युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी लखनौ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय नैपुण्य केंद्रात उभारलेल्या नवीन क्रीडा पायाभूत सुविधांचे केले उद्घाटन
Posted On:
12 FEB 2023 9:36PM by PIB Mumbai
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या लखनौ येथील राष्ट्रीय नैपुण्य केंद्रात उपलब्ध असलेल्या क्रीडाविषयक सुविधांमध्ये वाढ करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तेथे उभारलेल्या आधुनिक सुविधा म्हणजेच 300 खाटांचे निवासी वसतिगृह, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा असलेला कुस्तीसाठीचे दालन आणि क्रीडा वैद्यक केंद्र यांचे आज म्हणजे रविवारी केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी उद्घाटन केले.
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, साई म्हणजे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे लखनौ केंद्र हे भारताच्या प्रमुख महिला कुस्तीगीरांच्या प्रशिक्षणासाठी असलेले राष्ट्रीय शिबिर केंद्र म्हणून वापरात आहे. 300 खाटांच्या निवासी वसतीगृहामुळे लखनऊच्या राष्ट्रीय नैपुण्य केंद्राची क्षमता वाढून ती राष्ट्रीय प्रमुख खेळाडूंसह 460 क्रीडापटू एकाच वेळी सामावून घेऊ शकेल.हे नवीन वसतीगृह फक्त महिला क्रीडापटूंसाठी आहे तर त्याआधीची दोन प्रत्येकी ऐंशी खाटांची निवासी वसतिगृहे ही केंद्रातील पुरुष प्रशिक्षणार्थींच्या प्रशिक्षणासाठी राखीव ठेवली जातील. नवीन क्रीडा वैद्यकीय केंद्र हे अस्तित्वात असलेल्या आधीच्या वैद्यकीय केंद्राचे आधुनिकीकरण आहे. यामध्ये क्रीडा विज्ञान तज्ञ तसेच क्रीडा मानसोपचार तज्ञ नियुक्त केले आहेत. क्रीडा विज्ञान केंद्राला बसवलेल्या आधुनिक बायोमेकॅनिकल यंत्रांमुळे हे केंद्र सर्व सुविधांनी युक्त आहे.
"भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे लखनौ केंद्र हे एक छोटे केंद्र होते ते आता आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दर्जाचे झाले आहे. आपल्या क्रीडापटूंना उत्तम कामगिरीसाठी मदत म्हणून सर्व सुविधा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि हे बदल म्हणजे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे", असे अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या केंद्रातील महिला क्रीडापटूंनी दाखवलेल्या उत्तम कामगिरीवर ठाकूर यांनी भर दिला आणि राष्ट्रीय लखनऊच्या राष्ट्रीय नैपुण्य केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या आणि नुकत्याच मध्य प्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सात विक्रम मोडणाऱ्या मणिपुरी भारोत्तोलक एम मार्टिनादेवीच्या कामगिरीबद्दल सांगितले.
"जेव्हा केंद्रातील क्रीडापटू स्पर्धेत उतरतात तेव्हा केंद्र पुरवत असलेल्या सुविधांचा खऱ्या अर्थाने कस लागत असतो. मार्टिनाने सध्या घेतलेली झेप हेच सिद्ध करते की लखनौच्या राष्ट्रीय नैपुण्य केंद्रात क्रीडापटूंना खरोखर आवश्यक असणारे असे उत्तम प्रकारचे प्रशिक्षण, डाएट, राहण्याच्या सुविधा मिळतात." असे ठाकूर यावेळी म्हणाले.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898595)
Visitor Counter : 224