श्रम आणि रोजगार मंत्रालय

देशभरातील 4 लाख सीएससी केंद्रांवर ई-श्रम पोर्टल नोंदणी सुविधा उपलब्ध

Posted On: 02 FEB 2023 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली की,आधार संलग्न असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस असलेले ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे.  नोंदणीची संख्या वाढवण्यासाठी, वेळोवेळी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांबरोबर  हा मुद्दा विचारात घेतला जातो. नोंदणीची सुविधा देशभरातील 4 लाखांहून अधिक सामायिक सेवा  केंद्रांवर उपलब्ध आहे. राज्य सेवा केंद्रांनाही पोर्टलवर समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच कामगारांना एकत्र आणण्यासाठी सामायिक सेवा केंद्रे विविध ठिकाणी जनजागृती  शिबिरे (रात्र शिबिरांसह) आयोजित करते. मोबाईलद्वारे सुलभतेने  नोंदणीसाठी ई-श्रम पोर्टल देखील उमंग अॅपवर उपलब्ध आहे. ई-श्रम पोर्टलच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी 45.39 कोटी रुपये मंजूर/वितरित करण्यात आले आहेत.

तेली यांनी सांगितले  की, श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग आणि त्यांच्या रोजगाराची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने  विविध पावले उचलली आहेत. महिला कामगारांना समान संधी आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरणासाठी कामगार कायद्यांमध्ये अनेक संरक्षक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पगारी प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवड्यांपर्यंत वाढवणे, 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये अनिवार्य पाळणाघर सुविधेची तरतूद, तसेच पुरेशा सुरक्षा उपाययोजनांसह  रात्रपाळीत  महिला कामगारांना परवानगी देणे इत्यादींचा समावेश आहे.

तसेच, महिला कामगारांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी, सरकार महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आणि प्रादेशिक व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून  त्यांना प्रशिक्षण देत आहे. 29-01-2023 पर्यंत ई-श्रम पोर्टलवर 28.55 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी झाली असून त्यापैकी 52.80 टक्के महिला कामगार आहेत.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1895892) Visitor Counter : 161


Read this release in: English , Urdu