पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गोरखपूर खासदार क्रीडा महाकुंभमध्ये पंतप्रधानांनी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे केलेले भाषण

Posted On: 16 FEB 2023 10:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी  2023

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, गोरखपूरचे खासदार रविकिशन शुक्ला जी, उपस्थित युवा खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि सहकारी!

सर्वप्रथम मी महायोगी गुरु गोरखनाथ यांच्या या पावन भूमीला नमन करतो. खासदार क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो, माझ्या शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी खूप मेहनत केली आहे. या स्पर्धेत काही खेळाडू विजयी झाले असतील तर  काहींना पराभवाचा सामना करावा लागला असेल. मैदान मग ते खेळाचे असो किंवा जगण्याचे, हरणे-जिंकणे सुरू राहतेच. मी खेळाडूंना एवढेच सांगेन की तुम्ही इथवर पोहोचले आहात, म्हणजे तुम्ही पराभूत झालेले नाही. तुम्ही जिंकण्यासाठी खूप काही शिकलात, ज्ञान प्राप्त केले, अनुभव मिळवला आणि जिंकण्यासाठी हेच सर्वात मोठे भांडवल आहे. तुमची खिलाडू वृत्ती तुमच्यासाठी यशाची दारे उघडेल, हे तुम्हाला भविष्यात नक्कीच दिसेल.

माझ्या युवा सहकाऱ्यांनो,

मला सांगण्यात आले आहे की या स्पर्धेत कुस्ती, कबड्डी, हॉकी अशा खेळांबरोबरच चित्रकला, लोकगीते, लोकनृत्य आणि तबला-बासरी वाजवणारे कलाकारही सहभागी झाले आहेत. हा अतिशय सुंदर, स्तुत्य आणि प्रेरक असा उपक्रम आहे. प्रतिभा मग ती खेळातली असो किंवा कला-संगीतातली, प्रतिभेचा आत्मा आणि ऊर्जा सारखीच असते. विशेषत: आपल्या भारतीय परंपरा, ज्या लोकपरंपरा आहेत, त्या पुढे घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारीही आपल्या सर्वांची आहे. रविकिशनजी हे स्वत: इतके प्रतिभावंत कलाकार आहेत, त्यामुळे त्यांना कलेच्या महत्त्वाची जाण असणे स्वाभाविक आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी रविकिशन जी यांचे विशेष अभिनंदन करतो.

मित्रहो,

मागच्या काही आठवड्यांमध्ये खासदार क्रीडा महाकुंभातील हा माझा तिसरा कार्यक्रम आहे. भारताला जगातील सर्वोत्तम क्रीडा शक्ती बनवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला नवीन पद्धती शोधाव्या लागतील, नवे मार्ग निवडावे लागतील आणि नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे मला वाटतो. खासदार क्रीडा महाकुंभ हा असाच एक नवा मार्ग आहे, नवी व्यवस्था आहे. क्रीडा क्षेत्रातील प्रतिभांना वाव देण्यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने क्रीडा स्पर्धा होणे अतिशय गरजेचे आहे. लोकसभा स्तरावरील अशा स्पर्धा केवळ स्थानिक कलागुणांना वाव देत नाहीत तर संपूर्ण क्षेत्रातील खेळाडूंचे मनोबल उंचावतात. यापूर्वी गोरखपूरमध्ये क्रीडा महाकुंभ झाला होता, तेव्हा सुमारे अठरा ते वीस हजार खेळाडू त्यात सहभागी झाले होते. यंदा ही संख्या सुमारे 24-25 हजारांवर गेली आहे. यात युवा मुलींची संख्या सुमारे 9000 इतकी आहे. तुमच्यापैकी हजारो तरुण छोट्या गावातून किंवा लहान शहरातून आलेले आहेत. युवा खेळाडूंना नवीन संधी देण्यासाठी खासदार क्रीडा स्पर्धा कशा प्रकारे एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देते आहे, हे यावरून दिसून येते.

मित्रहो,   

आपली उंची आणखी वाढावी, म्हणून किशोर वयातील अनेक मुले एखाद्या उंच ठिकाणी किंवा एखाद्या उंच झाडाची फांदी धरून लटकताना आपल्याला दिसतात. म्हणजेच वय काही असो, तंदुरुस्त राहण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येकाच्या मनात कायम असते. आमच्या आठवणीत एक काळ असा होता जेव्हा खेडेगावातल्या जत्रेत खूप खेळ होत असत. आखाड्यांमध्ये वेगवेगळ्या खेळांचेही आयोजन करण्यात येत असे. पण काळ बदलला आणि या सर्व जुन्या पद्धती हळूहळू लयाला जाऊ लागल्या. आता परिस्थिती अशी झाली आहे की शाळांमध्ये होणारे पीटीचे तासही टाईमपास करायचे तास मानले जाऊ लागले. अशा विचारसरणीमुळे देशाने आपल्या तीन-चार पिढ्या गमावल्या. भारतात क्रीडा सुविधा वाढल्या नाहीत आणि नवीन क्रीडा पद्धतींनीही आकार घेतलेला नाही. तुम्ही लोक टीव्हीवर सर्व प्रकारचे टॅलेंट हंट कार्यक्रम बघता, त्यांतही अनेक मुले लहान शहरांतील आहेत, असे दिसून येते. अशाच प्रकारे आपल्या देशात खूप गुप्त आणि सुप्त क्षमता आहे, जी बाहेर येण्यास उत्सुक आहे. क्रीडा क्षेत्रातील अशी क्षमता समोर आणण्यात खासदार क्रीडा महाकुंभाचा मोठा वाटा आहे. आज देशभरात भाजपाचे शेकडो खासदार अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहेत. तुम्ही कल्पना करा, मोठ्या संख्येने युवा खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळते आहे. या स्पर्धांमधून पुढे जाऊन अनेक खेळाडू राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणार आहेत. तुमच्यामधूनही असे गुणवंत खेळाडू तयार होतील, जे पुढच्या काळात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक जिंकतील. म्हणूनच हा खासदार क्रीडा महाकुंभ हा एक भक्कम पाया आहे, असे मला वाटते, ज्यावर भविष्यातील भव्य वास्तू उभारली जाणार आहे.

मित्रहो,

क्रीडा महाकुंभसारख्या कार्यक्रमांबरोबर लहान शहरांमध्ये स्थानिक पातळीवर क्रीडा सुविधा निर्माण करण्यावर देश आज भर देतो आहे. गोरखपूरमधले प्रादेशिक क्रीडा स्टेडियम हे याचे उत्तम उदाहरण आहे. गोरखपूरच्या ग्रामीण भागात तरूणांसाठी 100 पेक्षा जास्त मैदाने तयार करण्यात आली आहेत. चौरीचौरा येथे ग्रामीण मिनी स्टेडियम देखील बांधले जात आहे, असे मला सांगण्यात आले आहे. खेलो इंडिया चळवळीअंतर्गत इतर क्रीडा सुविधांबरोबरच खेळाडूंच्या प्रशिक्षणाकडेही लक्ष दिले जात आहे. आता देश एका सर्वांगीण दृष्टीकोनासह जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. 2014 च्या तुलनेत क्रीडा मंत्रालयाचे बजेट आता जवळपास 3 पट जास्त आहे. आज देशात अनेक आधुनिक मैदाने बांधली जात आहेत. TOPS सारख्या योजनांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षणासाठी लाखो रुपयांची मदत दिली जाते आहे. खेलो इंडियासोबतच फिट इंडिया आणि योगविद्येसारख्या मोहिमाही आगेकूच करत आहेत. चांगल्या पोषणासाठी भरड धान्यावर भर दिला जातो आहे. ज्वारी, बाजरीसारखी भरड धान्ये सुपरफूडच्या श्रेणीत येतात. त्यामुळेच आता देशाने त्यांना श्रीअन्न अशी ओळख बहाल केली आहे. तुम्ही सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, देशाच्या या मोहिमेचे नेतृत्व करायचे आहे. आज ऑलिम्पिकपासून इतर मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पदके जिंकत आहेत, तुमच्यासारखे तरुण खेळाडूच तो वारसा पुढे नेणार आहेत.

तुम्ही सर्वजण असेच चमकत राहाल आणि तुमच्या यशाच्या झळाळीने देशाचेही नाव उज्ज्वल  कराल, असा विश्वास मला वाटतो. याच शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे अनेकानेक आभार!

 

 

 

 

S.Bedekar/M.Pange/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900152)