अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोल्डन डॉन ऑपरेशन दरम्यान महसूल गुप्तचर संचालनालयाने भारतभरातून 51 कोटी रुपये किमतीचे 101.7 किलो तस्करीचे सोने केले जप्त

Posted On: 21 FEB 2023 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023

 

संपूर्ण भारतात चालवलेल्या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) नेपाळ सीमेवरून कार्यरत असलेल्या सुदानी नागरिकांच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने पाटणा, पुणे आणि मुंबई येथे केलेल्या वेगवेगळ्या कारवाई दरम्यान सुमारे 51 कोटी रुपये (अंदाजे) किमतीचे एकूण 101.7 किलो तस्करीचे सोने जप्त केले. जप्त केलेले सोने मुख्यतः पेस्ट स्वरूपात असून ते भारत-नेपाळ सीमेवरून पाटण्याला आणले जात होते आणि नंतर रेल्वेने किंवा विमानाने देशाच्या विविध भागांमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर मुंबईत नेले जात होते.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी 19.02.2023 च्या रात्री उशिरा तीन सुदानी नागरिकांना पाटणा रेल्वे स्थानकावर मुंबईला जाणार्‍या ट्रेनमध्ये चढताना अडवले. 2 सुदानी नागरिकांकडून 40 पॅकेटमध्ये 37.126 किलो वजनाचे सोने असलेली पेस्ट जप्त करण्यात आली. या नागरिकांनी ही पेस्ट मोठ्या कल्पकतेने त्यांनी घातलेल्या स्लीव्हलेस जॅकेटच्या पोकळीत लपवली होती. यांच्यापैकी तिसरा सुदानी नागरिक सीमावर्ती भागातील तस्करी कारवायांमध्ये समन्वय साधणारा आणि तस्करीच्या सोन्याच्या वाहतुकीची व्यवस्था करणारा हँडलर होता.

दोन सुदानी महिला नागरिकांचा दुसरा गट 20.02.2023 रोजी पुण्यात, हैदराबाद ते मुंबई बस प्रवास करताना अडवण्यात आला आणि त्यांच्याकडून त्यांच्या हातातील बॅगमध्ये लपवून ठेवलेले 5.615 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले.

20.02.2023 रोजी पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या दोन सुदानी नागरिकांचा तिसरा गट मुंबई रेल्वे स्थानकावर रोखण्यात आला. 2 सुदानी नागरिकांकडून अशाच पद्धतीने 40 पॅकेटमध्ये लपवून ठेवलेली 38.76 किलो वजनाचे सोने असलेली सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली.

तस्करांनी अथवा वाहकांनी दिलेल्या सूचनेवर तत्परतेने कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी विविध स्वरुपातील सुमारे 20.2 किलो तस्करी केलेले सोने तसेच तस्करी केलेल्या सोन्याच्या साठवणुकीसाठी वापरले जाणारे 74 लाख रुपये किमतीचे विदेशी चलन आणि 63 लाख रुपयांचे भारतीय चलन मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून जप्त केले. या कारवाईत तिघांना अटक देखील करण्यात आली.

महसूल गुप्तचर संचालनालयाने याआधी परदेशात उत्पादित सोन्याची भारतात तस्करी करण्याच्या विविध नवीन पद्धती उघडकीला आणल्या आहेत. जसे की, तस्करांनी वापरलेल्या पारंपरिक पद्धतींव्यतिरिक्त, देशाच्या ईशान्य भागातून लॉजिस्टिक कंपनीच्या कुरिअरद्वारे किंवा वाहनांच्या पोकळ्यांमध्ये लपविण्याची पद्धत वापरून किंवा बस, रेल्वे, विमान इत्यादीद्वारे वैयक्तिकरित्या तस्करी. किंवा मासेमारीच्या बोटीतून तस्करांनी फेकून दिल्यावर तामिळनाडूच्या किनार्‍यावरील समुद्राच्या तळातून सोन्याची पुनर्प्राप्ती करणे इत्यादी.

सध्याच्या ऑपरेशन गोल्डन डॉन दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने एकूण 51 कोटी रुपये किमतीचे अंदाजे 101.7 किलो सोने जप्त केले आणि 74 लाख रुपये किमतीचे परदेशी चलन तसेच 63 लाख रुपयांचे भारतीय चलन जप्त केले. याशिवाय आतापर्यंत 7 सुदानी आणि 3 भारतीय नागरिकांना अटक केली असून अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1901205) Visitor Counter : 253


Read this release in: English , Urdu