संसदीय कामकाज मंत्रालय
राजकीय पक्षाच्या नेत्यांशी सरकारची बैठक, केंद्रीय मंत्र्यांसह 27 पक्षांच्या 37 नेत्यांचा बैठकीत सहभाग
या अधिवेशनात 27 बैठका (पहिल्या भागात 10 आणि दुसऱ्या भागात 17 बैठकांचे आयोजन) होतील- प्रल्हाद जोशी यांची माहिती
Posted On:
30 JAN 2023 10:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2023
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 संदर्भातील मुद्यांवर चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीच्या संसद भवन संकुलात 30 जानेवारी 2023 रोजी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही बैठक बोलावली होती. एकूण 46 राजकीय पक्षांपैकी 27 राजकीय पक्षांचे 37 नेते आणि पियुष गोयल यांच्यासह केंद्रीय मंत्री या बैठकीला उपस्थित होते.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 मंगळवारी 31जानेवारी 2023 रोजी सुरू होईल आणि सरकारच्या कामकाजाच्या गरजेनुसार हे अधिवेशन 6 एप्रिल 2023 रोजी समाप्त होईल, अशी माहिती संसदीय व्यवहारमंत्र्यांनी दिली. या कालावधीत दोन्ही सभागृहे अवकाशासाठी 13 फेब्रुवारी 2023 रोजी संस्थगित होतील आणि 13 मार्च 2023 रोजी विविध मंत्रालये/विभाग यांच्या अनुदानाच्या मागण्यांची स्थायी समितीला छाननी करता यावी आणि त्यावर अहवाल तयार करता यावा यासाठी पुन्हा कामकाज सुरू करतील. या अधिवेशनात 27 बैठका( पहिल्या भागात 10 आणि दुसऱ्या भागात 17 बैठकांचे आयोजन) होतील, असे जोशी यांनी सांगितले.
या अधिवेशनात मुख्यत्वे केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मधील आर्थिक कामकाजावर भर दिला जाईल आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होईल. मात्र, अत्यावश्यक संसदीय आणि इतर कामकाज देखील अधिवेशनाच्या काळात हाती घेतले जाईल.

सभागृहामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे असे देखील संसदीय व्यवहारमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या विविध मुद्यांवर आपापले दृष्टीकोन मांडले आणि संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 दरम्यान संसदेच्या सभागृहातील कामकाज शांततेत करण्यासाठी सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1894841)