अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
उत्तर प्रदेशात आग्रा येथे दोन दिवसीय भरड धान्य महोत्सवाचे आयोजन
स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच भरड धान्य आधारित खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली
Posted On:
04 MAR 2023 11:02PM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशात आग्रा येथे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने 3 - 4 मार्च, 2023 दरम्यान दोन दिवसीय भरड धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कायदा आणि न्याय राज्यमंत्री प्रा. एसपी सिंह बघेल यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मिन्हाज आलम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रा. एस.पी. सिंग बघेल यांनी भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमत गव्हापेक्षा अधिक ठेवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाची प्रशंसा केली. यामुळे शेतकऱ्यांना विशेषत: जिथे पाण्याची कमतरता आहे अशा प्रदेशांमध्ये भरड धान्याची लागवड करण्यास प्रोत्साहन मिळेल. बघेल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आणि या उपक्रमाला यशस्वी बनवण्यात भारत आघाडीवर असून जागतिक स्तरावर भरड धान्याला ओळख मिळवून दिली आहे.
बघेल यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचा उल्लेख कृषी अंत्योदय (शेतकऱ्यांचे उत्थान) काळ असा केला. ते म्हणाले की, अनेकदा भरड धान्याचा संबंध गरीबांच्या जीवनशैलीशी जोडलो जातो आणि ही धारणा बदलण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. कायदा आणि न्याय राज्यमंत्री बघेल हे आग्र्याचे खासदार देखील आहेत. भरड धान्य महोत्सवाच्या पुढाकाराबद्दल आणि या कार्यक्रमासाठी आग्रा जिल्ह्याची निवड केल्याबद्दल अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे त्यांनी आभार मानले. उत्तर प्रदेशात अन्नधान्याचे सर्वाधिक उत्पादन होते आणि 2020-21 मध्ये देशातील एकूण अन्नधान्य उत्पादनात त्याचा सुमारे 18.89% वाटा (58.32 दशलक्ष मेट्रिक टन) आहे. वर्ष 2019-20 मध्ये, उत्तर प्रदेश राज्याने 21,71,836.00 मेट्रिक टन भरड धान्याचे उत्पादन केले. ज्वारी, बाजरी, कोडो आणि बार्नयार्ड बाजरी या मुख्यतः उत्तर प्रदेशात लागवड केली जाणाऱ्या भरड धान्याच्या विविध जातींचा यात समावेश होतो. आग्रा जिल्ह्यात, प्रामुख्याने ज्वारी आणि बाजरीचे उत्पादन केले जाते. सन 2019-20 मध्ये, आग्रा येथे 99 मेट्रिक टन ज्वारी आणि 2,93,964 मेट्रिक टन बाजरीचे उत्पादन झाले.
भरड धान्याच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दल बोलताना बघेल म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशात प्रथमच भरड धान्य आधारित खरेदी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि यासारख्या उपक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करण्याच्या पुढाकाराला मोठा हातभार लागेल. यावेळी त्यांनी भरड धान्याचे पौष्टिक फायदे आणि मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास याची कशी मदत होते याबद्दलही सांगितले.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मिन्हाज आलम यांनीउपस्थितांना सांगितले की सरकार देशभरातील 20 राज्ये आणि 30 जिल्ह्यांमध्ये भरड धान्य महोत्सवाचे आयोजन करत आहे आणि हे जिल्हे भरड धान्य प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रमुख क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी भरड धान्य महोत्सवाचे उद्दिष्ट आणि ठळक वैशिष्ठ्ये तसेच त्यांच्या प्रक्रियेमागील सर्वांगीण दृष्टिकोनाचे महत्त्व याबद्दल उपस्थितांचे प्रबोधन केले. पाण्याची किमान गरज आणि भूप्रदेशानुसार जुळवून घेण्याची क्षमता यासारख्या भरड धान्याच्या विविध वैशिष्ट्यांवर त्यांनी भर दिला. त्यामुळे भरड धान्य हा व्यावसायिक पिकांसाठी योग्य पर्याय ठरतो. मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, पंजाब, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, पश्चिम बंगाल, आणि झारखंड राज्यांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव आयोजित केले जात आहेत.
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904349)
Visitor Counter : 206