युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
क्रीडा क्षेत्रातील ‘डोपिंग’च्या समस्येचा सामना करण्यासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था, हैदराबाद, आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी
सामंजस्य करार आपले क्रीडापटू आणि क्रीडा परिसंस्थेला पौष्टिक पूरक आहाराबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम करेल असा क्रीडा सचिव सुजाता चतुर्वेदी यांना विश्वास
Posted On:
15 FEB 2023 8:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
क्रीडा क्षेत्रातील डोपिंग (उत्तेजक द्रव्य सेवन) विरुद्धचा लढा कायम ठेवत, भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था, हैदराबाद (एनआयपीईआर- हैदराबाद) यांनी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारतात पूरक पौष्टिक पदार्थांची चाचणी क्षमता निर्माण करणे, पोषण पूरक आहाराच्या वापराशी संबंधित जोखमींबद्दल माहिती देणे आणि जागरूकता निर्माण करणे, स्वच्छ (निरोगी) खेळ आणि अँटी-डोपिंग (उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी) विभागात संशोधनाच्या संधी वाढवणे, आणि खेळाडूंसाठी सुरक्षित आणि उत्तेजक-मुक्त, पौष्टिक पूरक आहारासाठी पर्याय उपलब्ध करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
हा सामंजस्य करार, "खेळाडूंसाठी विशेष आहाराच्या वापरासाठी अन्न" या क्षेत्राला बळकट करण्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठीच्या परस्पर वचनबद्धतेचा एक भाग आहे. हा सहयोग, भारतातील क्रीडा परिसंस्था आणि जनतेच्या फायद्यासाठी NIPER हैदराबाद येथील चाचणी प्रयोगशाळे द्वारे प्राप्त झालेला डेटा आणि माहितीच्या प्रसारासाठी साधने विकसित करण्यामध्ये मदत करेल.
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव (क्रीडा) सुजाता चतुर्वेदी यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले आणि देशात खेळाचे निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सातत्त्यपूर्ण वचनबद्धतेचा विशेष उल्लेख केला. त्या पुढे म्हणाल्या की, हा सामंजस्य करार आपले क्रीडापटू आणि क्रीडा परिसंस्थेला पोषक आहाराबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
खेळाडूंसाठीच्या पौष्टिक पूरक आहारांच्या चाचणीमध्ये देशाच्या प्रगतीच्या दिशेने हा महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी भारत सरकारच्या औषध निर्माण विभागाच्या सचिव एस. अपर्णा यांनी सगळ्यांचे अभिनंदन केले.
भारत सरकारच्या औषध निर्माण विभागाच्या सचिव एस. अपर्णा, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयांच्या (क्रीडा ) सचिव सुजाता चतुर्वेदी, सहसचिव कुणाल औषध निर्माण विभागाचे सहसचिव रजनीश टिंगल, आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा ) महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू सैन तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील शास्त्री भवन इथल्या औषध निर्माण विभागाच्या कार्यालयात या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
सध्याच्या परिस्थितीत, पौष्टिक पूरक आहारांच्या वापराशी संबंधित जोखमींबद्दल जागरूकता नसल्यामुळे उत्तेजक द्रव्य सेवनाची प्रकरणे अनवधानाने घडतात,बाजारात आढळणारी दूषित उत्पादने आणि पौष्टिक पूरक आहाराविषयी संबंधित माहितीचा अभाव यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होते आणि खेळाडूंच्या कारकिर्दीला धोका निर्माण होतो.
अनवधानाने घडलेल्या उत्तेजक द्रव्य सेवनाच्या प्रकरणांपासून खेळाडूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था (नाडा ) वचनबद्ध आहेत. यापूर्वी 2022 मध्ये, देशात पौष्टिक पूरक चाचणी क्षमता तयार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ (एनएफएसयू ) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता. जागरूकता मोहिमा, माहिती, शिक्षण आणि संप्रेषण साहित्य, समाजमाध्यमातून माहिती पोहोचवणे आणि दृकश्राव्य मजकुराच्या माध्यमातून पौष्टिक पूरक आहारांशी संबंधित जोखमींबद्दल खेळाडू आणि क्रीडा व्यवस्थेला जागरूक करणे त्यासाठी नाडाही प्रयत्नशील आहे.
S.Bedekar/Rajashree/Sonal C/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899650)
Visitor Counter : 202