पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

भारतातील सर्व 75 रामसर स्थानांवर जागतिक पाणथळ दिन उत्साहात साजरा


महाराष्ट्रातील तिन्ही रामसर स्थळांवर जागतिक पाणथळ दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 06 FEB 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/मुंबई, 6 फेब्रुवारी 2023

 

देशभरातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांतर्फे भारतातील सर्व 75 रामसर स्थळांवर जागतिक पाणथळ दिनानिमित्त 200 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रत्येक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला तसेच कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना पाणथळ जागांच्या संरक्षणाची शपथ देण्यात आली. जागतिक पाणथळ दिनानिमित्त विविध रामसर ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा, नवीन माहिती करून देण्याच्या उद्देशाने आयोजित विविध कार्यक्रम तसेच पक्षीनिरीक्षण इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते.

29 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणथळ जागांच्या सहभागात्मक व्यवस्थापनावर अधिक भर दिला होता. या जागांच्या जतन आणि संवर्धनात स्थानिक समुदायांच्या अनमोल भूमिकेचे देखील त्यांनी ठळकपणे वर्णन केले होते. पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या विचारांना अनुसरून जागतिक पाणथळ दिन साजरा करण्याची संकल्पना राबवण्यात आली.

महाराष्ट्रात देखील जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यासाठी लोणार, नांदूरमधमेश्वर आणि ठाणे या तीन रामसर स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

   

जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने 2 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील प्रसिद्ध लोणार तलावाच्या परिसरात वन खात्यातर्फे स्वच्छता मोहीम तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा उपक्रम राबवला. यामध्ये लोणार वन्यजीव अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. परिक्षेत्र वन अधिकारी चेतन राठोड आणि इतर वन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

  

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.

  

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारीतील नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यात 2 फेब्रुवारी 2023 रोजी जागतिक पाणथळ दिन साजरा करण्यात आला. चापडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक वन्यजीव विभागातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भूषविले तर ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ताकाका उगावकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पाणथळ भूमी संरक्षणाची शपथ दिली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, अध्यक्ष गणेश रणदिवे यांनी पाणथळ भूमीच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहून योगदान देण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात विद्यार्थी आणि वनविभागाचे अधिकारी यांच्यातील खुल्या संवादवजा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

   

भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या 75 रामसर स्थळांपैकी नांदूरमधमेश्वर हे 28 व्या क्रमांकाचे रामसर स्थळ आहे तर महाराष्ट्रातील 3 रामसर स्थळांपैकी प्रथम क्रमांकाचे रामसर स्थळ आहे. सुमारे 1198.657 हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात 536 प्रकारच्या जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पती आढळतात. तसेच येथे 7 प्रकारचे सस्तन वन्यप्राणी, 300 जातींचे पक्षी, 24 प्रकारचे मासे आणि तब्बल 41 प्रकारची फुलपाखरे आढळतात.

ठाणे येथे असलेल्या फ्लेमिंगो पक्षी अभयारण्यात जागतिक पाणथळ दिनानिमित्त कांदळवन प्रतिष्ठान आणि ग्रीनएडर्स संस्था यांच्यातर्फे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 

   

   

 

* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896712) Visitor Counter : 325


Read this release in: English , Urdu