आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. मनसुख मांडवीया यांनी प्रगती मैदान वर्क्स बुक फेयर इथे ‘इंडिया’स वैक्सिन ग्रोथ स्टोरी’ ह्या पुस्तकाचे केले अनावरण
“संशोधन-आधारित दस्तऐवजीकरण भारताच्या परंपरा प्रकाशात आणू शकेल; ज्या पारंपरिक आधारावर आणि वारशावर भारताने कोविडवर मात केली, त्यांच्या आधारावर जगातील शक्यता आणि उपाययोजना यावर भाष्य करता येईल”- मनसुख मांडवीय
“भारताने लसीकरण धोरणासह कोविड व्यवस्थापनाचे एक उत्तम मॉडेल जगापुढे सादर केले, ज्यातून 3.4 दशलक्ष जीव वाचू शकले”
Posted On:
04 MAR 2023 6:46PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान इथे आयोजित 2023 जागतिक पुस्तक मेळाव्यात भारत सरकारचे अतिरिक्त सचिव सज्जन सिंग यादव यांनी लिहिलेल्या 'इंडियाज व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी - फ्रॉम काउपॉक्स टू व्हॅक्सिन मैत्री' या पुस्तकाचे प्रकाशन केले. कोविड-19 लसी विकसित, उत्पादन आणि वितरण यामधील भारताच्या प्रभावी कामगिरीबद्दल या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. मांडविया यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिक समुदायावर आणि देशभरातील आरोग्यसेवा व्यावसायिकांवर दाखवलेल्या विश्वासाचे गुणवर्णन केले. पंतप्रधानांचे खंबीर नेतृत्व आणि कार्यक्षम वैज्ञानिक-व्यावसायिक यांच्या संयोगातून, भारताने अशा अभूतपूर्व आव्हानांचा सामना करतांना, याआधी कोणत्याही देशाने केली नसेल अशी कामगिरी केली. आपण केवळ आपल्या राष्ट्रासाठीच नाही, तर जगभरात जीव वाचवणाऱ्या लसींचा योग्य वेळेत पुरवठा केला. या कठीण काळात आरोग्यसेवा व्यावसायिकांनी दाखवलेल्या अतुलनीय समर्पणाचे कौतुक करताना डॉ. मांडवीया म्हणाले की, " जगभरातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारताने 2.2 अब्ज लसमात्रा दिल्या, ज्यामुळे सुमारे 3.4 दशलक्ष लोकांचे जीव आपण वाचवू शकलो."
जेव्हा जगात अनेक ठिकाणी लस घेण्याबद्दल लोकांच्या मनात साशंकता असल्याने, अनेक देश हा प्रश्न सोडवण्यास झुंजत होते, अशा वेळी भारताने प्रभावी लसीकरण मोहिमेसह एक आदर्श कोविड व्यवस्थापन मॉडेल जगासमोर ठेवले, असे मांडवीय म्हणाले.
“संशोधन, उत्पादन आणि लसीकरण मोहीम,अशा सर्व गोष्टींविषयी या पुस्तकात सविस्तर विवेचन करण्यात आले, ज्यातून, केवळ महामारीचे संकटच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहत नाही, तर, देशातील लसीकरणाचा इतिहास, ज्याची पाळेमुळे 2500 वर्षांच्या पूर्वीची आहेत, ते देखील आपल्याला यात वाचायला मिळेल, याचा मला अत्यंत आनंद वाटतो आहे.” असे मांडवीय म्हणाले.
"संशोधन-आधारित दस्तऐवजीकरण हे भारताचा वारसा उजेडात आणणारे असे माध्यम आहे, जे जगासमोरील शक्यता आणि त्यावरील उपायायोजना यावर भाष्य करू शकेल, जसे भारताने आपल्या पारंपारिक मुळांचा आणि वारशाचा आधार घेत, कोविड-19 चा यशस्वी लढा दिला” असे सांगतानाच अशा लेखनासाठी आणखी लेखकांनी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की "आपला वारसा हे आपले काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले पारंपरिक ज्ञान आणि विज्ञान यांचे प्रतिबिंब मांडणारा असून संकटकाळात हेच ज्ञान अनुकरणीय सिद्ध झाले आहे". भारतातील पारंपारिक अभिवादन 'नमस्ते' चे उदाहरण देऊन ते म्हणाले, की आज हीच पद्धत कोविड महामारीच्या अभिवादन करण्याचा एक जागतिक अभिनव मार्ग ठरली. भारतीयांनी आपल्या परंपरांवर संशोधन करावे, तर त्यांना त्यात वैज्ञानिक प्रक्रियांवर आधारित ज्ञानाचा खजिना सापडेल, अशा परंपरा ज्यांनी भारताला जगात मानाचे स्थान मिळवून दिले आणि जगभरात या ज्ञानाला मान्यताही मिळाली, असे मांडवीय यांनी सांगितले.
भारताच्या सुप्त आणि विस्मृतीत गेलेल्या परंपरा आणि वारसा प्रकाशात आणू शकेल, अशी संशोधन-आधारित दस्तऐवजे लेखकांनी प्रकाशित करावी, असे आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी केले.
असे 12 आजार आहेत, जे लसींद्वारे टाळता येऊ शकतात, त्यांना लस प्रतिबंधक आजार म्हणून ओळखले जाते. हे आजार भारताच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा एक भाग असून भारत सरकार गर्भवती स्त्रिया, तरुण आणि नवजात शिशु यांना या लसी मोफत देते. अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यावेळी दिली.
“इंडियाज व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी- फ्रॉम काउपॉक्स टू व्हॅक्सिन मैत्री’ या पुस्तकात भारतात कोविड-19 प्रतिबंधा साठी राबवण्यात आलेल्या जगातील सर्वात व्यापक लसीकरण मोहिमेची विस्तृत माहिती आहे. लसीविषयीची भीती किंवा अनास्था, उत्सुकता, उपलब्धता, वाहतूक, लसीकरणाची समान संधी, जनतेशी केलेला प्रभावी संवाद आणि अपेक्षांचे व्यवस्थापन, शीतसाखळीची गतीमानता, लस केंद्र स्थापन करण्यातल्या लॉजिस्टिक्स अडचणींवर केलेली मात, यांसारख्या संपूर्ण कोविड प्रक्रियेतील कठीण आणि बहुआयामी आव्हाने देखील स्पष्टपणे मांडली आहेत.
लसीकरणातील भविष्यातील आव्हाने आणि भारतीय लस उद्योगाच्या वाढीसाठी नवीन संधी देखील लेखकांनी स्पष्टपणे मांडली आहेत. तसेच कोविड-19 लसींचा विकास, उत्पादन आणि वितरण यामधील भारताच्या प्रभावी कामगिरीचाही यात सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव लोक रंजन, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद प्रसाद शर्मा हे देखील यावेळी उपस्थित होते.
***
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904227)
Visitor Counter : 173