्ध परंपरा आहे. कृषी विभाग रागी आणि नाचणी या पारंपारिक भरडधान्याची जास्तीत जास्त लागवड आणि उत्पादनासाठी कार्य करत आहे, असे अल्फान्सो म्हणाले.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1912958)
Visitor Counter : 174