वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या 'टेक्नोटेक्स 2023: एनव्हिजनिंग इंडियन टेक्निकल टेक्सटाइल @ 2047' या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे, 22 ते 24 फेब्रुवारी 2023 दरम्यान मुंबईत आयोजन
भारत आणि परदेशांमधील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या अमाप शक्यता दर्शवण्यासाठी टेक्नोटेक्स 2023
भारताने जी-20 अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे जागतिक तांत्रिक वस्त्रोद्योगात आंतरराष्ट्रीय संपर्क वाढवण्याची उत्तम संधी
Posted On:
17 FEB 2023 5:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2023
वस्त्रोद्योग मंत्रालय 22 ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईतील गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, येथे ‘टेक्नोटेक्स 2023: एन्व्हिजनिंग इंडियन टेक्निकल टेक्सटाइल्स@2047’ हा तांत्रिक वस्त्रांविषयी कार्यक्रम आयोजित करणार आहे.
भारत सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या सहकार्याने तांत्रिक वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, ज्यामध्ये वैद्यकीय, संरक्षण, औद्योगिक, कृषी, ऑटोमोटिव्ह, इमारत, वेष्टनासाठी कापड यांसारख्या विशिष्ट उद्देशांसाठी असलेल्या कापडांचा समावेश आहे.
पहिल्या टेक्नोटेक्सचे आयोजन 2011 मध्ये करण्यात आले होते आणि या महामहोत्सवाचे यंदा 10 वे वर्ष असून तो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि कोविड नंतर प्रत्यक्ष आयोजित करण्यात येत असलेला पहिला कार्यक्रम असेल. टेक्नोटेक्स 2023 मध्ये बी2बी (आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि संस्थात्मक) प्रदर्शन, परिषद आणि चर्चासत्र, सीईओ फोरम, रिव्हर्स बायर सेलर मीट (RBSM), उच्च स्तरीय गोलमेज, गुंतवणूकदार चर्चा, देश आणि राज्य सत्र यांचा समावेश असेल.
विविध देश आणि राज्य सरकारांमधील मान्यवरांचा यात सहभाग असेल. महाराष्ट्र राज्याकडे कार्यक्रमाचे यजमानपद असून कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश ही भागीदार राज्ये आहेत. याव्यतिरिक्त, या कार्यक्रमात तैवान, जर्मनी, स्वित्झर्लंड, गिनी (दक्षिण आफ्रिका), दक्षिण कोरिया, रशिया आणि लक्झेंबर्गसह 30 हून अधिक देशांमधील 150 पेक्षा अधिक तांत्रिक वस्त्र प्रदर्शक आणि 250 हून जास्त खरेदीदार असतील.
भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या भवितव्याबद्दल विचारमंथन करण्यासाठी या कार्यक्रमात जागतिक आणि राष्ट्रीय अग्रणी उद्योजक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ उद्योग प्रतिनिधी, केंद्र आणि राज्य सरकारची मंत्रालये आणि विभाग, वापरकर्ता उद्योग आणि तज्ज्ञ यांची उपस्थिती असेल.
टेक्नोटेक्स 2023, भारत आणि परदेशी देशांमधील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या अमाप क्षमता दर्शवण्यासाठी साहाय्यभूत ठरेल. आता भारताने जी -20 चे अध्यक्षपद स्वीकारले असल्यामुळे, हा कार्यक्रम जागतिक तांत्रिक वस्त्रोद्योगात आपले आंतरराष्ट्रीय संपर्क वाढवण्याची उत्तम संधी देईल.
भारतीय वस्त्रोद्योग बाजारपेठ सध्या जगातील पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ असून 2021-22 मध्ये या उद्योगाने 22.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी उलाढाल केली आहे. गेल्या पाच वर्षात भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योगाने वार्षिक 9-10% वाढ नोंदवत उल्लेखनीय वृद्धी केली आहे.
या तांत्रिक वस्त्र उत्पादनांची विविध उपयोजन क्षेत्रात असलेली मोठी मागणी आणि सध्याच्या जागतिक बाजारपेठेतील गतिशीलता यातून या उदयोन्मुख उद्योगाची भविष्यातील मोठी कामगिरी सूचित होते. त्यामुळे या उद्योगाला आपली दूरगामी क्षमता ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे.
टेक्नोटेक्स 2023 , तांत्रिक वस्त्रोद्योगात भारताला आघाडीचे उत्पादन केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या एकत्रित प्रयत्नांशी सुसंगत आहे. या कार्यक्रमात भारतीय तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी गुंतवणूक क्षमता आणि संधी, तांत्रिक वस्त्र उत्पादनात स्टार्ट अप परिसंस्था आणि स्मार्ट वस्त्रोद्योगात स्टार्ट-अप्स तंत्रज्ञानाचा लाभ, वापरकर्ता दृष्टीकोन (संरक्षण आणि सुरक्षा संस्था); पीएम गतिशक्ती योजनेतील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षमता, संरक्षित आणि शाश्वत कृषी-उत्पादन क्षेत्रात तांत्रिक वस्त्रोद्योग क्षमता, मेडीटेक क्षेत्रातील क्षमता आणि देशांतर्गत क्षमता आणि तांत्रिक वस्त्रांची मानके, गुणवत्ता, नियामक आणि व्यापार पैलू इत्यादी काही अत्यंत धोरणात्मक क्षेत्रांवर चर्चा केली जाईल.
टेक्नोटेक्स 2023 व्यतिरिक्त या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद आयोजित केली असून यामध्ये संपूर्ण जगभरातून आलेले आघाडीचे उद्योजक त्यांचे विचार मांडतील तसेच भविष्यातील संधी आणि वेगाने वाढणाऱ्या तांत्रिक वस्त्राच्या विविध विभागांसाठी संभाव्य रुपरेषा सादर करतील.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योगमंत्री, पीयूष गोयल आणि केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत आणि तांत्रिक वस्त्रोद्योगातील नवीन यशोगाथा साकारण्यासाठी आपण करत असलेल्या एकत्रित प्रयत्नांविषयीचे त्यांचे दृष्टिकोन सामायिक करणार आहेत.
टेक्नोटेक्स 2023 मध्ये सखोल चर्चा, ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यवसाय एकमेकांशी जोडण्यामुळे भारताच्या तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कृतीयोग्य योजना तयार होतील.असा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला विश्वास आहे.
S.Kulkarni/Vasanti/Bhakti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900220)
Visitor Counter : 205