मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहकाराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे -केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला


सागर परिक्रमा हे केवळ किनारपट्टीलगत राहणाऱ्या समुदायांचे म्हणणे ऐकण्यासाठीच नाही तर आपल्या देशाच्या किनारपट्टीवरील संपत्तीबद्दल जाणून घेण्याचे देखील एक माध्यम आहे : सागर परिक्रमा टप्पा III च्या समारोप प्रसंगी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला

महाराष्ट्रातील सातपाटी, वसई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील बंदरांचा सागर परिक्रमेच्या तिसर्‍या टप्प्यात समावेश आहे.

किनारपट्टीलगत राहणाऱ्या समुदायांना केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्याशी संवाद साधण्याची आणि मत्स्यव्यवसासाठी विविध सरकारी योजनांचे फायदे समजून घेण्याची संधी मिळाली

Posted On: 21 FEB 2023 10:08PM by PIB Mumbai

मुंबई, 21 फेब्रुवारी 2023

 

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्त ‘सागर परिक्रमा’ कार्यक्रम सुरू केला आहे. सागर परिक्रमेचा तिसरा टप्पा 19 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू होता. मुंबईतील ससून डॉक येथे आज त्याचा समारोप  झाला.

मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या कल्याणासाठी सरकारने केलेल्या विविध तरतुदींबद्दल बोलताना केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले, “सरकारने मत्स्यव्यवसाय क्षेत्राला आता स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा दिला आहे.  या क्षेत्रात वीस  हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या दृष्टीकोनातून प्रधानमंत्री  मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय संबंधी पायाभूत सुविधा मजबूत करण्यात आल्या आहेत. सहकार क्षेत्रालाही स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला असून आता सहकाराच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्राला बळकटी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच मच्छीमारही शेतकऱ्यांप्रमाणे किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतो. मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे किनारपट्टीवरील समुदायांचे आर्थिक उत्थान होईल.

सागर परिक्रमा टप्पा III बद्दल बोलताना ते  म्हणाले, “सागर परिक्रमा टप्पा III ला सातपाटी येथून प्रारंभ झाला,  जिथे आता एका योजनेद्वारे एक नवीन जेट्टी  विकसित केली जाणार आहे आणि त्यासाठी आम्ही दोन हजार साठ कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेल्या तीन दिवसांत मच्छिमार आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी मांडलेल्या समस्या सोडवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सागर परिक्रमा हे केवळ किनारपट्टीलगत राहणाऱ्या समुदायांचे म्हणणे ऐकण्यासाठीच नाही तर आपल्या देशाच्या किनारपट्टीवरील संपत्तीबद्दल जाणून घेण्याचे देखील एक माध्यम आहे.”

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र सरकारचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की  सागर परिक्रमा  टप्पा III च्या माध्यमातून केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेमुळे  राज्य सरकार विविध समस्या सोडवू शकेल आणि किनारपट्टीवरील  समुदायांसाठी अधिक  सुविधा प्रदान करेल. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्र्यांनी पुढाकार घेऊन किनारपट्टीवरील समुदायांशी संवाद साधल्याबद्दल मुनगंटीवार यांनी त्यांचे  आभार मानले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने , मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे सचिव जे. एन. स्वैन यांनी भारतीय मत्स्य सर्वेक्षणाचे नवीन संकेतस्थळ सुरु केले तसेच एफएसआय  बुलेटिन क्र. 34 जारी केले. सागर परिक्रमेच्या तिसर्‍या टप्प्यात केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सातपाटी (पालघर), वसई (पालघर), वर्सोवा (मुंबई उपनगर), भाऊ चा धक्का (मुंबई उपनगर) आणि ससून डॉक (मुंबई उपनगर) इथल्या मच्छिमार समुदायाशी संवाद साधला.

उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भागवत कराड, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष, राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे, महाराष्ट्र शासनाचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री, सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र शासनाचे पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री, मंगल प्रभात लोढा, आणि इतर मान्यवर परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित होते. 

भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय मत्स्यविकास मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, भारतीय तटरक्षक दल, राज्य मत्स्यव्यवसाय अधिकारी, देशभरातील मच्छीमार प्रतिनिधी, मत्स्य-शेतकरी, उद्योजक, भागधारक, व्यावसायिक, अधिकारी आणि शास्त्रज्ञ हे देखील यावेळी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात, प्रगतीशील मच्छीमार, विशेषत: किनारपट्टीवरील मच्छीमार, मच्छीमार आणि मत्स्यपालक, तरुण मत्स्य उद्योजक इ. यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि राज्य योजनेशी संबंधित प्रमाणपत्रे/मंजुरी प्रदान करण्यात आली. PMMSY योजना, राज्य योजना, ई-श्रम, FIDF, KCC इत्यादी साहित्याला देखील प्रसिद्धी देण्यात आली. मच्छीमार आणि मत्स्य-शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न आणि समस्यांबद्दल बोलण्याची संधी देण्यात आली. सातपाटी येथे ‘सागर परिक्रमा’ हे मराठी गाणे प्रकाशित करण्यात आले. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तींचे प्राण वाचवताना धाडस आणि शौर्य दाखवणारे मच्छीमार, राकेश मेहेर, आतिश मेहेर, रितेश मेहेर, चंद्रकांत तांडेल आणि हरीशचंद्र मेहेर यांना यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

सागर परिक्रमा टप्पा III अंतर्गत सुमारे 12,500 मच्छीमार आणि मत्स्यपालकांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. मच्छिमार सोसायट्यांमधील स्थानिक वक्त्यांनी विविध चर्चासत्रात उत्साहाने भाग घेतला. विम्याच्या दाव्यांचे वितरण, मासेमारी करताना एलईडी वापरावर बंदी, अत्याधुनिक सातपाटी मासळी बाजाराचे उद्घाटन, आणि आरएएस, इन्सुलेटेड वाहन, ओपन केज कल्चर, मूल्यवर्धित उत्पादन अशा विविध प्रकल्पांसाठी पीएमएमएसवाय योजना आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मान्यवर आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने मच्छिमार समुदायाला आनंद झाला. परीक्रमेने भेट दिली, त्या सर्व ठिकाणच्या मच्छिमार समुदायाने पारंपरिक लोक-कलांच्या सादरीकरणाने त्यांचे स्वागत केले. युट्युब आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आले आणि सुमारे 15,000 लोकांनी ते पाहिले.

   

देशाच्या अन्न सुरक्षेसाठी सागरी मत्स्यसंपत्तीचा वापर आणि किनारपट्टीवरील मच्छिमार समुदायांचे जीवनमान यामधील शाश्वत संतुलन आणि सागरी परिसंस्थांचे संरक्षण तसेच मच्छीमार समुदाय आणि त्यांच्या अपेक्षा यामधील दरी भरून काढणे, मच्छीमार खेड्यांचा विकास, शाश्वत आणि जबाबदार विकास सुनिश्चित करण्यासाठी मासेमारी बंदर आणि लँडिंग केंद्रांसारख्या पायाभूत सुविधांची सुधारणा आणि निर्मिती या घटकांवर सागर परिक्रमेचा प्रवास केंद्रीत आहे.

 महाराष्ट्र राज्याला ठाणे, रायगड, बृहन्मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 किनारी जिल्ह्यांचा 720 किमी लांबीचा किनारा लाभला आहे. मच्छीमार लोक, विक्रेते आणि उद्योग यांचा मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासाच्या आर्थिक मूल्यात, विशेषत्वाने निर्यातीत थेट वाटा आहे.

   

सागर परिक्रमा कार्यक्रम पूर्व-निर्धारित सागरी मार्गाने आयोजित केला जात असून यामध्ये किनारी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. गुजरातमध्ये आयोजित 'सागर परिक्रमा' चा पहिला टप्पा 5 मार्च 2022 रोजी मांडवी येथून सुरू झाला आणि 6 मार्च 2022 रोजी पोरबंदर, गुजरात येथे संपला. सागर परिक्रमेचा दुसरा टप्पा 22 सप्टेंबर 2022 रोजी मंगरूळ ते वेरावळ दरम्यान सुरू झाला आणि 23 सप्टेंबर 2022 रोजी मूल द्वारका ते मधवाड दरम्यान संपला. ''सागर परिक्रमा' च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रवास 19 फेब्रुवारी 2023 रोजी गुजरातमधील सूरत येथील हझिरा बंदर येथून महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.

सागर परिक्रमा हा मच्छीमार आणि मत्स्यपालक यांच्याशी थेट संवाद साधून किनारपट्टीवरील भाग तसेच मच्छिमारांशी संबंधित समस्या समजून घेत सरकारच्या धोरणाची मांडणी करण्याचा एक कार्यक्रम आहे. टप्पा I आणि II मुळे मच्छिमारांसाठीच्या विकास धोरणात मोठे बदल केले आहेत. सागर परिक्रमा कार्यक्रमाकडे मच्छीमार आणि मत्स्यपालक आपल्या विकासाचे साधन म्हणून पाहत असल्यामुळे त्यांनी सागर परिक्रमेचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. सागर परिक्रमा कार्यक्रमाचा परिणाम भावी पिढ्यांवर दीर्घकाळ दिसून येईल. याशिवाय, अनेक विकासात्मक समस्यांसह विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक रीतीने या कार्यक्रमाचा दूरगामी प्रभाव पडेल.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/Sushma/Rajshree/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1901207) Visitor Counter : 271
Read this release in: English , Urdu