उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देश उभारणीत ‘अन्नदात्याच्या’ योगदानाची उपराष्ट्रपतींनी घेतली दखल, कृषीक्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे उपराष्ट्रपतींचे गौरवोद्गार

Posted On: 24 FEB 2023 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023

नवी दिल्लीत आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अध्यक्षतेखाली, भारतीय कृषी संशोधन संस्था-आयसीएआर-आरएआरआय चा 61 वा दीक्षांत समारंभ झाला. देशाच्या प्रगतीसाठी, कृषीशिक्षण, संशोधन, अभिनव प्रयोग आणि उद्यमशीलतेच्या केंद्रस्थानी असायला हवे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

कृषीव्यवस्था, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे सांगत, उपराष्ट्रपतींनी देशाच्या सर्वांगीण विकासात अन्नदात्याच्या व्यापक योगदानाची यथोचित दखल घेतली. जेव्हा संपूर्ण जग, कोविडच्या संकटाचा सामना करत होतं, अशा स्थितीत सुद्धा, देशातील 80 कोटी लोकांच्या अन्नसुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाच्या कृषी क्षेत्राच्या कटिबद्धतेचे त्यांनी कौतुक केले.

2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. जगभरातील कृषी क्षेत्रासाठी हा उपक्रम किती महत्वाचा आहे, हे ही त्यांनी सांगितले. आज कृषी क्षेत्रात ड्रोनसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर, बदलत्या काळानुरूप, या क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवतो आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

कृषी क्षेत्राच्या प्रगती आणि कल्याणासाठी उचललेल्या पावलांची त्यांनी माहिती दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत, आतापर्यंत 11.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात, 2.2 लाख रुपये जमा करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आयसीएआर- आयएआरआय या कृषी अध्ययन संस्थेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज सर्वच क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करत असून, ते खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिनिधित्व करतात, असे धनखड यावेळी म्हणाले. अत्यंत विश्वासार्ह, ध्येयनिष्ठ आणि मिशन मोडवर काम करणाऱ्या संस्थेतून हे विद्यार्थी समाजाला आपले सर्वकाही अर्पण करण्यासाठी बाहेर पडतात असे ते म्हणाले.

युवा पिढीने भारताच्या आजवरच्या कामगिरीबद्दल अभिमान बाळगायला हवा,लोकशाहीची जननी म्हणून विश्वासार्हता मिळवलेल्या आपल्या देशाकडे युवकांनी अभिमानाने बघावं, असं आग्रही प्रतिपादन धनखड यांनी यावेळी केले.  आपली संसद देशाचे मंदिर आहे, असे सांगत, ते स्थान, संवाद, विवाद, चर्चा आणि मंथन यासाठी आहे, त्यामुळे ते गदारोळ आणि गोंधळाचे ठिकाण बनू नये,असे आवाहन त्यांनी केले. राज्यघटनेच्या कलम 105 अन्वये नागरिकांना मिळालेले विशेषाधिकार मोठ्या जबाबदारीसह येतात आणि या जबाबदाऱ्या चुकीच्या नाहीत, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

या दीक्षांत समारंभादरम्यान, धनखड यांनी ICAR-IARI च्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुणवत्ता पदके आणि पुरस्कार प्रदान केलीत. तसेच, त्यांच्या हस्ते, 16 विविध प्रकारची धान्ये, फळे आणि भाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही झाले.

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902151) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Hindi