युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारतातील विकासविषयक राजकारणासाठी नागरिकांचा सहभाग कसा महत्वाचा आहे, यावर पुण्यामधील Y20 सल्लामसलत बैठकीतील या विषयावरील सत्रात विचारमंथन

Posted On: 11 MAR 2023 10:10PM by PIB Mumbai

पुणे, 11 मार्च 2023 

 

सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी), लव्हाळे पुणे येथे Y20 सल्लामसलत बैठकीत विकासविषयक राजकारण या विषयावरील आजच्या दिवसाच्या पाचव्या सत्रात, पॅनेलच्या सदस्यांनी भारतातील विकासविषयक राजकारणसाठी नागरिकांचा सहभाग कसा महत्त्वाचा आहे, यावर भर दिला.

नोकरशाही आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्याच्या गरजेवर पॅनेलच्या सदस्यांनी भर दिला. याबरोबरच “सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टू अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन” (SATAT), अर्थात, किफायतशीर वाहतुकीसाठीचा शाश्वत पर्याय, आणि सरकारद्वारे त्याची अंमलबजावणी कशी केली जाते यावर ही  चर्चा झाली

विकासाचे राजकारण गुंतागुंतीचे असून त्यासाठी शांतता आणि समन्वय आवश्यक असल्याचे सहभागी वक्त्यांनी निदर्शनास आणून दिले. सलोखा शांतता सुनिश्चित करतो, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. G20 संघटनेला आंबेडकरांनी दाखवलेला शांततेचा मार्ग आणि समानतेची आवश्यकता आहे, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास साधायला मदत होईल असे मत वक्त्यांनी नोंदवले.

धोरणकर्ते जे प्रकल्प, धोरणे घेऊन येतात, त्याची अंमलबजावणी केवळ त्यांच्यावर नव्हे, तर भागधारकांच्या सहभागावर अवलंबून असते, यावर ओमान सल्तनत इथल्या खिमजी रामदास एलएलसी चे संचालक, कैरवी खिमजी यांनी  भर दिला. कोणतेही धोरण बनवताना नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय, अथवा त्यांच्या समाधानाशिवाय त्याची  अमलबजावणी अशक्य असतो. 

शिक्षक होण्यासाठी विशिष्ट पात्रता असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे निवडणुकीला उभे राहण्यासाठी राजकारण्यांसाठी देखील विशिष्ट स्तरावरील पात्रतेचे निकष आणि दर्जा का असू नये, असा प्रश्न या चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आला.

कैरवी म्हणाले की ज्या लोकांकडे निर्णय घेण्याची ताकद आहे त्यांनी अनुभव संपन्न असायला हवे, आणि त्यांच्यामध्ये इतरांना समजून घेण्याची, तसेच धोरणांचे केवळ नियोजन नव्हे, तर त्याची अंमलबजावणी देखील करण्याची क्षमता हवी.

साधन संपत्तीचे समान वाटप आणि त्याची सर्वांसाठी सहज उपलब्धता, नागरिकांची समज आणि सहभागा द्वारे विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करणे आणि धोरणे बनवताना, त्याच्या   लाभार्थींचा विचार करणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे, हे या सत्राचे ठळक मुद्दे होते.  

 

* * *

PIB Mumbai | JPS/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906010) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu