संरक्षण मंत्रालय

तुमकुरू येथील एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण


आपल्या संरक्षणक्षेत्रविषयक गरजांच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व आपण कमी करायला हवे : पंतप्रधान

‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेच्या भावनेमुळे हमखास यशाची सुनिश्चिती

Posted On: 06 FEB 2023 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तुमकुरू येथे एचएएल हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी तुमकुरू औद्योगिक वसाहत आणि तुमकुरू मधील टिपूर आणि चिक्कनायकनहळ्ळी या दोन ठिकाणी जल जीवन अभियान प्रकल्पांची कोनशीला देखील बसविली. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी हेलिकॉप्टर निर्माण सुविधा आणि स्ट्रक्चर हँगर यांची पाहणी केली तसेच हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरचे अनावरण केले.

कर्नाटकातील युवकांची प्रतिभा आणि नवोन्मेष यांची प्रशंसा करून पंतप्रधान म्हणाले की  ड्रोन्स ते तेजस लढाऊ विमाने अशा अनेक उत्पादनांमध्ये निर्मिती क्षेत्राचे सामर्थ्य दिसून येत आहे. “दुहेरी इंजिन सरकारने कर्नाटकला गुंतवणूकदारांचा पहिला पर्याय म्हणून स्थापित केले,” पंतप्रधान म्हणाले. आज लोकार्पण झालेल्या एचएएलच्या प्रकल्पाची कोनशीला संरक्षण क्षेत्रविषयक गरजांच्या बाबतीत परदेशावरील अवलंबित्व कमी करण्याच्या निर्धारासह 2016 मध्ये आपण बसवली होती असे त्यांनी स्पष्ट केले.

“प्राणघातक आधुनिक रायफल्स ते रणगाडे, विमानवाहू जहाजे, हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमाने, वाहतूक करणारी विमाने अशा सर्व प्रकारच्या सामग्रीचे उत्पादन भारतात होत आहे,” पंतप्रधान म्हणाले. हवाई क्षेत्राच्या कामगिरीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की गेल्या 8 ते 9 वर्षांत या क्षेत्रात झालेली गुंतवणूक 2014 पूर्वी आणि त्याच्या अगोदरच्या 15 वर्षांत या क्षेत्रात करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या पाचपट आहे. भारतात निर्मित शस्त्रास्त्रे केवळ आपल्या देशाच्याच संरक्षण दलांना पुरविली जात नाहीत तर संरक्षण सामग्रीची देशातून होणारी निर्यात देखील 2014 पूर्वी होत असलेल्या निर्यातीच्या कितीतरी पटींनी वाढली आहे. नजीकच्या भविष्यात तुमकुरू येथील प्रकल्पातून शेकडो  हेलिकॉप्टरची  निर्मिती होणार असून त्यातून 4 लाख कोटी रुपयांची व्यापारी उलाढाल होईल या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. “जेव्हा अशा प्रकारची उत्पादन एकके उभारली जातात, तेव्हा केवळ सशस्त्र दलांच्या सामर्थ्यात वाढ होते असे नाही तर त्यायोगे रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात” असे पंतप्रधानांनी सांगितले. तुमकुरु येथील हेलिकॉप्टर कारखान्याच्या परिसरातले  छोटे उद्योग देखील यामुळे अधिक सक्षम होतील, असे पंतप्रधानांनी   अधोरेखित केले.

“राष्ट्र प्रथम” या भावनेने प्रेरित होऊन कार्य केल्यास यश निश्चित आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या   कामकाजात सुधारणा आणि पुनरुज्जीवन आवश्यक असून खाजगी क्षेत्रासाठी संधी खुल्या करण्याबाबत त्यांनी विचार मांडले.

अलीकडेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नावाखाली अपप्रचार करून केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या घटनेचा त्यांनी उल्लेख केला. असत्य हे कितीही मोठे असले, वारंवार सांगितले गेले किंवा किंवा उच्चरवात सांगितले तरी सत्यासमोर त्याचा नेहमी पराभव होतो, असे ते म्हणाले. “हा कारखाना आणि एच ए एलच्या वाढत्या सामर्थ्याने खोटे बोलणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. वास्तव  नेहमी स्वतःच बोलते” असे सांगून ते म्हणाले की हेच  एच ए एल आज भारतीय सशस्त्र दलांसाठी अत्याधुनिक तेजसची निर्मिती करत असून ते वैश्विक आकर्षणाचे केंद्र झाले आहे, एवढेच नव्हे तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्यात योगदान देत आहे.   

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री  ए नारायणस्वामी आणि कर्नाटक सरकारचे मंत्री उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, सशत्र दलांनी नवा जोम आणि नव्या उत्साहासह देशाच्या संरक्षणाच्या बाबतीत आगेकूच केली आहे यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, केवळ सैनिकच नव्हे तर वैज्ञानिक, अभियंते, यंत्रविषयक तज्ञ, तंत्रज्ञान विषयक जाणकार, एमएसएमई उद्योजक, स्वतंत्र अभिनव संशोधक, स्टार्ट अप्स, औद्योगिक कामगार आणि इतर सर्व क्षेत्रांत कार्यरत लोक राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी आपापले योगदान देत आहेत. एचएएल हेलिकॉप्टर सुविधा म्हणजे त्या सामुदायिक निर्धाराचा ठोस पुरावा आहे असे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

 

* * *

N.Chitale/Sanjana/Sonal/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896824) Visitor Counter : 177


Read this release in: English , Urdu