पर्यटन मंत्रालय
जी-20 च्या पार्श्वभूमीवर आयोजित, ‘सामुदायिक सक्षमीकरण आणि गरीबी निर्मूलनासाठी ग्रामीण पर्यटन’ या विषयावरील कार्यक्रमाने, पर्यटन कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठकीची सुरुवात
स्वावलंबी गावे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेतील असा केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचा विश्वास
Posted On:
07 FEB 2023 10:00PM by PIB Mumbai
पर्यटन मंत्रालयाने जी-20 अंतर्गत आयोजित केलेल्या पहिल्या पर्यटन कार्यकारी गटाच्या बैठकीची सुरुवात आज ‘सामुदायिक सक्षमीकरण आणि गरीबी निर्मूलनासाठी ग्रामीण पर्यटन’ या विषयावरील चर्चासत्राने झाली. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विभाग मंत्री जी. के. रेड्डी यांच्या बीज भाषणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बैठकीसाठी उपस्थित प्रतिनिधींचे, भूज विमानतळ तसेच टेंट सिटी, धोर्डो, कच्छचे रण येथे स्नेहमय वातावरणात, लोक कलाकारांच्या रंगीबेरंगी आणि पारंपरिक सादरीकरणाने स्वागत करण्यात आले. यावेळी आयोजित चर्चासत्राला युएनईपी सह इंडोनेशिया, इटली, स्पेन, जपान, आणि आयएलओ मधील प्रतिनिधी उपस्थित होते. भारतातून, मध्य प्रदेश, गुजरात आणि नागालँड सरकार यांच्यासह ओवायओ आणि ग्लोबल हिमालयन मोहिमेच्या सदस्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. यावेळी काही अन्य विषयांवर चर्चा आणि सादरीकरण झाले. यामध्ये होमस्टे, समुदाय आधारित इको टुरिझम आणि कच्छच्या रणासाठी ग्रामीण पर्यटन मॉडेल या माध्यमातून महिला सक्षमीकरण याचा समावेश होता.
केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विभाग मंत्री जी. के. रेड्डी यांनी कार्यक्रमात बीजभाषण दिले. भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळात शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यटनाचा एक साधन म्हणून वापर करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महात्मा गांधींचा उल्लेख करून जी.के.रेड्डी म्हणाले की, "भारताचा आत्मा त्याच्या गावांमध्ये वसतो" आणि अशा प्रकारे आपल्या गावांच्या माध्यमातून देशाची जीवनशैली, देशाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आणि देशाचे नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शित केले जात आहे. स्वावलंबी गावे स्वावलंबी भारताच्या दिशेने घेऊन जातील असेही जी. के. रेड्डी म्हणाले.
जी.के.रेड्डी म्हणाले की, पर्यटनामध्ये कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे पर्यटन हे आर्थिक परिवर्तन, ग्रामीण विकास आणि समाजाच्या कल्याणासाठी सकारात्मक शक्ती ठरू शकते. जी. के. रेड्डी यांनी या वस्तुस्थितीवरही भर दिला की, पर्यटनामुळे स्थानिक उत्पादने आणि सेवांसाठी बाजार उपलब्ध होतो, युवक उद्योजक बनण्यासाठी सक्षम होतात, महिला आणि आदिवासी समाजासारख्या वंचित घटकाला रोजगार मिळतो आणि त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण आणि गरीबी निर्मुलनाला चालना मिळते.
चर्चासत्रात सहभागी सदस्यांनी सादरीकरण केले आणि ग्रामीण पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती, यशोगाथा संभावना, संधी आणि समस्या या मुद्द्यांवर चर्चा केली.
गुजरातमध्ये कच्छचे रण इथे आयोजित पहिल्या पर्यटन कार्यकारी गटाच्या बैठकीला 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित आहेत.
उद्या होणार्या प्रमुख कार्यक्रमाला पर्यटन, सांस्कृतिक आणि ईशान्य प्रदेश विभाग मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहणार आहेत. जी 20 सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
कच्छचे रण, सिलीगुडी, गोवा आणि उत्तर भारतातील एक ठिकाण यासह विविध ठिकाणी, जी-20 अंतर्गत पर्यटन ट्रॅकच्या चार बैठकी होणार आहेत. जी 20 बैठकीदरम्यान पुढे नेण्यासाठी विविध देशांनी सहमती दर्शविलेल्या मुद्द्यांबाबतचे एक मंत्रीस्तरीय निवेदन, शिखर परिषदेच्या शेवटी सादर केले जाईल. जी20 अंतर्गत कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निवड करण्यात आलेली स्थळे उपस्थितांना ग्रामीण, पुरातत्त्व, ऐतिहासिक अशा विविध गंधांची अनुभूती देतील.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897165)
Visitor Counter : 218