सांस्कृतिक मंत्रालय
जी-20 सांस्कृतिक कार्य गटाच्या बैठकीत, जी-20 सदस्य देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये, चार मुख्य संकल्पनांविषयी सर्वसहमती : गोविंद मोहन, सांस्कृतिक कार्य सचिव
Posted On:
24 FEB 2023 8:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
जी-20 च्या पहिल्या सांस्कृतिक कार्य गटाच्या बैठकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रांचे आयोजन आज खजुराहो इथल्या, महाराजा छत्रसाल संमेलन केंद्रात करण्यात आले होते.यावेळी, या गटाच्या कार्यपद्धतीविषयी तसेच, या बैठकीचे ज्ञान-भागीदार, युनेस्कोविषयीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या बैठकीच्या सांगता समारंभात बोलतांना सांस्कृतिक कार्य सचिव गोविंद मोहन म्हणाले की भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील, सांस्कृतिक कार्यगटाची पहिली बैठक आज संपली. या बैठकीत, भारताने निश्चित केलेल्या प्राधान्यांनुसार, चार महत्वाच्या सत्रामध्ये भरीव चर्चा करण्यात आली,असे त्यांनी सांगितले. या बैठकीसाठी भारताने चार मुख्य संकल्पना मांडल्या होत्या. यात, सांस्कृतिक संपत्तीचे संरक्षण आणि पुनर्स्थापन, शाश्वत भविष्याच्या आजच्या वारशाचे संवर्धन, सांस्कृतिक आणि सृजनशील उद्योगांना प्रोत्साहन आणि सृजनशील अर्थव्यवस्था आणि चौथे, संस्कृतीचे संरक्षण आणि प्रोत्साहन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग.
या दोन दिवसीय विचारमंथनात G-20 सदस्य देश, अतिथी देश आणि बैठकीत भाग घेतलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये, हे सगळे विषय जोरकसपणे पुढे न्यावेत यावर एकमत झाले. भारताच्या प्रस्तावाला सर्व देशांनी पाठिंबा दिला, असेही त्यांनी सांगितले.
या विषयातील तज्ज्ञांनी आता पुढच्या वेबिनारद्वारे सूक्ष्म-स्तरीय तपशीलांवर काम करावे, जेणेकरून ऑगस्टपर्यंत आम्ही नवीन उपक्रमाची घोषणा करू शकू आणि त्याआधारे काही अभिनव मार्ग काढता येईल, असे या बैठकीत ठरल्याचे गोविंद मोहन यांनी सांगितले. या परिषदेदरम्यान, इंग्लंड, मॉरिशस, जपान, सिंगापूर, अमेरिका यासह अनेक देशांशी भारताच्या झालेल्या बैठकीत द्विपक्षीय चर्चाही झाली, असे मोहन यांनी सांगितले.
संध्याकाळी, जी-20 च्या प्रतिनिधींनी खजुराहो इथल्या आदिवर्त आदिवासी आणि लोककला संग्रहालयालाही भेट दिली.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902157)
Visitor Counter : 229