ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा(एनएफएसए),2013 अंतर्गत केंद्र सरकारतर्फे अंत्योदय अन्न योजनेतील(एएवाय) कुटुंबांना तसेच प्राधान्यकमातील कुटुंब(पीएचएच) लाभार्थ्यांना 1 जानेवारी 2023 पासून एका वर्षासाठी, मोफत अन्नधान्याचा पुरवठा

Posted On: 03 FEB 2023 5:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या सातव्या टप्प्याची अंमलबजावणी 31 डिसेंबर 2022 पर्यंत सुरु ठेवण्यात आली होती. गरीब लाभार्थ्यांवर असलेला आर्थिक ताण संपवण्यासाठी तसेच एनएफएसए अर्थात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याबाबत देशव्यापी समानता आणि परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने एएवाय म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे आणि पीएचएच म्हणजेच प्राधान्यक्रम मिळालेल्या घरांतील लाभार्थी यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या (एनएफएसए) अधिकारात 1 जानेवारी 2023 रोजी सुरु होणाऱ्या एका वर्षासाठी अन्नधान्याचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार केंद्र सरकार 1 जानेवारी 2023 पासून एक वर्षभरासाठी या लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अन्वये, मोफत अन्नधान्य वितरीत करत आहे.

सध्या सुरु असलेल्या अ)एनएफएसएसाठी भारतीय खाद्य मंडळाला देण्यात येणारे अनुदान आणि ब) राज्यांना मोफत वितरणासाठी एनएफएसए अंतर्गत देण्यात येणाऱ्या धान्याची खरेदी, वाटप आणि वितरण यांच्याशी संबंधित, विकेंद्रीकृत खरेदी साठीचे अन्न अनुदान या दोन योजनांचे एकत्रीकरण करुन पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) ही योजना सुरु करण्यात आली आहे.

पीएमजीकेएवाय योजने (पहिला ते सातवा टप्पा) अंतर्गत, अन्न अनुदान, आंतरराज्यीय वाहतूक तसेच अन्नधान्यांची हाताळणी आणि वाजवी भाव असलेल्या दुकानांच्या डीलर्सचे मार्जीन यासाठी येणाऱ्या सर्व खर्चाचा भार केंद्र सरकारने उचलला होता.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1896070) Visitor Counter : 133


Read this release in: English , Tamil