वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
निर्यात उत्पादनसंचात विविधता आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दुर्लक्षित क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री, अनुप्रिया पटेल यांचे निर्यातदारांना आवाहन, व्होकल फॉर लोकल आणि लोकल गोज ग्लोबल या घोषणेचा केला पुनरुच्चार
भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाकडून आयोजित 6व्या आणि 7व्या निर्यात उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्र्याच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान
Posted On:
25 MAR 2023 6:50PM by PIB Mumbai
मुंबई, 25 मार्च 2023
पश्चिम विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी आज मुंबईत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री, अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते आज निर्यात उत्कृष्टता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पश्चिम विभागाच्या भारतीय निर्यात संघटनांच्या महासंघाकडून(FIEO) त्यांच्या ज्या सदस्यांनी 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी केली आहे त्यांना सन्मानित करण्यासाठी अनुक्रमे 6व्या आणि 7व्या निर्यात उत्कृष्टता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री, अनुप्रिया पटेल म्हणाल्या, “भारताच्या व्यापारी निर्यातीमध्ये पश्चिम विभागाने जवळपास 50 % योगदान दिले आहे. या योगदानाचा विचार केला तर ही कामगिरी आपण साजरी केलीच पाहिजे. हे पुरस्कार विजेते इतरांसाठी आदर्श ठरतील आणि इतरांना प्रेरणा देतील, अशी मला आशा आहे, असे त्यांनी सांगितले.
अमृत काळात निर्यातीच्या भूमिकेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “आपण आता अमृत काळात आहोत आणि पुढील 25 वर्षे आपल्यासाठी स्वप्ने पाहणे आणि ती साकार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. निर्यातदार समुदायाने विकसित भारतासाठी योगदान दिलेच पाहिजे. देशाची एक ब्रँड म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय प्रत्येक पावलावर तुम्हाला मदत करण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी तुमच्या सोबत आहे.”
द्विपक्षीय संबंधांमध्ये वाढ करण्याचे निर्यातदारांना आवाहन करत त्या म्हणाल्या, “ आज जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपली प्रशंसा होत आहे. येत्या 4-5 वर्षात आपण तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. जसजसे आपण आगेकूच करत राहू तसतशा जास्तीत जास्त संधी निर्माण होतील हे सरकार सुनिश्चित करत आहे. आपण यूएई, ऑस्ट्रेलिया आणि इतरांसोबत वाटाघाटी करत असल्याने परदेशी व्यापार करारांच्या संख्येत वाढ होऊन आपल्या द्विपक्षीय संबंधांमध्ये वाढ होत आहे. जागतिक बाजारपेठेत पोहोचण्यासाठी या संधींचा वापर करा.”

निर्यातीची व्याप्ती वाढवण्याबद्दल बोलतांना अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, निर्यातदारांनी आता आपल्या निर्यातील विविधता आणली पाहिजे आणि अधिक देशांमध्ये निर्यातीच्या संधी शोधल्या पाहिजेत.यासाठी आम्ही एका उपक्रमावर काम करतो आहोत –तो उपक्रम म्हणजे, “प्रत्येक जिल्हा, निर्यातीचे केंद्र”
सृजनशीलता आणि नवोन्मेष याच्या महत्त्वावर भर देतांना, पटेल यांनी नमूद केले, “निर्यातीसाठी सृजनशीलता आणि नवोन्मेष यांना अत्यंत महत्त्व आहे. निर्यातदार म्हणून तुम्हाला उत्पादनांमधील नाविन्याचे महत्व निश्चितच माहीत आहे. त्यामुळे, तुम्ही संशोधनात अधिक गुंतवणूक करावी असे आवाहन मी तुम्हाला करेन. आज जागतिक बाजारपेठा नव्याने उत्क्रांत होत आहेत. त्या अनुषंगाने, आज काळानुसार बदलत्या गरजा काय आहेत, ते समजून घेत आपण त्याचा अंगीकार करायला हवा.”
आपले भाषण संपवतांना, अनुप्रिया पटेल यांनी उद्योगक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचे अभिनंदन केले.

या समारंभादरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्र्यांच्या हस्ते निर्यातदारांना त्यांच्या उत्कृष्ट निर्यात कामगिरीबद्दल 67 पुरस्कार प्रदान करण्यात आले . यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्र, तसेच बिगर एमएसएमई आणि सेवाक्षेत्र यांचा समावेश होता. उत्कृष्ट निर्यात वित्त कर्जासाठी बँका/वित्तीय संस्थांनाही पुरस्कार देण्यात आला. सर्व पात्र निर्यातदारांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी यासाठी अनेक श्रेणींमध्ये निर्यातदारांना पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराने सर्व वस्तू गटातील निर्यातदारांना सन्मानित केले जाते.
अनुप्रिया पटेल यांचे स्वागत करतांना, एफआयईओचे अध्यक्ष डॉ. ए शक्तीवेल म्हणाले की त्यांची उपस्थिती निर्यातदारांना केवळ प्रोत्साहन देणार नाही, तर त्यांना नवनवीन जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रेरणाही देईल. आज ज्या निर्यातदारांना पुरस्कार मिळाले, त्यांच्या कर्तृत्वाच्या कथा हेच सांगणाऱ्या आहेत, की जेव्हा संकटे येतात, तेव्हा अशी संकटेच माणसाला अधिक कणखर बनून पुढे जायला शिकवतात. चालू आर्थिक वर्षात,देशाची एकूण निर्यात 775-790 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणे अपेक्षित असून, 2021-22 च्या 672 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी निर्यातीपेक्षा यंदा ही निर्यात सुमारे 12% अधिक असेल, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना, एफआयईओच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष, परेश मेहता, यांनी पश्चिम विभागातील निर्यात पुरस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. पश्चिम विभागाअंतर्गत येणाऱ्या भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि छत्तीसगडमधील या 5 प्रमुख राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांचा हा सन्मान आहे. असे ते म्हणाले. निर्यात उत्कृष्टता पुरस्कार, निर्यातदारांना आणखी पुढचे टप्पे गाठण्यासाठी प्रोत्साहन देतात.
देशातील आघाडीचे उद्योजक, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, आंतरराष्ट्रीय राजनैतिक क्षेत्रातील प्रतिनिधी, व्यापार आणि संघटनांचे प्रतिनिधी आणि निर्यातदार या समारंभाला उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910761)