माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकार एक सक्षमकर्ता म्हणून, भारतीय अॅनिमेशन कार्यक्षेत्राचे भविष्य आणि एससीओ देशांमधील चित्रपट महोत्सवांची व्याप्ती यावर एससीओ चित्रपट महोत्सवात चर्चा


एससीओ चित्रपट महोत्सवाच्या या पर्वात चर्चासत्र आणि मास्टरक्लासचा एका आशावादी टप्प्यावर समारोप

Posted On: 30 JAN 2023 10:32PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जानेवारी 2023

 

शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही चित्रपट उद्योगातील विविध हितसंबंधितांचा  उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.होम कमिंग फ्रॉम चायना सारख्या चित्रपटांच्या प्रदर्शनाने आजच्या  दिवसाची सुरुवात झाली.  या महोत्सवात  आजही कार्यशाळा आणि चर्चासत्र  सुरूच राहिली. प्रदर्शित करण्यात आलेल्या इतर चित्रपटांमध्ये श्रीलंकेतील मारिया, भारताचा स्वतःचा आरआरआर, इजिप्तमधील फोटोकॉपी आणि कझाकस्तानचे अडेमोकाज एजुकेशन   या चित्रपटांचा  समावेश होता.

भारताला चित्रीकरणासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासंदर्भातील  परिसंवादात, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारत सरकारचे सहसचिव (चित्रपट ) प्रितुल कुमार यांनी चित्रपट निर्मात्यांना भारतात चित्रीकरणासाठी चित्रीकरणाची  ठिकाणे, सवलत आणि प्रोत्साहने प्रदान करण्यात चित्रपट सुविधा कार्यालयाची  (एफएफओ) भूमिका अधोरेखित केली. भारतीय चित्रपट उद्योगाच्या विकासासाठी नवीन, कमी ज्ञात चित्रीकरण स्थळांचा प्रचार करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी  आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अविनाश ढाकणे यांनी या चर्चासत्रात मांडला. संपूर्ण भारतातील चित्रपट  उद्योगाचा खर्‍या अर्थाने विकास करण्यासाठी  दक्षिण भारतीय निर्मात्यांना उत्तर भारतात चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते किरीट खुराना यांचा  भारतीय अॅनिमेशन उद्योगावर एक मास्टरक्लास देखील झाला. त्यांनी भारतीय अॅनिमेशन उद्योगाच्या विकासाचा  मागोवा घेतला आणि महत्त्वाचे टप्पे अधोरेखित केले.  व्हीएफएक्स हा अॅनिमेशन उद्योगाचा एक आधुनिक अवतार आहे आणि यापुढील वाटचालीत , 2030 पर्यंत या उद्योगाला सध्याच्या  1.3 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून  वरून  40अब्ज अमेरिकी डॉलर्सवर नेण्यासाठी जपानी अॅनिमिशन  उद्योगाचा मार्ग अवलंबावा असे त्यांनी सूचित केले.

आजच्या दिवसाचा  शेवटचा परिसंवाद एससीओ  देशांमधील चित्रपट महोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठीची  आव्हाने आणि व्याप्ती या विषयावर झाला.यात   सुनील दोशी यांनी , लक्ष्यित समुदायांसाठी चित्रपट बनवण्याबद्दल आपले विचार मांडले.  यरिस एसेल यांनी एससीओ क्षेत्रामध्ये सिनेमा लोकप्रिय करण्यासाठी ओटीटी  बद्दल आशावादी दृष्टिकोन मांडला. त्याचप्रमाणे स्वरूप चतुर्वेदी यांनी एससीओ क्षेत्रात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निसर्गरम्य ठिकाणांसंदर्भात भाष्य केले. चांगल्या प्रकारे बनवलेल्या चित्रपटाची कोणत्याही चित्रपट महोत्सवात निवड होण्यासाठी नेहमीच दरवाजे खुले असतात, असे ते म्हणाले.अशा  प्रकारे एका आशावादी टप्प्यावर  एससीओ  चित्रपट महोत्सवाच्या  या पर्वातील  चर्चासत्र  आणि मास्टरक्लासचा समारोप झाला.या  आणि चर्चासत्रात सहभागी  सदस्यांनी चित्रपट महोत्सव आणि दर्जेदार आशयासाठी उज्ज्वल भविष्याचा अंदाज व्यक्त केला.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chavan/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1894830) Visitor Counter : 163


Read this release in: English , Urdu , Hindi