वस्त्रोद्योग मंत्रालय
“तुमच्या सृजनशीलतेचा वापर करा, जेणेकरून तुम्ही तुमचे आयुष्य घडवतांनाच देशउभारणीतही योगदान देऊ शकाल, उभे रहा, नव्या कल्पना आणा” एनआयएफटीने आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांचं विद्यार्थ्यांना आवाहन
प्रवेश प्रकिया अधिक सुलभ आणि आटोपशीर करा, परिसराचे नूतनीकरण, अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि गरजूंपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्याचा विस्तार करा, असा वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा एनआयएफटी मुंबईच्या दीक्षांत समारंभात सल्ला
एनआयएफटी, मुंबई मध्ये 2022 या वर्षातील 286 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
Posted On:
24 FEB 2023 10:00PM by PIB Mumbai
मुंबई, 24 फेब्रुवारी 2023
नवी मुंबईतील खारघर इथल्या राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आज झालेल्या दीक्षांत समारंभात, केंद्रीय वस्त्रोद्योग, उद्योग आणि वाणिज्य तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावर्षी, एकूण 286 विद्यार्थ्यांना, (ज्यात 208 पदवीधर आणि 78 पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी) पदवी प्रदान करण्यात आली. वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव, रचना शहा आणि BOG-NIFT चे महासंचालक रोहित कंसल, हे या कार्यक्रमाला, सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलतांना, पीयूष गोयल यांनी सांगितले, की कशाप्रकारे , संस्था, जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी, स्वतःला उन्नत करु शकतात. ते म्हणाले की, “जर एनआयएफटी शैक्षणिक परिषदेने, आपल्या संस्थेत असे काही अभ्यासक्रम आणण्याचा विचार केला, ज्यातून विद्यार्थ्यांना भाषा,सादरीकरण, व्यक्तिमत्व विकास अशी सार्वजनिक आयुष्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकता आली, तर ते फार उत्तम होईल. आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे मूल्यवर्धन करण्याची गरज आहे, जेणेकरून ते लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलू शकतील, त्यांच्या सर्वांगीण विकासासाथी, आपण त्यांना बाहेरच्या खडतर जगाचा सामना करण्यास तयार करायला हवे. नव्या युगातील नव्या संस्कृतीच्या अनुरूप आपल्याला महासंचालक हे पदही बदलायला हवे.”
पंतप्रधानांनी वसाहतवादी मानसिकता बदलण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसार, दीक्षांत समारंभात, आपला पारंपरिक पोशाख घालून येण्याची कृती, अतिशय स्तुत्य आहे. तसेच, मी एनआयएफटी मुंबईला अशीही विनंती केली आहे, त्यांनी इथल्या सगळ्या परिसरात नवे तंत्रज्ञान आणावे.” असे गोयल म्हणाले. संस्थेमध्ये आता काळानुरूप अद्ययावत अभ्यासक्रम आणायला हवा आणि उद्योगात होणाऱ्या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढवायला हवा, असेही त्यांनी पुढे सांगितले.
शिक्षणाच्या खर्चाबद्दल बोलताना गोयल म्हणाले, “राष्ट्रीय फॅशन संस्थेच्या नियामक परिषदेला मी विनंती केली आहे की शैक्षणिक शुल्क स्थिर ठेवले जावे, जेणेकरून दरवर्षी ते वाढणार नाही.
वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय फॅशन संस्थेत शिकण्याची संधी मिळावी आणि खरोखर चांगले फॅशन डिझायनर बनता यावे, यासाठी आपल्याला शिष्यवृत्तीची व्याप्ती देखील वाढवावी लागेल. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य बदलेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी असेल आणि त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिल्यानंतर गुणवान विद्यार्थ्यांना गरजेनुसार शिष्यवृत्ती देता येऊ शकेल असे त्यांनी सांगितले.
प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबाबत ते म्हणाले की एक वेगवान आणि अधिक आटोपशीर अशी प्रवेश प्रक्रिया असावी. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज केल्यापासून अंतिम प्रवेशापर्यंतचा वेळ 50% कमी होईल. आम्ही जगभरातील चांगल्या पद्धतींनुसार प्रवेश प्रक्रियेचे विभाजन दोन फेऱ्यांमध्ये करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे अधिक मुलांना अर्ज करण्याची संधी मिळेल. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि सोपी असायला हवी, असे त्यांनी सुचविले.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक कलेचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करावी अशी इच्छा व्यक्त करून ते म्हणाले, “आपण विद्यार्थ्यांना हातमाग आणि हस्तकला क्लस्टर्समध्ये पाठवू या, त्यांना काही डिझाइन्स करू द्या. कारागिरांना त्यांची उत्पादने गव्हर्नमेंट इ मार्केटप्लेस वर पाठवता आली तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे विणकर आणि कारागीरांना ऑनलाईन विक्रीसाठी मदत होईल "
विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना ते म्हणाले, “पदवी ही नवीन भविष्याची सुरुवात आहे. तुम्ही सर्जनशीलता वापरलीत तर स्वतःच्या कारकीर्दीप्रमाणेच राष्ट्र उभारणीतही योगदान देऊ शकता. ट्रेंडसेटर व्हा, यंत्रणेत पूर्णपणे नवीन कल्पना आणा. असे केलेत तर तुम्ही आणि तुमच्या नंतर येणार्या तुकड्यांचा राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेला (एनआयएफटी) अभिमान वाटेल. विणकरांना आणि कापड उद्योगाला हे नवीन पदवीधर सक्षम बनवतील, असा मला विश्वास वाटतो. उभे राहा, गर्दीचा एक भाग होऊ नका, फक्त प्रस्थापित मार्गावर जाऊ नका, फॅशन हा फक्त करियर किंवा नोकरी किंवा मर्यादित दृष्टीकोन असू शकत नाही, फॅशन हा खरोखरच जीवनाचा एक मार्ग आहे. अमृत कालमध्ये या करिअरची सुरुवात करण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे त्यामुळे तुमचे आयुष्य अमृतासारखे होईल, असे त्यांनी पुढे सांगितले.


वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव बीओजी-एनआयएफटीच्या अध्यक्ष रचना शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एनआयएफटीच्या रूपाने त्यांना एका उत्तम संस्थेत शिक्षण घेण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. " भारताला कापडाची खूप मोठी, सखोल परंपरा आहे, तुम्ही या परंपरेचे राजदूत म्हणून ती अधिक मजबूत कराल", अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तुम्ही तुमच्या मुळाशी आणि भारतीय परंपरेशी जोडलेले रहा असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण दीक्षांत समारंभ पाहण्यासाठी लिंक
फॅशन या विषयात पदवी प्रदान करणारी एनआयएफटी ही भारतातील पहिली संस्था आहे. या संस्थेच्या पदव्यांना जगभरात मान्यता आहे. दीक्षांत समारंभात संस्था पदवीधरांना पदवी प्रदान करते.
S.Kane/Radhika/Prajna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902182)