आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजेएवाय) राज्यांच्या 20 हून अधिक विशिष्ट योजनांसह 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू
Posted On:
17 MAR 2023 5:14PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एबी-पीएमजय) 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यांनी लागू केलेल्या 20 पेक्षा जास्त विशिष्ट योजनांशी सांगड घालत केली जाते. सह-ब्रँडेड आयुष्मान कार्ड सर्व 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्र आणि राज्यांद्वारे समर्थित पात्र लाभार्थ्यांना जारी केले जाते. 9 मार्च 2023 पर्यंत पडताळणी केलेल्या लाभार्थ्यांना एकूण 23.19 कोटी आयुष्मान कार्ड दिली गेली आणि रूग्णालयात दाखल झालेल्या 4.44 कोटींहून अधिक जणांसाठी रुग्ण सेवेवर 53,350.20 कोटी रूपये खर्च झाला आहे. 11,700 खाजगी रुग्णालयांसह सूचीबद्ध 25,969 आरोग्य सेवा पुरवठादारांच्या जाळ्याद्वारे ही सेवा पुरवली जाते.
ही जगातील सर्वात मोठी आरोग्य कवच योजना आहे. 2011 च्या सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणना (एसइसीसी) माहितीनुसार, निवडक वंचिततेच्या आधारावर आणि व्यावसायिक निकषांच्या आधारे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी निश्चित केलेल्या 60 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रूपयांचे आरोग्य संरक्षण ही योजना देते.अचानक आलेल्या आरोग्य खर्चासाठी आर्थिक जोखमीचे संरक्षण प्रदान करण्यासाठी या योजनेची रचना केलेली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी ठरवल्यानुसार विमा किंवा ट्रस्ट किंवा मिश्र पद्धतीने ही योजना लागू केली जाते.
आयुष्मान भारत-आरोग्य आणि निरामय केंद्रे (एबी- एचडब्ल्युसीएस) अंतर्गत, माता आणि बालकांसाठी तसेच असंसर्गजन्य रोगांसाठीची आरोग्य सेवा दिली जाते. ही सर्वसमावेशक गरजांवर आधारित असलेली आरोग्य सेवा असून त्याद्वारे देशातील सर्व नागरिकांना आवश्यक औषधे आणि निदान सेवा मोफत पुरवल्या जातात. एबी-पीएमजेएवाय योजना पात्र लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही सूचीबद्ध रुग्णालयात आरोग्य सेवा (परिभाषित पॅकेजनुसार) मिळवून देते.
ज्या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू होत नाहीत तिथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने रुग्णालये थेट सूचीबद्ध केली आहेत. त्यामुळे या योजनेतील लाभार्थी त्या राज्यांमध्येही आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. तसेच एकत्रित केलेल्या राज्य योजनांचे लाभार्थी या योजनेच्या कुठेही सेवा मिळण्याच्या वैशिष्ट्यांतर्गत देशभरातील कोणत्याही योजना यादीत समाविष्ट असलेल्या रुग्णालयात आरोग्य सेवा घेण्यासाठी पात्र ठरतात.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908245)
Visitor Counter : 251